छोटासा घर होगा बादलो की छाव में
आशा दीवानी मन में बंसुरी बजाय।
घराचे आकर्षण कमी-अधिक प्रमाणात सर्वानाच असते. म्हणूनच घरांचे दर आकाशाला भिडत चालले आहेत आणि तरीही घरांची मागणी वाढतच चालली आहे. घराची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. कुणाला आपले घर कसे वाटेल हे त्याच्या मनोवृत्तीवर असते. एखाद्या मनस्वी, पण गरीब माणसाला त्याची झोपडीदेखील महालासारखी वाटेल. तर राज महालाच्या मखमली गादीवर झोपणाऱ्या राजाच्या नशिबात सुख असेलच, याची खात्री देता येत नाही. संध्याकाळी दमूनभागून आल्यावर घरी आपल्याला आनंद मिळेल या आशेवर सामान्य माणूस जगत असतो. हा आनंद मिळविण्यासाठी आपल्याला खूप पसे खर्च करावे लागतात असेही नाही. मात्र त्यासाठी मानसिकता असणे गरजेचे असते.
आपल्या घरात भरपूर उजेड असणे अतिशय महत्त्वाचे आहे. फक्त विजेची ऊर्जा वाचविणे हा त्यामागचा हेतू नसून, घराचे आरोग्य चांगले राखणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. घरात दिवसातून काही वेळ तरी सूर्यप्रकाश यावा अशी घराची रचना असावी. सूर्यप्रकाशात घरातील वातावरण स्वछ व शुद्ध राहण्यास मदत होते. घराला पूर्वाभिमुख वा पश्चिमाभिमुख खिडक्या तरी किंवा दारे तरी असावीत. पूर्वी घरांना धारी (म्हणजे छतावरील खिडकी) असायची व त्यातून सूर्यप्रकाश सरळ घरात शिरत असे. त्यामुळे घरात उजेड भरपूर असायचा. आजही प्रकाश भरपूर असणारी घरे आहेत, पण इमारतींची उंची जशी वाढली तसे प्रकाशाचे प्रमाण घटले आहे. पण कमी प्रकाश असेल तर त्याचा त्रास लहान-थोर सर्वाना सारखाच होतो. घरात उजेड किती असावा याचे वैज्ञानिक गणित आहे.
आकाश निरभ्र असेल तर जो प्रखर सूर्यप्रकाश पाहायला मिळतो त्याची तीव्रता अंदाजे १००००० लक्स एवढी असते. एवढय़ा तीव्र प्रकाशाची आपल्याला गरज नसते. उलट त्याचा त्रासच जास्त होण्याची शक्यता असते. पण घराच्या उघडय़ा खिडकीत दिवसाच्या प्रकाशाचे हे प्रमाण १०००० लक्स एवढे असते. सर्वसाधारण ढगाळ वातावरणात हे प्रमाण १००० लक्स तर संधिप्रकाशात ते १० लक्सपर्यंत खाली येते. क्रिकेटच्या मदानावर पंच हातात लक्स मीटर घेऊन प्रकाश मोजत असल्याचे आपण पाहतो. चेंडू वेगात आला तर फलंदाजाला तो नीट दिसला पाहिजे यासाठी किमान २००० ते ३००० लक्स एवढा सूर्यप्रकाश असावा असा नियम आहे. पौर्णिमेच्या रात्री आकाश निरभ्र असेल तर पूर्णचंद्राच्या शीतल प्रकाशाची तीव्रता ०.१ लक्सच्या आसपास असते. मिट्ट काळोख्या रात्री ही तीव्रता ०.०००१ लक्स एवढी कमी होते. आपल्या घरात दिवसा १०० ते २०० लक्स प्रकाशाची तीव्रता असेल तर तेवढा प्रकाश अगदी पुरेसा असतो. आपल्या राज्यात बहुतेक सर्व शहरांमध्ये व खेडय़ांमध्ये जवळ जवळ दहा महिने तरी भरपूर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे इतर देशांच्या मानाने आपल्याला वीज कमी लागते. म्हणूनच घराभोवती थोडी मोकळी जागा असेल तर आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी या नसíगक सूर्यप्रकाशाचा चांगला उपयोग करून घेता येईल. या मोकळ्या जागेत छोटीसी बाग फुलविली आणि एखादी खुर्ची टाकून तिथे वाचन केले तर मन प्रसन्न राहील यात शंकाच नाही. मोठमोठय़ा संस्थांमध्ये अशा बागा फुललेल्या  आपण बघत असतो. पण त्या सुंदर वातावरणाचा आस्वाद घेण्याऐवजी लोक जेव्हा वातानुकूल खोल्यांमध्ये स्वत:ला बंद करून घेतात ते पाहून त्यांची कीव येते. शिवाय वातानुकूल यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून खिडक्या उघडण्याची बंदी व त्यामुळे विजेच्या दिव्यांच्या प्रकाशात सारे काम करावयाचे! ‘तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी’ हेच खरे!
संगणकावर काम करीत असताना किंवा पुस्तक वाचीत असताना प्रकाश कमी असेल तर आपल्या डोळ्यांवर ताण येतो व त्याचे दीर्घकालीन परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे संगणकाचे किंवा अभ्यासाचे मेज हे खिडकीजवळ असावे व सूर्यप्रकाश पुस्तकावर किंवा संगणकाच्या की-बोर्डवर पडावा अशा तऱ्हेची रचना असेल तर त्याचा आपल्या डोळ्यांना चांगलाच फायदा होतो. गृहिणीलादेखील घरकाम असताना व्यवथित प्रकाश मिळणे अतिशय आवश्यक असते. विशेषत: तांदूळ किंवा डाळी निवडताना किंवा शिवणकाम, भरतकाम यासारखी कामे करीत असताना योग्य तितक्या प्रमाणात नसíगक प्रकाश मिळाला तर दृष्टी अनेक वष्रे साथ देते. जिथे हा नसíगक प्रकाश मिळणार नसेल तिथे टेबलावरच्या दिव्याची सोय केली पाहिजे. वाचताना आपल्याला कमीत कमी ७० ते ८० लक्स प्रकाशाची आवश्यकता असते. अशा दिव्याचा प्रकाश थेट डोळ्यांवर पडत नाही, तर पुस्तकावर किंवा हातातील कामावर पडतो व त्यामुळे आपल्याला डोळ्यांवर ताण न देता काम करता येते. आजकाल एल. ई. डी. दिवे बाजारात सर्रास मिळू लागले आहेत. हे एल. ई. डी. दिवे योग्य तेवढय़ा प्रमाणात प्रखर असतात व त्यांना वीजदेखील खूप कमी लागते.
घरातील विविध गोष्टींची रचना आहे त्या जागेत कशी केली आहे, घरातील भिंतींना कोणता रंग दिला आहे, घरात कोणत्या वस्तू आहेत या सर्वावर घरात मिळणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण अवलंबून असते. रंगसंगती या बाबतीत अगदी फार महत्त्वाची आहे. घराला अगदी गडद किंवा भडक असे रंग देऊ नयेत. कारण या रंगांमध्ये प्रकाश शोषला जाऊन घरात पुरेसा प्रकाश येऊनदेखील आपल्याला तो पुरेसा मिळणार नाही. म्हणून घराच्या भिंतींना शक्यतोवर पांढऱ्या रंगाशी मिळतेजुळते असे फिक्कट रंग दिले तर प्रकाशाचे परावर्तन होऊन तो प्रकाश सर्व घरभर छान पसरेल व दिवसा विजेचे दिवे लावावे लागणार नाहीत. टीव्ही संच लावतानादेखील त्यावर थेट सूर्यप्रकाश किंवा विजेच्या दिव्याचा प्रकाश येणार नाही अशा पद्धतीनेच तो लावला पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे पाहताना आपल्या डोळ्यांवर ताण येणार नाही. घराच्या भिंतींवर जर देवादिकांचे किंवा सिनेसृष्टीतील तारकांचे फोटो लावायचे असतील तर प्रकाशावर त्यांचा परिणाम होणार नाही अशा रीतीने ते लावावेत. रंग लावताना त्यात बुरशी नियंत्रक तत्त्व आहेत याची खात्री करून घ्यावी. विशेषत: पावसाळ्यात मुंबईसारख्या ठिकाणी रंगांवर बुरशी वाढते. त्यामुळे रंग बिघडतात व जीवनाचे रंगही त्यामुळे बिघडू शकतात! बुरशी वाढलेल्या भिंतींवर प्रकाशाचे योग्य परावर्तन होत नाही. परिणामी आपल्याला प्रकाश कमी तर मिळतोच, त्याशिवाय वातावरणदेखील नीरस होते.
हल्ली इमारतींना काचा लावण्याचे फॅड निघाले आहे. काचांच्या वापरामुळे सूर्यप्रकाश अधिक वापरला जाईल असा युक्तिवाद केला जातो. पण तो फसवा आहे हे लक्षात घ्यावयाचे आहे. काचेचा जितका अधिक वापर केला
जाईल त्या प्रमाणात जाड पडदेदेखील लावावे लागतात. या दोन्ही बाबींमुळे घराचे तापमान तर वाढतेच, शिवाय दिवसा विजेचे दिवे लावावे लागतात व विजेची बचत होण्याऐवजी तिचा अपव्यय अधिक होतो. म्हणूनच इमारतींना काचा लावणे टाळणे अधिक श्रेयस्कर राहील हे नक्की. युरोपमध्ये काचा वापरतात म्हणून आपण त्या वापरायच्या का? हा प्रश्न आपण विचारायला हवा.
डॉ. शरद काळे -sharadkale@gmail.com
सह संचालक, जैवविज्ञान वर्ग, भाभा अणुशक्ती केंद्र