आपल्याला आसरा पुरवणाऱ्या इमारतीची काळाच्या ओघात झीज होत असते. ही झीज वेगवेगळ्या प्रकारे होत असते. बऱ्याच जुन्या इमारतींवर आपल्याला बाहेरच्या बाजूने काळे डाग पडलेले दिसतात. ऊन, वारा, पाऊस यांचे तडाखे सोसत, काबरेनेशन प्रक्रियेमुळे म्हणजेच वातावरणाचा परिणाम इमारतीवर झाल्यामुळे हे काळे डाग इमारतीवर पडतात. कधीकधी इमारतीच्या बाहेरच्या िभतींवरच्या प्लॅस्टरला तडे जातात, तर कधी त्याचे तुकडेही पडलेले दिसतात. रंगाचे पापुद्रे सुटतात. काँक्रीटचे तुकडे पडतात. सळ्या उघडय़ा पडलेल्या दिसतात. कधीकधी या सळ्या इतक्या गंजलेल्या असतात की, त्यांच्यावर जमा झालेल्या गंजाला हात लावायला गेले तर हातात गंजाची पावडर येते. तसेच इमारतीच्या बाहेरच्या किंवा आतल्या बाजूने अनेकदा आपण पाण्याचा पाझर होऊन ओल आलेली पाहतो किंवा पाण्याची गळती होत असलेली पाहतो. या सगळ्या परिणामांमुळे इमारतीची ताकद कमी होत असते. त्यातच हे सगळे कमी म्हणून की काय, तिच्या ताकदीचा विचार न करता आपल्या हौसेनुसार काही वेळा त्यात राहणारी माणसे आपल्या घरात हवे तसे बदल करतात. या सगळ्या कारणांनी वय वाढता वाढता इमारतीची ताकद कमी होत असते. वेळोवेळी माणसे जशी ताकद भरून काढण्यासाठी टॉनिक घेतात, स्वत:वर उपचार करून घेतात, तशाच प्रकारे काही ठरावीक काळानंतर इमारतीवरही तिच्या दुरुस्तीच्या माध्यमातून उपचार केले गेले पाहिजेत. हे सगळे दोष दूर करण्याकरिता मोठी दुरुस्ती करून दहा वर्षे उलटून गेली असतील, तर किमान दर पाच वर्षांनी स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून स्ट्रक्चरल ऑडिट अर्थात, इमारतीच्या स्थितीविषयी सखोल आणि तपशीलवार पाहणी करून घेणे आवश्यक आहे.
सोसायटीने स्ट्रक्चरल इंजिनीअरची नियुक्ती केली, तर गोळा केलेल्या माहितीच्या आधारे कुठल्या भागांची आणि कशा प्रकारे दुरुस्ती करायची आणि त्यातले कुठले भाग तातडीने दुरुस्त करायचे किंवा कुठले नंतर दुरुस्त केलेत तरी चालतील, ते ठरवणे सोपे जाते. याकरिता खालील माहिती गोळा केली जाते-
इत्यादी गोष्टींबाबत सर्व तपशीलवार माहिती स्ट्रक्चरल इंजिनीअरने गोळा केल्यानंतर प्रत्येक सदनिकेतल्या दोषांबाबत, तसेच इमारतीच्या बाहेरच्या बाजूने असलेल्या दोषांबाबत तपशीलवार पाहणी केली जाते व अहवाल सादर केला जातो. त्यात इमारतीत नेमके दोष कुठले आहेत, त्यावर कोणते उपाय करता येतील आणि त्यासाठी अंदाजित खर्च किती येईल, याबाबतचा अहवाल तो सोसायटीला सादर करतो. हा अहवाल सादर केल्यानंतर प्रत्यक्ष काम कधी सुरू करायचे अथवा करायचे किंवा नाही किंवा त्या कामातले नेमके किती घटक तातडीने पूर्ण करायचे, याविषयी गृहसंकुलातल्या सदस्यांची संमती घेऊन निर्णय घ्यायचा असतो. एकदा ते ठरले की, मग कंत्राटदारांकडून टेंडर मागवायची. निवडलेल्या कंत्राटदाराची नेमणूक करून कामाला सुरुवात करता येते. मात्र, काम सुरू करण्याचा निर्णय घेताना आणि कामासाठी निधी उभारताना बऱ्याचदा अनेक सदस्य त्या कामालाच विरोध करताना दिसतात. इमारतीची दुरुस्ती हा सर्वाच्या हिताचा निर्णय असल्यामुळे त्यात कुठलेही राजकारण आणू नये. आजची दुरुस्ती उद्यावर ढकलली, तर काळागणिक इमारत खंगत जाते आणि त्याच्या दुरुस्तीच्या खर्चात अधिकाधिक वाढ होत जाते, ही महत्त्वाची बाब सदस्यांनी लक्षात घ्यावी.
िभतींवरचे जुने पोकळ झालेले व भेगा पडलेले प्लॅस्टर विटा दिसेपर्यंत काढून टाकले जाते व त्या जागी नवीन प्लॅस्टर केले जाते. पॉलिमर रसायनयुक्त प्लॅस्टर तयार करताना एक काळजी घेतली पाहिजे. ती ही की, ते थापीवर घेऊन िभतीवर मारण्यासाठी थोडेसे पातळ असले पाहिजे, पण त्याचबरोबर ते पुरेसे घट्टही असले पाहिजे, नाही तर त्यातल्या सिमेंटची ताकद कमी होऊ शकते. छायाचित्र (१) पाहा. तसेच त्यासाठी वापरली जाणारी वाळू आधी चाळून घेऊन त्यातली बारीक चिकणमाती वेगळी काढून घ्यायला हवी. यासाठी जाळी असलेली चौकोनी चाळण वापरली जाते. छायाचित्र (२) पाहा. बीम, कॉलम, स्लॅब व सज्जा यांसारख्या संरचनात्मक भागांना जर तडे गेले असतील, तर ते क्राँक्रीट तोडून आतील सळ्या खुल्या करून घेतल्या जातात. सळ्या खूपच गंजल्या असतील किंवा त्यांचे तुकडे पडायला लागले असतील तर या जुन्या सळ्यांचा जो चांगला भाग असेल, त्याला वेिल्डग करून नव्या सळ्या बसवल्या जातात. या सर्व सळ्यांना गंजविरोधी रसायन लावले जाते. पॉलिमरयुक्त काँक्रीटचा वापर करून किंवा मायक्रोकाँक्रीट या पावडरच्या स्वरूपात असलेल्या तयार काँक्रीटसदृश पदार्थामध्ये आवश्यक प्रमाणात पाणी मिसळून त्याद्वारे तयार होणाऱ्या मिश्रणाचा वापर करून हे संरचनात्मक भाग नव्याने भरून काढले जातात. काँक्रीट खूपच खराब झाले असेल, तर जुना भाग पाडून तो नव्याने काँक्रीटमध्ये बांधून काढला जातो. याला जॅकेटिंग असे म्हणतात. मग त्यावरही नवीन प्लॅस्टर केले जाते. पाण्याचे पाइपही बदलून त्या ठिकाणी नवे पाइप घातले जातात. हे नवे पाइप घालताना ते भिंतींना चिकटून बसणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी क्लिपा मारून िभतीपासून काही अंतरावर हे पाइप बसवले जातात, कारण पाइपातून जर पाण्याची गळती झाली, तर हे पाणी िभतींमध्ये झिरपू नये यासाठी ही काळजी घेणे आवश्यक असते. दुरुस्तीचे सर्व काम पूर्ण झाल्यावर इमारतीला बाहेरून रंग काढणे आवश्यक असते. हा रंग काढणे म्हणजे पशांची उधळपट्टी किंवा चन नसून ऊन, वारा, पाऊस यापासून इमारतीला संरक्षक कवच घालण्यासाठीचा आवश्यक उपाय आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
शेवटी, इमारतीचे होणारे नुकसान म्हणजे आपलेच नुकसान आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अशा पद्धतीने जर ओळखून वेळीच दुरुस्ती केली तर इमारतीचे आयुष्य वाढू शकते. आपली सुरक्षितता
ही इमारतीच्या सुरक्षिततेवर अवलंबून असते.
त्यामुळे वेळीच पावले उचलून दुरुस्ती करून घेतली, तर आपले भविष्यातले फार मोठे नुकसान
टळू शकेल.

कुठले भाग तातडीने दुरुस्त करायचे किंवा कुठले नंतर दुरुस्त
केलेत तरी चालतील, याविषयी..
१)    संबंधित नगरपालिका अगर महानगरपालिकेने संमत केलेल्या आराखडय़ांची प्रत.
२)    इमारतीची स्ट्रक्चरल आणि आíकटेक्चरल ड्रॉइंग्ज.
३)     इमारत बांधल्याची तारीख, तसेच इमारत वाढवली असेल तर त्याची तारीख.
४)    इमारतीचा पाया कुठल्या प्रकारचा आहे, याबाबतची माहिती.
५)     या पायाची खोली किती आहे?
६)     यापूर्वी इमारतीची दुरुस्ती केली असल्यास ती नेमकी केव्हा केली होती, त्याबाबतचा तपशील.
७)    त्या दुरुस्तीच्या वेळी नेमक्या कुठल्या भागांची आणि कशा प्रकारे दुरुस्ती केली होती.
८)    इमारतीतल्या रहिवाशांपकी कोणी त्यांच्या घरांमध्ये अंतर्गत बदल केले असल्यास त्याबाबतची माहिती.
९)     इमारतीतले पाण्याचे आणि सांडपाण्याचे पाइप, पाण्याची टाकी यांची दुरुस्ती केली असल्यास त्याबाबतचा तपशील.
१०)    इमारतीच्या बाहेरच्या बाजूने आणि विशेषत: पाणी आणि सांडपाण्याच्या पाइपजवळ रोपे किंवा झाडांची पालवी उगवली आहे का, याबाबतचा तपशील (कारण जिथे हिरवळ दिसते तिथे गळतीची शक्यता असते.)
११)    घरांमध्ये अंतर्गत भागात कुठे पाण्याची गळती किंवा पाझर आहे का, याबाबतचा तपशील.
१२)    बीम, कॉलम, स्लॅब अथवा सज्जा या संरचनात्मक भागांना तडे गेले आहेत का, याविषयीचा तपशील.
१३)    त्यातल्या सळ्या दिसत आहेत का?
१४)    त्या सळ्या गंजल्या आहेत का? गंजल्या असतील तर किती टक्के गंजल्या आहेत?
१५)    ५० टक्क्यांपर्यंत गंजल्या असतील तर त्या भागांचे जॅकेटिंग म्हणजे पुर्नकाँक्रीटीकरण करायची गरज आहे का?
मनोज अणावकर -anaokarm@yahoo.co.in
सिव्हिल इंजिनीअर

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद