* बिल्डरने एकाच संकुलात तीन वेगवेगळ्या इमारती बांधून त्याच्या तीन गृहनिर्माण संस्था वेगवेगळ्या वेळी स्थापन केल्या. या संकुलात जाण्या-येण्यासाठी मात्र एकच रस्ता आहे. सदर रस्त्यावर सुरक्षिततेच्या कारणाने दोन सोसायटय़ांनी एकत्र येऊन फाटक बनविले व सुरक्षारक्षक ठेवला. यानंतर आता त्या दोन सोसायटय़ा उर्वरित सोसायटीजवळ सुरक्षाव्यवस्था व फाटक यांच्या खर्चातील वाटा मागत आहे व तो न दिल्यास फाटकाचा वापर करू दिला जाणार नाही, अशी भूमिका त्या दोन सोसायटय़ांनी घेतली आहे. ती बरोबर आहे का?
– एस. जी. नंदनवाडकर, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व.)
* सुरक्षाव्यवस्था पुरविणाऱ्या सोसायटींनी घेतलेली भूमिका अयोग्य आहे. ते अशा प्रकारे उर्वरित सोसायटीची अडवणूक करू शकत नाहीत. त्यांना ही गोष्ट नीट सांगून पाहावी नाहीतर याबाबत आपण को-ऑपरेटिव्ह कोर्टात/ सिव्हिल कोर्टातदेखील दाद मागू शकता; परंतु त्याचबरोबर याबाबत बिल्डरला कळवून कायदेशीर बाजू समजावून घ्यावी. तसेच दोन सोसायटय़ांबरोबर जर संवाद साधता आला तर पाहावा. जेणेकरून हा प्रश्न सामंजस्यानेदेखील सुटू शकेल. मात्र आपला वहिवाटीचा हक्क आमच्या मते कोणीही डावलू शकणार नाही.

* माझ्या वडिलांनी १९६७ साली एक फ्लॅट विकत घेतला. त्यानंतर सोसायटीचे शेअर सर्टिफिकेट सध्या माझ्या नावावर आहे. सदर मूळ करारनामा मिळत नाही. तो बिल्डरकडेदेखील नाही. बिल्डर म्हणून काम करणाऱ्या एका पार्टनरचा व माझ्या वडिलांचाही मृत्यू झाला आहे. सोसायटीत फक्त खरेदीची किंमत नमूद केलेली आहे. बाकी त्यांच्याकडेही करारनाम्याची प्रत उपलब्ध नाही. या परिस्थितीत माझे प्रश्न असे आहेत की :
१) मला स्टॅम्प डय़ूटी किती भरावी लागेल?
२) मला करारनाम्याची प्रत मिळू शकेल का? त्याची पद्धत काय?
३) करारनामा नोंद करण्यासाठी मला काय करावे लागेल?
– गणेश पटवर्धन, डोंबिवली.
* १) आमच्या मते, आपणाला स्टॅम्प डय़ूटी लागू होत नाही. कारण आपल्या वडिलांनी हा फ्लॅट १९६७ साली विकत घेतला आहे. त्या वेळी स्टॅम्प डय़ूटी लागू नव्हती (स्टॅम्प पेपरवरच त्या वेळी करारनामे होत असत व ते नोंदविले जात असत.)
२) आपला करारनामा नोंदणीकृत आहे किंवा नाही याचा खुलासा आपण केलेला नाही. जर तो नोंदणीकृत असेल तर त्याची प्रत आपणाला उपनिबंधक कार्यालयामार्फत मागविता येईल. कारण पूर्वी सर्व कागदपत्रे नोंदणीनंतर पुण्याला पाठवली जायची. परंतु आपला करारनामा नोंदणीकृत नसेल तर मात्र त्या करारनाम्याची प्रत मिळणे कठीण आहे. अशा वेळी आपण सदर करारनामा हरवल्याची पोलीस ठाण्यात तक्रार देऊन ठेवावी. भविष्यात ती आपल्याला उपयोगी पडेल.
३) आपली इमारत जुनी आहे. त्यामुळे आपण सध्या करारनामा नोंद झालेला नाही, याचे दडपण घेऊ नका. ती जेव्हा पुनर्विकासासाठी घेतली जाईल त्या वेळी सोसायटीशी जसा करारनामा होईल तसाच तो तुमच्यात व बिल्डरच्यातदेखील होईल व तो त्या वेळी नोंदला जाईलच. त्याअगोदर काही अडचण उद्भवल्यास वा विक्री करणे जरुरीचे झाल्यास आपण हमीपत्र बनवून  संस्थेला जबाबदारीतून मुक्त करून नुकसान झाल्यास त्याच्या भरपाईची हमी द्यावी. सदर ब्लॉक आपणाला विकावयाचा झाल्यास सोसायटीचे नो ऑब्जेक्शन  सर्टिफिकेट घेऊन तो विकण्यास काही अडचण येणार नाही. अर्थात, सदर ब्लॉक आपल्या नावावर नॉमिनेशनने झाला असेल तर आपल्या वडिलांच्या अन्य सहवारसांचेदेखील ना हरकत प्रमाणपत्र लागेल.
*  दिवाळीपूर्वी आम्ही नव्या घरात राहायला आलो. आमचे घर ७ व्या मजल्यावर आहे. त्याला ग्रील्स लावलेली नाहीत. याबाबत बिल्डरकडे विचारणा केली असता ग्रील्स लावायला अग्निशमन दलाकडून परवानगी नाही, असे सांगण्यात आले. आम्ही ग्रील्स लावायचे म्हटले  तर इमारतीचा ‘लुक’ जातो तेव्हा ते मीच लावेन त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील असेदेखील तो  सांगतो. तर दहा माळ्यांच्या इमारतीला ग्रील लावण्याबाबत काय नियम आहेत? परवानगी नसेल तर आता ग्रील कसे लावता येतील.
– कल्याणी नामजोशी, मुंबई.
* आपली बहुतांशी उत्तरे आपल्या प्रश्नातच आहेत. आपण ताबा घेऊन राहायला आल्या असल्यामुळे आपणाला आमच्या सल्ल्याप्रमाणे वागणे सोपे जाईल असे वाटते.
१) आपण बिल्डरला सांगावे, की आम्हाला ग्रील्स लावायचे नाहीत.
२) आम्हाला बी. एम. सी.चे ग्रील्स लावण्याचे नियम माहीत नाहीत. आपण ते एखाद्या आर्किटेक्टला विचारूनच घ्यावेत.
३) आपली गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यावर आपण संस्थेची परवानगी घेऊन सुरक्षिततेच्या कारणास्तव ग्रील्स लावण्याचा विचार करावा. तत्पूर्वी नियमांबद्दल खात्री करून घ्यावी.
४) आपण आपल्या संबंधित उपायुक्तांशी याबाबत चर्चा करावी हे उत्तम; परंतु तिथपर्यंत बिल्डरला वेगळे पैसे देऊन मुळीच ग्रील्स लावून घेऊ नयेत, असे आमचे स्पष्ट मत आहे.
* आमची इमारत नजीकच्या काळात रिडेव्हलपमेंटसाठी जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर आपण मला पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत-
१) कन्व्हेन्स डिम्ड म्हणजे काय?
२) आमचे ८ फ्लॅट मिळून एकूण एरिया ७९८० चौ. मीटर आहे व आम्ही सर्वजण मिळून ३९५ पागडी सिस्टीममधील भाडेकरू आहोत. बिल्डरने आम्हाला ३९५ फुटांची ऑफर दिली आहे, ही योग्य आहे का ?
३) बिल्डर क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीमखाली आमची इमारत रिडेव्हलप करणार असताना आम्हाला कमीत कमी ४०५ चौ. फूट वा जास्तीत जास्त ७५० चौ. फूट इतका एरिया मिळेल का?
– अमेय, मुंबई.
*     १) आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, कन्व्हेन्स डिम्ड म्हणजे खरेदीखत! जेव्हा
गृहनिर्माण संस्था अथवा तत्सम एखादी संस्था उदा. अपार्टमेंट, कंपनी इ. स्थापन होते तेव्हा ज्या जमिनीवर संस्थेची इमारत उभी असते. त्या जमिनीची मालकी जमीन मालकांकडून संस्थेच्या नावे होण्यासाठी जो दस्ताऐवज करतात त्याला  कन्व्हेन्स डिम्ड असे म्हणतात. यालाच मराठीत खरेदीखत असे म्हटले जाते.
२) या प्रश्नाचे उत्तर आपणाला एखादा वास्तुविशारद (आर्किटेक्टरच) सांगू शकेल.कारण एकूण क्षेत्रफळावर किती चटईक्षेत्र (एफएसआय) उपलब्ध होतो वा किती टी. डी. आर. मिळू शकतो याची उत्तरे फक्त वास्तुविशारदच देऊ शकेल. यासाठी आपण एखाद्या वास्तुविशारदामार्फत एवढय़ा एरियाला किती बांधकामाला परवानगी मिळेल व त्यातून खर्च वजा जाता बिल्डर, डेव्हलपर किती क्षेत्रफळ भाडेकरूला देऊ शकेल हे गणित मांडल्यावर त्याबद्दल आपणाला अंदाज येईल.
३) आपल्या तिसऱ्या प्रश्नासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटची नियमावली पाहणे आवश्यक ठरेल. कारण क्लस्टर डेव्हलपमेंटला मिळणारा एफएसआय किती असतो, याबद्दल आपल्याला वास्तुविशारदच योग्य ती माहिती देऊ शकतील.
याबाबतीत एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे सर्व भाडेकरूंनी मिळून एकजूट दाखविल्यास आपला चांगलाच फायदा होऊ शकेल.