नामदेव आज पहाटे चार वाजता गेला. मला ‘अज्र्या’ म्हणणारा ‘नाम्या’ मृत्यूशी झुंज घेत घेत थकला आणि शांत झाला. जवळजवळ या ३० वर्षांच्या स्नेहभावाच्या फक्त आठवणी उरल्या आहेत. नामदेव आणि माझ्यातले मतभेद व्यक्तिगत नव्हते. वैचारिकही नव्हते. होते ते संघटनात्मक पातळीवरचे. तरीही आम्ही सातत्याने भेटत राहिलो. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर जात-येत राहिलो. जीवघेण्या वेदना होत असताना लिहिलेल्या कविता त्याने रुग्णालयात ऐकविल्या. ‘गोलपिठा’ या काव्यसंग्रहाची नवी आवृत्ती जिव्हाळ्याने भरलेल्या शाईने लिहून सप्रेम भेट म्हणून दिली.
महायुतीच्या बैठकीत असताना मलिकाचा फोन आला. ‘नामदेव लास्ट स्टेजला आहे..’ रामदास आठवले यांना औरंगाबादला उपस्थित राहणे आवश्यक होते. पोपटशेट घनवट आणि मी इस्पितळात पोहोचलो. मलिका, जयदेव गायकवाड आणि इतर कार्यकर्ते होते. व्हेंटिलेटरच्या नळ्या सर्व शरीरात खुपसलेल्या. फक्त वादळ थंड होत चालले होते.
नामदेवच्या बरोबर मी दलित पँथरमध्ये राहिलो. पँथरच्या काळातील नामदेवची भाषणे मी आठवत होतो. नामदेवच्या भाषणाची एक शैली होती. त्या शैलीचा प्रभाव पुढे अनेक कार्यकर्त्यांवर पडला. भाषणाची जशी स्वतंत्र शैली होती तशीच त्याच्या कवितेचीदेखील वेगळी शैली होती.
नामदेवने सामाजिक, राजकीय क्षेत्रात अनेक भूमिका वठविल्या. लोक त्यांच्या ह्य़ा भूमिका विसरले. फक्त नामदेव ढसाळ हा कवी म्हणून लोकांच्या मनात घर करून बसला.
ढसाळची कविता म्हटली म्हणजे लोकांच्या मनात ‘गोलपिठा’ उभा राहतो. आणि ते साहजिक आहे. ‘गोलपिठा’ने अवघे मराठी साहित्यविश्व हादरवून टाकले होते. ‘गोलपिठय़ा’ची शब्दकळा, अनुभवविश्व, प्रतिमाविश्व हे मराठी कवितेला अनोखे होते. अनेक समीक्षकांना ‘गोलपिठा’चे परीक्षण करणे जमत नव्हते. सांगायचा मुद्दा हा ‘गोलपिठा’चे पहिले परीक्षण ‘दलितांच्या वेदनांचा स्फोटक अविष्कार’ या शिर्षकाखाली लिहिले. त्यात मी लिहिले होते की, दलित साहित्य समजून घ्यायचे असेल तर नवीन शब्दकोशाची गरज आहे आणि ह्य़ा साहित्याची समीक्षा पारंपारिक समीक्षा मुल्यांच्या चौकटीत होऊ शकणार नाही. नवी समीक्षा मूल्ये सजवायला हवीत. समाधानाची गोष्ट ही की आज दलित-ग्रामीण शब्दकोश ‘मराठी राज्य विकास मंडळा’तर्फे प्रकाशित झाला आहे. आणि पारंपारिक समीक्षा मूल्ये देखील हळुहळू साहित्यविश्वातून हद्दपार होत आहेत.
मुद्दा हा की नामदेवला केवळ विद्रोही कवी म्हटले तर त्याच्या एकूण ११ कवितासंग्रहात परिवर्तनवादी संवेदशीलता तर दिसतेच. पण एक चिंतनशीलता आणि दार्शनिक अधिष्ठान देखील दिसते. तरी देखील ती गूढ आणि अनाकलनीय होत नाही. उलट ती स्पष्ट निर्भिड होते आणि त्याचे कारण म्हणजे नामदेवच्या कवितेने मानवी मुल्यांशी जोडलेली नाती कधीच तोडली नाही. म्हणूनच दिलीप चित्रे यांनी नामदेवच्या कवितेची तुलना तुकारामाच्या कवित्वाशी केली आहे.
केवळ कविताच नाही तर अनेक विषयांवर त्यांनी लिखाण केले आहे. सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक विषय आहेत. अलिकडेच त्याची जी भीमगीतांची कॅसेट आली आहे. त्यात पारंपारिक भीमगीतांना वेगळा आयाम दिला आहे. नामदेव हा मैत्रीला जागणाला आणि मित्रत्त्वाला जपणारा होता. त्याच्या विषयी खूप लिहिता येईल. तरूणपिढीला ऊर्जा या महाकवीला ज्याने मराठी कविता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली त्याला अभिवादन.