मणिपूरमध्ये बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे १८ जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर बंडखोरांचा माग काढत भारतीय जवान म्यानमारमध्ये पोहोचले. तेथे संयुक्त कारवाईत भारतीय जवानांनी अनेक बंडखोरांना कंठस्नान घातले. या यशस्वी मोहिमेचा लेखाजोखा..

४ जून गुरुवार
मणिपूरमध्ये नागा बंडखोरांच्या हल्ल्यात १८ जवान शहीद, ११ जखमी. सकाळी आठच्या सुमारास झालेल्या या भीषण घटनेची बातमी आली आणि दिल्लीतील साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकला जबरदस्त धक्का बसला.
त्याचे कारणही तसेच होते. नागालँड, मणिपूर, अरुणाचलमध्ये ‘ऑपरेशन हिफाजत’ सुरू होते. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड – एनएससीएन – च्या खापलांग गटाने सरकारी युद्धबंदी धुडकावून लावली होती. त्याच्याशी अन्य बंडखोर गटांना झुंजविण्याची योजना केंद्रीय गृहमंत्रालयाने आखली होती. पण त्यापूर्वीच या गटाने अगदी जाहीर आव्हान देऊन हा भीषण हल्ला केला होता. धक्का सुन्न करणारा होता.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने संरक्षणमंत्री मनोहर पíरकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि लष्करप्रमुख जन. दलबीरसिंग सुहाग यांची बठक बोलावली. नागा बंडखोरांना आता कायमचा धडा शिकवण्याची वेळ होती. भारतात कारवाया करायच्या आणि म्यानमारच्या जंगलात जाऊन लपायचे ही त्यांची खोड आता मोडायलाच हवी होती. शिवाय, मिल्रिटी ऑपरेशन्सचे अतिरिक्त महासंचालक मेजर जन. रणबीरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागा बंडखोर आणखी हल्ले करणार असल्याचे संदेशही लष्कराने टिपले होते. तेव्हा आता वेळ न दवडता बंडखोरांच्या तळांवर हल्ला चढवणे आवश्यक झाले होते. पण त्यासाठी म्यानमारमध्ये घुसावे लागले असते.
अर्थात त्यात नवे काही नव्हते. यापूर्वीही भारतीय लष्कराने आणि गुप्तचरांनी अन्य देशात – अगदी पाकिस्तानातसुद्धा – घुसून अशा कारवाया केल्या आहेत. लष्कर-ए-तय्यबाने २०००च्या फेब्रुवारीत दोडा आणि राजौरी जिल्ह्य़ांत िहदूंचे हत्याकांड केले. त्याच महिन्याच्या २४ तारखेला पाकव्याप्त काश्मीरमधील लांजोटे या गावातील मुस्लिमांचे अगदी तसेच हत्याकांड झाले. तेथे ९० वर्षांच्या एका वृद्धापासून दोन वर्षांच्या बालकापर्यंत काही जणांचे हातपाय तोडण्यात आले होते. मुंडकी उडविण्यात आली होती. हे हत्याकांड कोणी केले ते अखेपर्यंत गोपनीयच राहील. पण ज्यांनी ते केले त्यांनी जाताना त्या गावात भारतीय बनावटीचे एक घडय़ाळ आणि चिठ्ठी ठेवली होती. त्यात लिहिले होते : अपना खून देख के कैसा लगता है? हे हत्याकांड भारतीय लष्कराच्या स्पेशल फोस्रेसनी केले म्हणून आजही पाकिस्तान ओरडत आहे.
राजीव गांधी यांच्या काळात तर रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेने काऊंटर इंटेलिजन्स टीम – एक्स नावाचे पथकच तयार केले होते. खलिस्तानवाद्यांच्या हल्ल्यांचा सूड ते पथक पाकिस्तानात जाऊन घेत असे. रॉचे अधिकारी बी. रमण यांनीच हे लिहून ठेवले आहे.
आणि म्यानमारशी तर आपला करारच होता. त्यानुसार नरसिंह राव सरकारच्या काळात एप्रिल-मे १९९५ मध्ये म्यानमारमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत ३८ बंडखोरांना कंठस्नान घालण्यात आले होते. तर ११८ जणांना अटक करण्यात आली होती. ‘ऑपरेशन गोल्डन बर्ड’ म्हणून ती मोहीम ओळखली जाते.
आता पुन्हा तशीच मोहीम हाती घ्यावी असा सूर नॉर्थ ब्लॉकमधील त्या बठकीत उमटू लागला होता. उद्या म्हणजे शुक्रवारीच हल्ला करावा असा काहींचा आग्रह होता. परंतु तसे शक्य नाही हे अजित डोवल आणि जन. दलबीरसिंग यांना माहीत होते. अखेर सोमवारचा दिवस नक्की करण्यात आला.
५ जून शुक्रवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यास आज सुरुवात होणार होती. चित्रवाणी वाहिन्यांवर त्याचा उत्सव साजरा केला जात असताना इकडे हल्ल्याच्या योजनेची आखणी सुरू झाली होती. मणिपूर हल्ल्याचा बदला घेण्याची लष्कराची इच्छा असल्याचे पíरकर यांनी सकाळीच नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातले होते. लष्करप्रमुख दलबीरसिंग मंगळवारी ब्रिटनला जाणार होते. त्यांनी ती भेट पुढे ढकलली. अजित डोवल हेही बांगलादेशला जाणार होते. त्यांनीही दौरा रद्द केला. दोघे मिळून मणिपूरला गेले.
या हल्ल्याची कल्पना म्यानमारला देणे आवश्यक होते. ती जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाची होती. आँग सान सू ची यांना नेहरू शांतता पुरस्कार दिल्यापासून म्यानमारचे लष्करशहा भारतावर नाराज होते. परंतु मनमोहन सिंग यांच्या काळातच त्यांची नाराजी दूर करण्यात परराष्ट्र खात्याला यश आले होते. एकीकडे सू ची यांना पािठबा आणि दुसरीकडे लष्करशहांना मदत अशी तारेवरची कसरत या खात्याचे अधिकारी लीलया करीत होते.
म्यानमारी लष्करशहा बंडखोरांच्या बाबतीत भारताला साह्य़ करीत असतात याचे एक कारण अर्थातच म्यानमारला भारताकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रपुरवठय़ातही आहे. त्यामुळेच गेल्या ऑगस्टमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्यानमार दौऱ्यावर गेल्या असताना म्यानमारने हे सहकार्य कायम ठेवण्याची ग्वाही दिली होती. आता ती प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली होती. अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या योजनेला अंतिम मंजुरी मिळाली नव्हती. सर्वानाच तिची प्रतीक्षा होती.
मात्र एका वृत्तानुसार पंतप्रधानांनी बांगलादेशला जाण्यापूर्वी संरक्षणविषयक कॅबिनेट समितीची बठक घेऊन तशी परवानगी दिली होती.
६ जून शनिवार
यानमारच्या लष्करी अधिकाऱ्यांना त्याची कल्पना द्यावी अशी सूचना संबंधित भारतीय लष्करी अधिकाऱ्यास देण्यात आली. म्यानमारमधील राजदूत गौतम मुखोपाध्याय आणि संरक्षण अटॅशे कर्नल गौरव शर्मा यांना या हल्ल्याची कल्पना देण्यात आली. मात्र मंगळवारी कार्यालये उघडली की मगच – म्हणजे हल्ला अगदी उरकून गेल्यावर – म्यानमारच्या परराष्ट्र खात्याला ही माहिती द्या असे मुखोपाध्याय यांना सांगण्यात आले.

७ जून रविवार
२१ पॅराचे कमांडो या धाडसी मोहिमेसाठी सज्ज झाले होते. त्यांच्याकडे लहान शस्त्रे, रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेड्स, अंधारातही ज्याच्या साह्य़ाने पाहता येऊ शकते ते थर्मल इमेजर्स आणि स्फोटके असा ‘पुरेसा’ शस्त्रास्त्रसाठा होता. त्यांच्या साह्य़ाला पिछाडीवर लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान होते. वायुदलाची एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टरही तयार ठेवण्यात आली होती. पहाटे दीड-दोनच्या सुमारास लष्कराच्या ध्रुव हेलिकॉप्टरने त्यांना सीमेवर, मात्र भारताच्या भूमीत उतरविले. तेथे ते दोन गटांत विभागले. एक गट ओंझियोच्या तळाकडे गेला. दुसरा पोन्योकडे. हे दोन्ही तळ सीमेपासून जवळजवळ ११ किमी अंतरावर आहेत. या तळांनजीक ते

पोचले तेव्हा मंगळवार पहाटेचे तीन वाजले होते. दोन्ही तळांवर शांतता होती. योग्य अंतरावर गेल्यानंतर कमांडोंनी प्रथम आजूबाजूच्या परिसराची, रस्त्यांची नीट पाहणी केली. भूसुरुंगांचा, छुप्या हल्ल्याचा धोका होता. आता ते रांगत रांगत तळाकडे सरकू लागले आणि.. पुढच्या ४५ मिनिटांत काय काय घडले ते कोणालाच माहीत नाही. माहीत आहे ते एवढेच, की त्या ४५ मिनिटांत दोन्ही तळांची राखरांगोळी झाली होती. अर्धवट झोपेत असलेल्या बंडखोरांना भारतीय जवानांनी कायमचे झोपविले होते. अत्यंत धाडसी अशी मोहीम त्या जाँबाज सनिकांनी फत्ते केली होती.

८/९जून सोम./मंगळ.
या हल्ल्यात किती बंडखोर मारले गेले. आकडे वेगवेगळे आहेत. अगदी १०० पासून ३८ पर्यंत. लष्कराने मात्र अद्याप अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. मात्र लष्करी सूत्रांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात किमान २० बंडखोर ठार झाले. गृहमंत्रालय मात्र ५०च्या खाली येण्यास तयार नाही.
इंडियन एक्स्प्रेसने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लष्कर आणि गुप्तचर यांनी या हल्ल्यानंतरची जी माहिती गोळा केली आहे त्यानुसार आतापर्यंत केवळ सात मृतदेह हाती लागले आहेत. आणि बंडखोरांचे जे वायरलेस संभाषण टिपण्यात आले आहे त्यानुसार १२ हून कमी बंडखोर जखमी झाले आहेत. अद्याप सरकार वा लष्कराने या वृत्ताचा इन्कार केलेला नाही. याच वृत्तानुसार, एनएससीएन-के चे या हल्ल्यात फार नुकसान झाले नाही. पोन्यो तळावर या संघटनेचा कथित लेफ्ट. जन. निकी सुमी होता. पण तो त्याच्या ४० साथीदारांसह पळून जाण्यात यशस्वी झाला आणि ओझियो तळावरील बंडखोरांचा तर एनएससीएन-केशी संबंधच नव्हता.
मग या हल्ल्याने साधले काय? ते येणाऱ्या दिवसांत – ईशान्य भारतातील परिस्थितीतील बदलांतून, म्यानमारच्या प्रतिक्रियांतून, मोदी यांनी नागा शिष्टमंडळाशी केलेल्या चच्रेच्या फलितातून – समजेल.
एक मात्र खरे, की भारतही आक्रमक होऊ शकतो हे यामुळे भारतीयांना समजले. पूर्वी अशा घटनांचा गाजावाजा होत नसे. त्यामुळे असंख्य राष्ट्रप्रेमी या सुखावह व थरारक भावनेपासून वंचित राहात असत. (माहितीस्रोत – इंडियन एक्स्प्रेस)