तळागाळातल्यांचा सर्वागीण विकास साधायचा असेल तर आधी त्यांचं आरोग्य सुदृढ हवं, त्यांना स्वच्छता, कुटुंब नियोजनाचं महत्त्व पटवून द्यायला हवं हे सूत्र ठरवून रॉयवादी धुरीणांनी मुंबईत एका संस्थेचे बीज पेरले त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. समाजाच्या सर्वागीण विकासासाठी नेमके कोणते भरीव उपक्रम राबवले जावेत याचा वस्तुपाठच सीएसएससीने घालून दिला. त्यांच्या कार्याला आर्थिक विवंचनेमुळे खीळ बसू नये यासाठी मदतीचे हात पुढे यावेत..

‘सर, मुझे अपने बँक मे दस रुपये जमा करने है. अब तक मेरे खाते मे कितने पैसे जमा होंगे. ईद मे मुझे कुछ पैसे निकालने है. नये कपडे लेने है’.. बेहरामपाडय़ात राहणारा आठ वर्षांचा इमरान १० रुपयांची नोट बँकेत जमा करू पाहात होता. ही नोट अम्मीने त्याला खाऊसाठी दिली होती. गोळ्या बिस्किटांवर नोट न मोडता इमरानने ती जपून ठेवली आणि ती जमा करण्यासाठी घेऊन आला होता.

Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

शहरातल्या कोणत्याही शाळेत ८ ते १४ वयोगटातल्या विद्यार्थ्यांना बँक हमखास माहीत असेल. पण, बँकेत गेल्यावर पैसे कसे जमा करायचे, काढायचे या आणि अन्य व्यवहारांची माहिती प्रत्येकाला असतेच असे नाही, किंबहुना नाहीच. हे वय अभ्यासाचं, खेळण्याचं, मजा-मस्ती करण्याचं. इतक्यातच बँकेतले काटेकोर व्यवहार मुलांनी का म्हणून समजून घ्यायचे? शिकून मोठी झाली, कमावती बनली की समजतीलच ना आपोआप हे व्यवहार. ही सर्वसामान्य पालकांची मानसिकता. पण ‘सेंटर फॉर दी स्टडी ऑफ सोशल चेंज’ या संस्थेचं मत थोडं वेगळं आहे. लहान मुलांना पैशांचं महत्त्व, गुंतवणुकीचे फायदे समजणं आवश्यक आहे, असं ही संस्था मानते. शाळेसाठी घराबाहेर पडताना आईने खाऊसाठी हातावर ठेवलेली चिल्लर असो किंवा वाढदिवसाला नातेवाईकांनी भेट म्हणून दिलेली करकरीत नोट असो, ती साठवून ठेवण्याची वृत्ती मुलांमध्ये आत्तापासूनच भिनवण्यासाठी ‘सीएसएससी’ने लहान मुलांसाठीची मुलांकडूच चालवली जाणारी बँक सुरू केली.

‘सीएसएससी’च्या विश्वस्त डॉ. शैलजा तेलंग, समुपदेशक विद्या देशमुख सांगतात, ४४ वर्षांपासून ‘सीएसएससी’ वांद्रे पूर्वेकडल्या भारतनगर, गुलशन नगर, वाल्मिकी नगर, ज्ञानेश्वर नगर, तीन बंगला, विजय नगर, इंदिरा नगर, दीपक वाडी, हनुमान टेकडी, शांतीलाल कम्पाऊंड, नेहरू नगर, बेहरामपाडा व बेहराम नगर, खेरवाडी अशा मुस्लीमबहुल झोपडपट्टय़ांमध्ये काम करते आहे. समाजापासून दुरावलेल्या वंचितांना केवळ आर्थिक मदत न करता त्यांना स्वत:च्या समस्या स्वत:च सोडवण्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, हे संस्थेचं तत्त्व आहे. त्याअनुषंगाने संस्थेने विविध उपक्रम राबवले आहेत. मुलांची बँक म्हणजेच बालविकास खजाना हा उपक्रम त्यापैकीच एक.

दिल्लीच्या ‘बटरफ्लाईज’ संस्थेने रस्त्यांवरील मुलांसाठी हा उपक्रम देशात चार ठिकाणी राबवला आहे. ‘सीएसएससी’च्या माध्यमातून हा उपक्रम मुंबईत राबवला जात आहे. बाल विकास खजाना म्हणजेच आमच्या बँकेचे प्रबंधक, सहप्रबंधक ही जबाबदारी मुलांवरच आहे. दर सहा महिन्यांनी मुलंच या दोन पदांची निवड करतात. बँकेचे नियम मुलंच ठरवतात. नियमितपणे शाळेत जाणारा, स्वच्छता पाळणारा, स्वच्छ कपडे घालणारा, व्यसनांकडे न आकर्षित होणाराच बँकेत खातं उघडू शकतो. हे नियम मुलांनी स्वत:हून केले आहेत, डॉ. तेलंग आनंदाने सांगतात. अगदी एक रुपयाही मुलं आपल्या खात्यावर जमा करू शकतात. पण हा एक रुपया कोणी दिला, कुठून आला हे त्याने प्रबंधक, सहप्रबंधकाला सांगणं बंधनकारक आहे. साधारणपणे मुलं नवे कपडे, चप्पल किंवा सणासुदीत, वाढदिवसासाठी पैसे काढतात. सर्व खात्यावर जमा होणारी रक्कम, काढलेली रक्कम याचा हिशोब ठेवला जातो. त्यासाठी पावत्या भरून घेतल्या जातात. बालविकास खजानाचे सर्व व्यवहार बँकेप्रमाणेच चालतात, चालवले जातात. फक्त त्यावर संस्थेकडून देखरेख ठेवली जाते. २०१४मध्ये हा उपक्रम सुरू झाला. त्याला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत ३१२ मुलांची खाती नियमित सुरू आहेत. त्यावर साधारण ३५ हजार रुपये जमा आहेत. मुलांना बँकेतले व्यवहार समजावेत, अन्य गुंतवणुकीसंदर्भात नित्यनियमाने अभ्यासवर्ग भरवले जातात.

यालाच जोडून जोडून संस्थेने बाल आरोग्य सहयोग हा उपक्रमही सुरू केलाय. स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, क्षयरोगासारखा आजार होऊच नये यासाठी काय करावं, छोटय़ा दुखापतीनंतर प्रथमोपचार कसा करावा, प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेलं साहित्य याचे धडे मुलांना दिले जातात. ‘बटरफ्लाईज’ संस्था दरवर्षी वेगळा विषय घेऊन लहान मुलांची आंतरराष्ट्रीय परिषद भरवते. ‘सीएसएससी’ही त्यात प्रतिनिधीत्व करते.

या वस्त्यांच्या सर्वागीण विकासासाठी सीएसएससीने ‘प्रोजेक्ट वीन’ सुरू केलाय. ‘वीन’ म्हणजे ‘विमेन ऑफ इंडिया नेटवर्क’. सुरुवातीला संस्थेने या झोपडपट्टय़ांमध्ये २० दवाखाने सुरू केले. काही जागा भाडय़ाने घ्याव्या लागल्या, तर काहींनी स्वत:हून आपल्या जागा दवाखान्यांसाठी दिल्या. सध्या यापैकी १५ दवाखाने सुरू आहेत. या दवाखान्यांतून अत्यल्प दरात तपासणी आणि औषधं पुरवली जातात. प्रत्येक आरोग्यसेविकेवर २५० घरांची जबाबदारी आहे. सुरुवातीला संस्थेच्या ८० आरोग्यसेविका होत्या. सध्या ही संख्या निम्म्यावर आली असली तरी त्या एक लाख घरांपर्यंत पोहोचतात.

सुदृढ आणि बुद्धिमान भावी पिढीसाठी..

निव्वळ दवाखान्यांवर चांगली आरोग्य सेवा देणं शक्य नाही. खोलवर उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर, यंत्र-उपकरणांची निकड लक्षात घेऊन संस्थेने पाचेक वर्षांपूर्वी अद्ययावत पॉलिक्लिनिक सुरू केले आहे. त्यात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, कान-नाक-घशासह नेत्रचिकित्सक, त्वचारोगतज्ज्ञ आणि दंतचिकित्सकांकडून तपासणी केली जाते. त्यासोबत एक्स रे, पॅथालॉजिकल चाचण्या, फिजिओथेरपी या सेवाही दिल्या जातात. असंच एक क्लिनिक संस्थेने नेहरूनगर परिसरात सुरू केले आहे.

वस्तीत लहान मुलांना खेळायला जागा नाही. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्यातील सुप्त कलागुण ओळखून त्या त्या क्षेत्रात मुलांनी नशीब अजमावावे या उद्देशाने संस्थेने ‘ब्लॉसम’ हा खास लहान मुलांसाठीचा उपक्रम सुरू केला आहे. हे एक संस्कार केंद्र आहे. दररोज संध्याकाळी दोन तास मुलांनी संस्थेच्या मुख्यालयात जमायचं, मोकळ्या सभागृहात मनमोकळं खेळायचं. कॅरम, बुद्धिबळ, वाचनालयातली पुस्तकं इथे आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत योग, जिम्नॅस्टिक्सपासून क्रीडाप्रकार, अभ्यास वर्ग, चित्रकला, हस्तकलेच्या कार्यशाळा असा भरगच्च कार्यक्रम संस्थेने सुरू केला. या कार्यक्रमाला मात्र मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

संस्थेचं कौटुंबिक समुपदेशन केंद्र आहे. मुख्यत: कौटुंबिक कलह, हिंसाचाराची प्रकरणं या केंद्राकडे येतात. समुपदेशन करून ती सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. नाही सुटली तर तज्ज्ञांकडून समुपदेशन दिलं जातं. वस्तीतली मुलं अध्र्यावरच शिक्षण सोडू नयेत यासाठी खास अभ्यास वर्ग संस्थेमार्फत सुरू आहेत. त्यात पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना शिकवलं जातंय. गेल्या वर्षी अभ्यास वर्गात येणाऱ्यांपैकी सर्वच मुलं दहावी उत्तीर्ण झाली.

गर्भधारणेपूर्वी माता सुदृढ नसेल तर ती अशक्त बाळ जन्माला घालते, हे बाळ मध्यम वयात येते तेव्हा त्याला हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब असे विकार जडतात. त्यामुळे गर्भधारणेपूर्वीच महिलेला कशा प्रकारे सक्षम, सुदृढ करता येईल यासाठी गेल्या १२ वर्षांपासून सीएसएससीकडून प्रयोग सुरू आहे. ‘सरस’ असं या प्रयोगवजा उपक्रमाचं नाव आहे. या प्रयोगाचं आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांमधून कौतुक झालंय.

संस्थेपर्यंत कसे जाल?

  • सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज एम. एन. रॉय ह्य़ूमन डेव्हलपमेंट कॅम्पस, उत्तर भारतीय भवनच्या बाजूला वांद्रे (पूर्व) मुंबई-५१
  • धनादेश –सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज(Centre for the study of social change) या नावाने काढावा. धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.
  • देणगी ‘८०-जी (५)’ अंतर्गत करसवलतीस पात्र.

डॉक्टर आणि विविध क्षेत्रांतील सुशिक्षित, सेवाभावी व्यक्तींच्या जोरावर संस्थेचा पसारा वाढवण्याची धडपड सुरू आहे. आर्थिक मदतीची आवश्यकता आहेच, पण त्याहून अधिक संस्थेच्या ध्येयाशी एकरूप होत नि:स्पृहपणे काम करणारी माणसंही हवी आहेत.

डॉ. रमेश पोतदार, अध्यक्ष

यासाठी मदत हवी

‘सीएसएससी’कडून समाजाच्या सर्वागीण विकासासाठी भरीव उपक्रम राबवले जातात. आणखी अनेक उपक्रम राबविण्याचा विचार सुरू आहे. पण अर्थसहाय्य अपुरे पडते. काही उपक्रमांना परदेशातून देणग्या येत होत्या. मात्र  युरोप, अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीनंतर अनेक संस्थांनी हात आखडते घेतले. सध्या संस्थेचं कार्य वैयक्तिक देणग्यांवर सुरू आहे. संस्थेसाठी आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, आरोग्यसेविका, औषधे,  शिक्षक, वेळोवेळी कार्यशाळा घेणारी तज्ज्ञ मंडळी, प्रशासकीय कर्मचारी, साहित्य, वाहनं आदीचा खर्च जास्त आणि देणग्या अपुऱ्या अशी परिस्थिती संस्थेची आहे. त्यातल्या त्यात संस्थेशी जोडलेले शिक्षक, डॉक्टर अत्यल्प मानधनावर सेवा देत आहेत. डॉ. शेखर भोजराज, अरुणा चुरी, विद्या देशमुख या व अशा अन्य पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर हरप्रकारे आर्थिक सहाय्य करत संस्थेचं कार्य जिवंत ठेवलंय.

थोरा-मोठय़ांची प्रेरणा..

सन १९७२ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राध्यापक जी. डी. पारीख, ए. बी. शहा, एन. व्ही. सोवनी, डॉ. सोमया, गोविंदराव तळवळकर, टी. एन. शानबाग यांच्यासारख्या प्रतिष्ठित, बुद्धिवंतांनी एकत्र येऊन ‘सीएसएससी’ संस्थेची स्थापना केली. डॉ. इंदुमती पारीख यांनी तब्बल २० र्वष संस्थेची धुरा प्रभावीपणे सांभाळली. तळागाळातल्यांचा सर्वागीण विकास साधायचा असेल तर आधी त्यांचं आरोग्य सुदृढ हवं, त्यांना स्वच्छता, कुटुंब नियोजनाचं महत्त्व पटवून द्यायला हवं हे त्यांचं सूत्र होतं.

‘सीएसएससी’च्या विश्वस्त अरुणा चुरी यांनी संस्थेच्या सुरुवातीच्या काळातले अनुभव सांगितले. ‘त्या काळात या मुस्लीमबहुल मोहल्ल्यांमधल्या प्रत्येक घरात एकेका दाम्पत्याला पाच, सात, दहा मुलं होती. ही अपत्ये जन्माला घालणाऱ्या स्त्रीचे हाल, पतीच्या तुटपुंज्या मिळकतीत इतक्या तोंडांना मीठभाकरी लावताना तिचा जीव मेटाकुटीला येतो ही जाणीव मात्र नव्हती. त्यामुळे कुटुंबनियोजन, त्याचे फायदे वस्तीला पटवून देणं महत्त्वाचं होतं. मात्र, समज, भीती, भावना यासमोर त्या काळातलं ते मोठं आव्हान होतं. घरातल्या स्त्रीला आता थांबावं, असं वाटत होतं. पण पतीची इच्छा, वडीलधाऱ्यांचा धाक यापुढे तिचं काहीच चालत नव्हतं. हे लक्षात घेऊन आम्ही घरातल्या वडीलधाऱ्यांनाच गाठलं. उत्पन्न, वाढती महागाई, मुलांची शिक्षणं, राहती अपुरी जागा हे त्यांना पटवायचो. चेतना महाविद्यालयासमोर माझं घर आहे. शस्त्रक्रिया, तांबी बसवून घेण्यासाठी तयार झालेल्या बायकांना वस्तीतून गाडीत घालून घरी आणायचे. पुढे बसमधून दादरला क्लिनिकमध्ये न्यायचे. रोजच्या रोज आठ-दहा बायका असायच्याच. एक तयार झाली की इतर हट्ट करायच्या. आमचं काम हलकं होत होतं.’

धनादेश येथे पाठवा.. एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्तात प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
  • महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, मआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
  • ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
  • पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
  • नाशिक कार्यालय : संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
  • नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३
  • औरंगाबाद कार्यालय : संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
  • नगर कार्यालय : संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
  • दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००