शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होतेय. आपण आजपासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहोत. हा कांगारूंचा दे श तसा आधुनिक काळात डेव्हलप झालेला.  पण इथले मूळ रहिवासी असणाऱ्या आदिवासींच्या साध्या जेवणातील खासे पदार्थ इथल्या आधुनिक खाद्यसंस्कृतीत छान समरसून गेले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या आजच्या संस्कृतीमध्ये जरी वेगवेगळ्या देशांचा प्रभाव दिसत असला, तरी तिथल्या मूळच्या रहिवाशांचा (इंडिजिनिअस ऑस्ट्रेलियन्सचा) ठसा नक्कीच प्रकर्षांने जाणवतो. सिडनीच्या बंदरावर फेरफटका मारताना ‘सोव्हेनिअर्स’च्या दुकानांमध्ये साधारणपणे इंग्रजी ‘एल’ शेपचं बुमरँग दिसलं. हे येथील आदिवासींचं लाकडापासून बनवलेलं एक शिकारीचं शस्त्र. याची रचना अशी की, हवेत विशिष्ट पद्धतीने फेकल्यानंतर ते काही अंतरावर जाऊन परत फेकणाऱ्याकडे येतं. ज्या माणसाने याचा शोध लावला असेल त्याला खरंच सलाम. त्या दुकानातून एक बुमरँग विकत घेतलं आणि थोडासा पुढे चालत गेलो. तिथेच डावीकडे एक माणूस तिथल्या आदिवासींच्या पेहेरावात चेहऱ्यावर पांढरा रंग फासून हातात लांबलचक पाईपासारखं वाद्य वाजवत बसला होता. त्याने डोळ्यात काजळ घातलं होतं आणि आपल्या फुप्फूसाच्या पूर्ण क्षमतेने तो त्या पाइपमध्ये फुंकर मारत होता. हे करताना एका हाताने त्या पाइपवर तो वेगवेगळ्या अंतरावरती कशाने तरी ठोकत होता आणि यामुळे एक तालबद्ध पण घुमणारा नाद निर्माण होत होता. या वाद्याला ‘डीडरीडू’ असं म्हणतात. अशा प्रकारचं वाद्य आणि त्या पोशाखातला तो माणूस मी पहिल्यांदाच बघत होतो. त्याचं ते वादन ऐकण्याचा अनुभव खूप वेगळा, अचंबित करणारा होता. या डीडरीडूच्या तालावर इथल्या प्राचीन रहिवाशांची लोकनृत्यं रंगत असत. माणूस या जातीला संगीताची, कलेची आवड कशी निर्माण झाली असेल, याची सुरुवात नक्की कशी झाली असेल, याचं खरंच मला कुतूहल वाटतं.
ऑस्ट्रेलियाचा खूप मोठा प्रदेश हा सपाट मदानांचा आहे आणि या मदानांवर राज्य करणारे ‘कांगारू’ ही ऑस्ट्रेलियाची ओळख आहे. ती या देशाची निशाणीच आहे आणि म्हणूनच ऑस्ट्रेलियन डॉलरच्या नाण्यावर ५ कांगारूंचे चित्र आहे. प्राचीन काळापासून कांगारूचं मांस इथे लोकप्रिय खाद्य म्हणून खाल्लं जातं. तिथल्या एखाद्या स्पेशालिटी रेस्टॉरंटमध्ये गेलात तर तुम्हाला ‘कांगारू स्टेक विथ रेड वाईन सॉस’ अशा काही डिशेस सहज दिसतील. इथली स्थानिक खाद्यसंस्कृती आणि इतर देशांच्या घटकांचा प्रभाव यातून एक नावीन्यपूर्ण खाद्यसंस्कृती ऑस्ट्रेलियामध्ये निर्माण होताना दिसते.

ऑस्ट्रेलियन क्रिस्पी बेक्ड फिश

साहित्य : पापलेट किंवा कोणत्याही आवडणाऱ्या माशाचे तुकडे
मिल्क मिक्सचर :  व्हिनेगर- अर्धा टीस्पून, मोहरीची पेस्ट – एक टेबल स्पून, ऑलीव्ह ऑइल – २ टीस्पून,
ब्रेडिंग : मक्याचे पीठ – अर्धा कप, ब्रेड क्रम्स – २ टीस्पून, मीठ – एक टीस्पून, ओनियन पावडर (नसेल तर बारीक चिरलेला कांदा वापरा) – एक टी स्पून, गार्लिक पावडर (पावडर उपलब्ध नसेल तर लसूण बारीक चिरून वापरा) – एक टी स्पून, काळी मिरीपूड – अर्धा टी स्पून, थाईम हर्ब – अर्धा टी स्पून.
गाíनशकरिता : गार्लिक मेयोनीज
कृती : ऑलीव्ह ऑइल, व्हिनेगर आणि मोहरी पेस्ट, मीठ एकत्र करून घ्या आणि १५ मिनिटे बाजूला ठेवा. दुसऱ्या एका बाऊलमध्ये मक्याचे पीठ व इतर सर्व साहित्य एकत्र करा. आता मासे मोहरीच्या मिश्रणात डीप करून नंतर मका ब्रेडच्या मिश्रणात घोळवा. एका पॅनला थोडे ऑलीव्ह ऑइल लावून घ्या. त्यामध्ये माशाचे तुकडे ठेवून पॅन ओव्हनमध्ये ठेवा. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत १८० डिग्रीवर बेक करा. किंवा आवडत असेल तर डीप फ्राय करू शकता. िलबाबरोबर सव्‍‌र्ह करा.

चॉकलेट कोकोनट स्क्वेअर
साहित्य : बटर – १०० ग्रॅम, कॅस्टर शुगर – १०० ग्रॅम, अंडी – दोन, मदा – १४० ग्रॅम, बेकिंग पावडर – एक टी स्पून, कोको पावडर – २ टी स्पून, दूध – २ टेबल स्पून.
आयसिंगकरिता साहित्य :- प्लेन चॉकलेट (तुकडे केलेले) – १०० ग्रॅम, बटर – २५ ग्रॅम, कॅस्टर शुगर – १०० ग्रॅम, खोबरे पावडर किंवा डेसिकेटेड कोकोनट – १०० ग्रॅम
कृती : ओव्हन १८० डिग्रीवर प्री-हीट करा. चौकोनी बेकिंग ट्रेला बटर लावून घ्या. बटर आणि शुगर एकत्र फेटून घ्या. नंतर त्यात अंडं टाका. त्यात एक टेबल स्पून मदा घाला. यामध्ये बेकिंग पावडर आणि कोको पावडर टाकून मेटल स्पूनने फोल्ड करा. नीट मिक्स करून घ्या. १८ ते २० मिनिटे बेक करा.
आयसिंग बनविण्याकरिता एका पॅनमध्ये चॉकलेट, बटर आणि चार टेबल स्पून पाणी घ्या. चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा. गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर त्यात आयसिंग शुगर टाकून मिक्स करून घ्या. ट्रेमधून केक काढून घ्या. त्याचे १६ चौकोनी तुकडे करा. तयार आयसिंगमध्ये हे तुकडे डीप करा. आणि खोबऱ्याच्या किसामध्ये घोळवून घ्या. कूलिंग रॅक वर सेट करायला ठेवा.

आजची  सजावट
हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कार्व्हिंग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
कोकोचं डिझाईन
प्लेट डिझाइनिंगसाठी कोको पावडरचा आपण छान वापर करू शकतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे हव्या त्या वस्तू प्लेटमध्ये ठेवून कोको पावडर भुरभुरायची. स्टेन्सिलसारखा वापर करू शकतो. कोको पावडरच्या डिझाईन्सनी सजलेली प्लेट एखाद्या प्रोफेशनल प्लेट डिझाइनरने केल्यासारखी सजते. क्रिएटिव्ह गार्निशिंगसाठी याचा चांगला वापर करू शकतो. करायला अतिशय सोपं आणि दिसायला फर्स्ट क्लास असं हे डिझाईन आहे.