एक प्रगल्भ अभिनेत्री म्हणून ती आपल्याला माहिती होतीच. पण मुक्ता बर्वे नावाच्या अभ्यासू, विचारी, मनस्वी तरीही मेहनती, मनमिळाऊ आणि साध्या माणसाची जवळून ओळख झाली ती ‘व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने. गेल्या शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात मुक्ताच्या व्यक्तिमत्त्वातील काही वेगळे पैलू प्रेक्षकांसमोर उलगडले. अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी मुक्ताला बोलतं केलं.

नाटकाची सुरुवात
लहानपणी आम्ही चिंचवडमध्ये राहत होतो आणि दहावीची परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या मोठय़ा सुट्टीमध्ये राज्य नाटय़ स्पर्धेसाठी बाबांच्या कंपनीने एक नाटक बसवलं होतं. त्यात काम करेल का तुमची मुलगी, अशी विचारणा झाली होती. त्यामागचं कारण म्हणजे आमच्या घरचं वातावरण नाटकाचं होतं. मी तेव्हा अभिनय वगैरे फारशी करायची नाही, तरी माझी आई लिहायची, वडील उत्तम प्रेक्षक, उत्तम वाचक, मोठा भाऊ बाल कलाकार म्हणून काम करायचा. त्यामुळे त्यांच्याच घरी ही मुलगी आहे.. हिला काम करता येऊ शकेल किंवा किमान स्टेजवर जाऊन घाबरणार नाही अशा एका हेतूनं ते आले होते. घरच्यांनी परवानगी दिली आणि मला सुट्टी असल्यानं मी काम करायला गेले. ‘घर तिघांचं हवं’ या नाटकात मी तेव्हा काम केलं.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

लहानपणचा भित्रा ससा
लहानपणापासून मी खूप ‘शाय’ मुलगी होती. वर्गात फारसे मित्र-मैत्रिणी नसलेली, फार लोकांमध्ये न मिसळणारी, आणि एकूणच आयुष्यात वावरण्याची भीती वाटणारी, अशी मुलगी होते. जोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला कळत नाही आणि आपल्या जवळच्या माणसांना ते ओळखू येत नाही तोपर्यंत मुलं चाचपडतच राहतात. तशीच मी चाचपडत होते. माझी आई सांगते त्याप्रमाणे, मी शांत बाळ होते.. हसतमुख होते, पण शांत असायचे. मला मित्र-मैत्रिणी व्हाव्यात, माझ्या वयाच्या मुला-मुलींमध्ये मी खेळावं यासाठी माझ्या आईनंच मग माझ्यासाठी एक नाटक लिहिलं. ती स्वत: लहान मुलांसाठी उत्तमोत्तम विषयांची नाटकं लिहिते. आईच्याच नाटकात मी पहिल्यांदा काम केलं. मी तेव्हा पाच वर्षांची होते. ‘परीराणी आणि भित्रा ससा’ या त्या नाटकात पहिल्यांदाच दोन भूमिकांमध्ये काम केलं. ‘परीराणी आणि भित्रा ससा’ हे दोन्ही रोल मीच केले होते. भित्रा ससा करताना मला जास्त कष्ट घ्यावे लागले नसतील कदाचित कारण, खरंच मी भित्रा ससाच होते. माझे दोन दातदेखील लहानपणापासूनच तसेच आहेत. त्यामुळे सशासाठी गेटपदेखील करावा लागला नसणार, पण परीराणी करण्यासाठी मला कष्ट करावे लागले असणार.. जे आत्तापर्यंत मला घ्यावे लागत आहेत. स्वप्नातली परीराणी होण्यासाठी आणि अभिनेत्री म्हणून सर्वाच्या स्वप्नात जाण्यासाठी वेगळं ग्रुमिंग करावं लागतं.

अभिनेत्याला प्रेक्षकांच्या मनापर्यंत जायलाच हवं
मला जे आवडतं ते मी करते. पण मला नेमकं काय आवडेल याचं उत्तर माझ्याकडे नाही. मला काहीही काम आवडू शकतं. भूमिकेची लांबी, ती निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, विनोदी की गंभीर हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मी प्रेक्षकांच्या भूमिकेतून त्याकडे पाहते आणि प्रेक्षक म्हणून ते आवडलं तर मी ते करते. अभिनय ही प्रेक्षकाभिमुख कला आहे. एका बंद खोलीमध्ये अभिनय केला असं होत नसतं. प्रेक्षक आणि नटामधील हा संवाद असतो. आणि तो संवाद घडण्यासाठी प्रेक्षकांच्या मनापर्यंत जायलाच हवं. त्यांना काय आवडेल, काय लॉजिकल आहे, त्यातलं मला काय जमेल याची उत्तरं शोधत मी रोल निवडते. स्वत:च्या कामाकडे बघणं हे माझ्या व्यक्तिमत्त्वातच होतं. गेल्या पाच वर्षांत मी काय केलं यावरून चुका लगेचंच दिसतात. मग पुढच्या पाच वर्षांत त्या करणार नाही हे ठरवता येतं. माझ्याकडून चुका होणारच नाहीत असं मी समजेन तेव्हा चुका सुधारण्याची माझ्याकडची शक्यताच संपेल.
 

स्वत:ला बाहेरून बघायला मला आवडतं…
लहानपणी मी आरशात बघून रडायचे. म्हणजे रडत रडत आरशात बघताना आई काय बोलते याकडे माझं लक्ष असायचं, पण रडताना मी कशी दिसते याचं मला खरं अप्रूप असायचं. स्वत:ला बाहेरून बघायला मला आवडतं. त्यामुळे आज स्टेजवर काम करतानाही मी स्वत:ला बाहेरून बघू शकते. प्रत्येक गोष्ट करताना मी कशी बसले आहे, माझ्याकडे तुम्ही कसे बघत असाल याची कल्पना करणंदेखील मला आवडतं. अशा वेगळ्या ‘पॉइंट ऑफ व्हय़ू’ने मी माझ्याकडे पाहते.

फोकस ठरलेला होता…
आई शिक्षिका होती, भाऊ हुशार होता पण घरून अमुक काही कर म्हणून कोणतंच प्रेशर नव्हतं. भाऊ हुशार असून तोदेखील कमर्शियल आर्टिस्ट झाला. मी अ‍ॅक्ट्रेस आहे. या सर्वाचं शंभर टक्के श्रेय आई-वडिलांना देते. आत्ता करिअर सुरू होऊन तेरा चौदा र्वष काम केल्यानंतर मी अभिनेत्री आहे हे म्हणणं सोपं असतं. पण पहिली सहा-सात र्वष काय करायचं काहीच कळत नव्हतं. आपण अभिनेत्री आहोत असं तेव्हा फक्त मलाच वाटायचं. पण माझ्या या वाटण्यावर आई-वडिलांनी विश्वास ठेवला. मी सुरुवात केली तेव्हा आत्ताइतका स्मार्टनेस, तयारी नव्हती. आत्ताची दहावीची मुलं खूप स्मार्ट असतात. इंटरनेटचं माध्यमदेखील त्या वेळी इतक्या सहजपणे हाताळता येत नव्हतं. आपल्याला अभिनय करता येईल असं वाटत होतं आणि त्यामुळेच मी त्याचंच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागेसुद्धा आई-वडील होते. मी पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात नाटय़शास्त्राचा अभ्यास केला. त्याअगोदर एसपी कॉलेजमधून ज्युनिअर कॉलेज पूर्ण केलं होतं. आई-वडिलांना माझी काही खात्री वाटत नव्हती कारण मी खूपच घाबरट होते. आई-वडिलांनादेखील त्यावेळी चिंता असणार, हे मला आत्ता जाणवतंय. पण माझा फोकस ठरलेला होता.

भूमिका कशी निवडते?
एखादी चांगली भूमिका लोकांना आवडली की, त्याच प्रकारच्या भूमिका तुमच्याकडे येतात. माझी सुरुवात ‘घडलंय बिघडलंय’ या चांगल्या मालिकेपासून झाली. मी त्यात ग्रामीण ढंगाची चंपा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर तशाच भूमिकांसाठी विचारणा झाली. मीच साकारलेल्या एका पात्रासारखं पात्र तुम्ही पुन्हा करायला देणार असाल तर मी नवं काय करणार? वेगळं केल्याने आपला शोध कायम सुरू राहतो. कथा तशीच पण पात्रं वेगळी असली तरी मी अशा भूमिका नाकारल्या. अशा निर्णयामुळे अनेक दिवस घरी बसावं लागलं. पण मला त्याची भीती वाटत नाही. कारण मला आवडेल तेच काम मी करते. सुरुवातीच्या काळात माझ्याकडे खूप कमी पैसे होते. मात्र माझ्या गरजादेखील अगदी मर्यादित होत्या. मला कधी त्याची चिंता करावीशी वाटली नाही आणि घरून पैसेसुद्धा मागावे लागले नाहीत.

मुंबई-पुणे-मुंबई प्रवास…
ललित कला केंद्राची पदवी परीक्षा झाली आणि मी लगेच मुंबईला आले. मला मुंबईचं खूप आकर्षण होतं. इथे यायचंच होतं. हा पुणे ते मुंबई प्रवास ग्रेट होता. कुल्र्याला गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहात होते आणि तेथूनच मी कामाला सुरुवात केली. तिथे मला पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं. – ‘सुयोग’चं ‘आम्हाला वेगळे व्हायचंय’! नाटय़शास्त्राच्या अभ्यास करत असताना प्राध्यापक म्हणून असलेल्या लोकांनीच इथे आल्यानंतर चांगल्या पद्धतीने मदत केली आणि माझ्या सुदैवानं चांगले लोक मला भेटत राहिले. त्यामुळे हा प्रवास खूपच चांगला झाला.

माझा नाटय़शास्त्राचा अभ्यास…
नाटय़शास्त्राचा अभ्यास म्हटल्यावर मला लगेच स्टेजवर काम करायला देणार, असा माझा समज होता. मात्र तसं काही नव्हतं. अभ्यासक्रमाचं पहिलं दीड वर्ष बॅक स्टेजची कामं करावी लागली. स्वत:ला घडवण्यातच माझी ती र्वष गेली. मी थोडी ‘स्लो लर्नर’ आहे. प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेतल्याशिवाय त्यात उतरायचं नाही, असा माझा स्वभाव. त्यामुळे पहिलं दीड वर्ष शांतपणे संहिता, नाटकं वाचत होते. मेकप, कॉस्च्युम करत होते. सेट डिझाईन केले, लाइट्स केले. आणि त्यानंतर पुढच्या दीड वर्षांत अभिनय केले. इथे येताना सगळे अभिनय करण्यासाठी येतात. मात्र अभ्यासक्रमाचं वैशिष्टय़ असं आहे की, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की, आपल्याला नेमकं काय करायचं आहे.

मी कुणालाही नावं ठेवत नाही…
कुठल्याही प्रकारचं काम करणाऱ्या व्यक्तीला मी नाव ठेवत नाही. कारण हिंदी मालिकांमध्ये खूप जास्त दागिने घालून, बटबटीत सीन करणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त अवघड आहे. आणि ते जे लीलया करू शकतात त्यांना मी मानते. ते मला कधी करता येईल हे मला माहीत नाही. हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. मी हे कधी केलं नाही. ते मला करून बघायचं आहे. त्यामुळे एखाद्या हिंदूी मालिकेमध्ये भाभी किंवा बहू म्हणून घुंगट घेऊन दिसले तर घाबरू नका कारण वेगळं करणं हे माझं प्रेम आहे. डान्स नंबर करण्याबाबत आपली वेगळी मतं असतात. पण मला माहितेय की, हे अवघड आहे आणि अनेक जणी त्यासाठी खूप कष्ट घेत असतात. इव्हेंटमध्ये नाचणंदेखील अवघड आहे. करून दाखवा आणि त्यानंतर मला हे करायचं नाही हे सांगा. जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत नाकं मुरडणं चुकीचं आहे.
 

नाटक आणि सिनेमातला फरक
सिनेमात काम करण्याची ठरवलं नव्हतं. पण आपल्याला जे येत नाही ते करून पाहण्याचं कुतूहल होतंच. ‘देहभान’ नाटकानंतर मला पहिली फिल्म मिळाली – चकवा. अतुल कुलकर्णी आणि दीपा परब यांची ही फिल्म होती. यात माझा छोटा रोल होता. जतीन वागळे यांचादेखील तो पहिलाच चित्रपट होता. शिरीष देसाई आमचे सिनेमॅटोग्राफर होते. पहिल्याच चित्रपटात मला चांगला माणूस भेटला. कारण काम करताना मी खूप चुका करत होते. पहिल्याच शॉटला मला सांगितलं की एंट्रीला पावलांचा शॉट आहे. मी नाटकासारखं काम सुरू केलं. क्लोजअप वगैरे असं मला काहीच माहित नव्हतं. पावलांचा शॉट असला तरी मी डोळे हलवत होते.. मी नाटकासारखं अख्खं काम करत होते. जेव्हा शिरीषनं मला सांगितलं की, सिनेमात आपण असतो त्यापेक्षा ४० पट दिसतो. त्यामुळे मला खूप गोष्टी समजायला लागल्या. त्यांच्या समजावण्यामुळे मी वेगवेगळे प्रयोग केले. एक भोचक विद्यार्थी असल्याने मी हे केलं असलं तरी मला हे सांगावं लागलं होतं. मग सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार झाला. सिनेमा हे टेक्निकल माध्यम आहे याची मला जाणीव झाली. सिनेमात नटांचं कौतुक होत असलं तरी व्हिज्युअलायझर, दिग्दर्शक, संकलक, सिनेमॅटोग्राफर या सर्वाची महत्त्वाची कामं असतात आणि ते पोचवण्याचं नट हा माध्यम असतो. चुकत गेले आणि त्यातूनच मी शिकत गेले.

आजची पिढी फास्ट फॉरवर्ड
मला जसा सहा ते सात र्वष वेळ घडण्यासाठी मिळाला तसा आजच्या काळात मिळेलंच असं नाही. स्पर्धा वाढल्या आहेत. मात्र आजची पिढीदेखील तितकीच फास्ट झालेली आहे. या क्षेत्रात येण्याआधीच आता मुलगी तयार झालेली असतात. जेल नेलसारखा प्रकार कळायला मला सहा र्वष लागली. मात्र आजची स्ट्रगल करणारी मुलगीदेखील ते करते. त्यांच्याकडे खूप कमी वेळ आहे. त्यांची भाषा सुधारणं, ग्रुमिंग, डान्स, गाणं या सगळ्यासाठी खूप कमी वेळ आहे. मुलं ते शिकूनच येतात. मी तयार होण्यासाठी सात र्वष घेतली, चुकत चुकत शिकले पण आत्ता कदाचित चुकायलादेखील वेळ नाही. म्हणून काम करत चुका आणि तेथेच सुधारा अशी वेळ येऊन ठेपली आहे. सुरुवातीचा काळ रंगभूमीवरच काढला पाहिजे, असं काही माझं म्हणणं नाही, कारण आत्ताच्या काळाची गरज वेगळी आहे.

भक्तीताईंबरोबर काम करण्याचं अपुरं स्वप्न
मी नाटक करायचं ठरवलं तेव्हा फक्त भक्ती बर्वे यांच्यासोबत स्टेजवर काम करण्याची इच्छा होती. या बाई जादूचा प्रयोग वाटावं तसं काम करायच्या. तसं मला प्रशांत दामले यांच्याबद्दलही वाटायचं. हा माणूस जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा सगळे प्रेक्षक कसे हसतात, मला याचं खूप आकर्षण होतं. दुर्दैवाने भक्ती बर्वेच्यासोबत काम करण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली. भक्तीताईंच्या अपघाताचं कळलं त्या क्षणी मी पूर्ण खचले होते. आता कशाला स्टेज शिकायचं, असंही वाटलं होतं. परंतु नंतर कळलं की, कोणत्याही घटनेपेक्षा काम महत्त्वाचं असतं.

टीव्हीचा छोटा पडदा मोठं करतो
टीव्ही छोटा असतो म्हणून छोटे झालो, असं आपण म्हणत असलो तरी टीव्ही आपल्याला मोठं करतो, असा माझ अनुभव आहे. कारण आपण घराघरात जातो. म्हणजे आपण प्रेक्षकांच्या मनामनात जातो. आणि मनामनात जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे टीव्ही. आणि तुमचं काम आवडलं तर मात्र कौतुकाला पारावार नसतो. मग प्रेक्षक भेटतात तेव्हा खूप फ्रेंडली वागतात. राधा या नावाने हाक मारतात. कारण तो कलाकार प्रत्येकाच्या घराघरात पोहचत असतो. मनाप्रमाणे ऑन ऑफ करता येतं. त्यामुळे छोटा पडदा कलाकारांना मोठं करतो. प्रेक्षकांच्या मनापर्यंत जाण गरजेचं आहे कारण त्यामुळेच तुम्हाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळतं. नाटकात पडदा उघडण्यापूर्वी मी आधीर असते. पडदा उघडण्यापूर्वी खूप विचार कोंडलेले असतात, मात्र पडदा उघडल्यानंतर खूप सकारात्मक ऊर्जा मला मिळते.

सुली मला त्यांच्या डोळ्यात भेटली…
भूमिकेचा अभ्यास अर्थातच करावा लागतो. ती व्यक्तिेरेखा मग काही काळ आपल्या सोबतच असते. अर्थात हे तेवढय़ापुरतंच असतं. ‘जोगवा’तली सुली करताना मला हा अनुभव आला. जोगता-जोगतीण यांच्याबद्दल वाचलं होतं. खूप तयारी केली होती. मात्र तिथे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर त्या जोगतिणी भेटल्यानंतर त्यातली आव्हानं मला जाणवू लागली. खरे जोगत्या- जोगतीण पाहिले, समाजसेवक पाहिले आणि मी खूप घाबरले. त्या खऱ्या जोगतिणीशी बोलल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून मला सुली भेटली. पात्र कधीच परिपूर्ण होत नसतं. मात्र ते कळलं तर आपण त्या व्यक्तिरेखेच्या अधिक जवळ जाऊ शकतो.
 

पालकांना सल्ला
मुलं जर या क्षेत्रात येण्याची मनापासून धडपड करत असतील तर त्यांना खूप सपोर्ट करा. मुलांसाठी सगळ्यात एनर्जी देणारी गोष्ट कोणती असेल तर घरच्यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास. माझी आई काळजी करत नाही हे मला माहीत असतं त्यामुळेच मी चांगलं करिअर करू शकते. संकट आणि धोके कोणत्या क्षेत्रात नसतात? अभिनयाच्या क्षेत्रात चेहरा माहिती असतो म्हणून बातमी होते. अनेक वेळा हे आपल्या स्वत:वरदेखील अवलंबून असतं. मुलींनी छोटे कपडे घालू नये, असं म्हणणाऱ्यातली मी अजिबात नाही. मुलींना हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य हवं. फक्त ते निभावून नेता यायला हवं. आपल्यामध्ये निभावून नेण्याची ताकद असेल तर वाटेल ते करावं. हे क्षेत्र चांगलं आहे. मुलांवर विश्वास ठेवा आणि त्याची जाणीव मुलांना करून द्या.

अंधांची भूमिका आव्हानात्मक
ऑड्री हेपबर्न या अभिनेत्यानं ‘वेट अंटिल डार्क’मध्ये केली तशी अंधाची भूमिका करायला आवडेल का, या प्रश्नाचं उत्तर देताना मुक्ता म्हणाली, तशी भूमिका करणं खूपच आव्हानात्मक काम असेल. मी आत्तापर्यंत असं काम केलं नसलं तरी मी त्या मुलांचं निरीक्षण नक्कीच केलं आहे. मी पुण्यातील एका अंध शाळेत जाते, तेथील मुलींना माझा आवाज आवडतो, त्या माझं काम ‘पाहतो’ असं सांगतात. तेव्हा मला त्यांच्या त्या गुणांचं कौतुक वाटतं. दृष्टी नसली तरी त्या मला ‘पाहू’ शकतात.
 

निर्माती झाले कारण…
मराठी नाटकाची एक परंपरा आहे आणि ते आपली आब राखून आहे, पण नाटक आता टेक्निकली बदलत आहे. मला मनासारखं, दर्जेदार नाटक करायचं होतं म्हणून मी ‘छापा-काटा’द्वारे निर्मितीकडे वळले. आपल्याकडे चांगले निर्माते आहेत. मला चांगल्या भूमिकाही मिळताहेत, पण चांगलं तंत्र लोकांना देण्यासाठी मी नाटक करत आहे. मला बॅटिंग करायची आहे म्हणून मी बॅट विकत घेतली असं माझं झालेलं नाही.

नवोदितांसाठी नवा उपक्रम
नव्या पिढीसाठी मी एक नवा उपक्रम सुरू करण्याच्या विचारात असून ज्यांना नाटय़क्षेत्रात यायचंय त्यांना कोणत्या गोष्टी करता येतील त्याचं मार्गदर्शन नवोदितांना व्हावं असा या उपक्रमाचा उद्देश असेल. हा उपक्रम ठाण्यातून सुरू होईल. ते नाटय़ शिबीर नसेल अनुभवांची देवणाघेवाण असेल. माझ्या या क्षेत्रातल्या मित्र- मैत्रिणीसुद्धा माझ्यासोबत त्यांचे अनुभव शेअर करतील.

मुक्ता कविताही करते आणि तिने तिच्या दोन कविता या कार्यक्रमात वाचून दाखवल्या.

तू पाण्याच्या रंगाची, खळाळ वाहणारी
आनंद देणारी झऱ्याची गं धार

फुलांच्या वासाची, गंधाळ- मधाळ
भरून राहणारी सुगंधी लहर

तू धुक्याच्या देहाची धुसर -अंधूक
निघून जाणारी पावसाची सर

तू माझ्याच आतली, माझ्याच सारखी
मलाच होणारी आतली चाहूल!

श्वास देहात साठला, देह धुक्यात लोटला,
धुक्यामध्ये शोधू वाट ? पुढे अंधार दाटला

काय शोधाया निघाले ? कुठे येऊन ठेपले ?
कसे अनोख्या दिशेने असे पाऊल पडले ?

पुढे काहीच दिसेना, तरी शोध थांबवेना,
धुक्यापल्याडचे कोण हाकारते ते कळेना

वाट अनवट, पुसट, चालताना फरपट
तरी जिंकावासा वाटे अनोळखी सारीपाट
पाय चालुन थकले, जुने सारे दुरावले
मोडण्याच्या या क्षणी सारे धुकेच फाटले

धुके फाटल्याच्या क्षणी सारा शोधही थांबला
तुझ्या एका दिसण्याने शांत झाला गलबला

स्वच्छ पांढरा प्रकाश, त्यात तुझा सहवास
माझ्या दाटल्या श्वासाला आता फक्त तुझी आस.
छाया : दीपक जोशी