पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १९ सप्टेंबरला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मेळाव्याच्या निमित्ताने विदर्भात येणार होते. मात्र, दौरा लांबणीवर  ढकलण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. दौरा रद्द होण्याची कारणे समोर आली नसली तरी राज्यात महायुतीमध्ये सुरू असलेला जागावाटपाचा घोळ आणि पोटनिवडणुकीत जाहीर झालेल्या निकालावरून शहा यांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.
दीड महिन्यापूर्वी अमित शहा यांनी उपराजधानीत भेट दिली. विधानसभा निवडणुका घोषित होताच १९ सप्टेंबरला ते पुन्हा विदर्भात येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अमरावती आणि गोंदियामध्ये कार्यकत्यार्ंच्या मेळाव्याला उपस्थित राहून ते संवाद साधणार होते. मात्र, त्यांचा विदर्भ दौरा अचानक रद्द झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. राज्यात महायुतीमध्ये जागा वाटपावरून सध्या तणातणी सुरू असून दोन्ही पक्षांतील नेत्यांनी स्वबळावर लढण्याची मानसिकता तयार केली आहे. मात्र, शहा बुधवारी मुंबईला येणार असल्यामुळे ते यातून मार्ग काढतील, असा विश्वास भाजप नेत्यांना आहे.
अमरावती आणि गोंदियामध्ये शहा प्रथमच येणार होते, त्यामुळे दोन्ही जिल्ह्य़ांतील पक्षाच्या कार्यकत्यार्ंनी जय्यत तयारी सुरू केली होती. मात्र, दौरा रद्द झाल्याने कार्यकत्यार्ंचा उत्साह मावळला आहे.
या संदर्भात पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास म्हणाले, देशात पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याचा आढावा घेण्याच्यादृष्टीने १९ सप्टेंबरला दिल्लीला बैठक आहे. चीनचे राष्ट्पती त्याचदरम्यान गुजरातमध्ये येणार आहेत. शिवाय विधानसभा निवडणुकीत उमेदवार घोषित न झाल्यामुळे शहा यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला. उमेदवार ठरल्यानंतर शहा यांचा विदर्भात दौरा होणार असून त्याची तारीख जाहीर करण्यात येईल.