मुसळधार पावसात वेकोलिच्या उंच ढिगाऱ्यांची माती इरई, झरपट व वर्धा या तीन प्रमुख नद्या व नाल्यांमध्ये उतरत असल्याने मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. याच प्रदूषित पाण्याचा उपयोग गावातील लोक पिण्यासाठी करीत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वेकोलि व्यवस्थापनाला वारंवार नोटिसा देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
या जिल्ह्य़ात वेकोलिच्या २७ व कर्नाटक एम्टा व सनफ्लॅग या खासगी कंपन्यांची प्रत्येकी एक, अशा एकूण २९ कोळसा खाणी आहेत. खुल्या व भूमिगत खाणीतून कोळसा काढल्यानंतर तेथील माती जवळच टाकली जाते. कित्येक वर्षांंपासून हा प्रकार सुरू असल्याने आज चंद्रपूर, भद्रावती, घुग्घुस, बल्लारपूर, राजुरा व चिमूर या शहराच्या सभोवताल वेकोलिच्या या मातीचे ७० ते ८० फूट उंच टेकडय़ा तयार झाल्या आहेत. त्यामुळेच जिल्ह्य़ातील बहुतांश गावांना दरवर्षी पुराचा वेढा पडतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी वेकोलि व्यवस्थापनाला तातडीने पत्र लिहून या मातीच्या टेकडय़ांची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले होते, परंतु वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसला केराची टोपली दाखवली. गेल्या वर्षी पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी तर बैठकीत वेकोलि अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावून ढिगाऱ्यांची वष्रेभरात विल्हेवाट लावा अन्यथा, गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला होती, परंतु तरीही वेकोलि अधिकाऱ्यांनी या टेकडय़ा हटविल्या नाहीत.
दरम्यान, या टेकडय़ांची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली होती. आता वेकोलिच्या या टेकडय़ांमुळे जलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. शनिवारी सिनाळा खाणीतील आगीची पाहणी करण्यासाठी जात असतांना मुसळधार पावसानंतर वेकोलिच्या या टेकडय़ांची माती वेगाने दुर्गापूरच्या नाल्यात उतरत होती. हाच नाला पुढे दुर्गापूर व नेरी या मार्गाने इरई नदीला मिळतो. ही संपूर्ण पिवळी माती इरई नदीच्या पात्रात उतरत असल्याने नदीचे संपूर्ण पाणी दूषित झाले आहे. केवळ इरई नदीच्याच पात्रात नाही, तर वर्धा व झरपट नदी तसेच गावातील नाल्यातही मातीच्या टेकडय़ांचे पाणी उतरत आहे.
दुर्गापूर, पद्मापूर, हडस्ती, पठाणपुरा गेट, माना टेकडी या परिसरात फेरफटका मारला तरी वेकोलिच्या टेकडय़ांची वस्तुस्थिती दिसून येते. भद्रावतीत कर्नाटक एम्टाच्या कोळसा खाणीची माती कोंडा नाल्यात गेल्याने हा नाला पूर्णत: नाहीसा झालेला आहे, तर माजरी परिसरातही अशा टेकडय़ा बघायला मिळतात.
घुग्घुस गावालगतच्या खाणीचे पाणी तर वर्धा नदीत जात असल्याचे स्पष्ट दिसते. तिकडे वरोरा तालुक्यातही पाटाळालगत, तसेच सास्ती व बल्लारपूर गावालगत उभ्या असलेल्या वेकोलिच्या टेकडय़ांचे पाणी वर्धा नदीच्या पात्रात उतरत असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. या पाण्यामुळे या जिल्ह्य़ातील बहुतांश लोकांना कावीळ व पोटाचे गंभीर आजार झाले आहेत.
वरोरा व भद्रावती तालुक्यात तर जलप्रदूषणामुळे अनेक गावकऱ्यांना दात पिवळे होण्याचा आजार झालेला आहे.
केवळ नद्याच नाही, तर दुर्गापूर, चंद्रपूर, बल्लारपूर या प्रमुख शहरातील नाल्याही या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे बुजलेल्या आहेत. दरम्यान, ही माती पात्रात घट्ट जाऊन बसत असल्याने नदीची खोली अनेक ठिकाणी कमी झालेली आहे. त्यामुळे पुराचा धोका अधिक असल्याची माहिती नदीचे अभ्यासक प्रा.डॉ.योगेश दुधपचारे यांनी दिली. तीन वर्षांपूर्वी वणीजवळ मातीचे ढिगारे ९० फुटापेक्षा उंच केले असता पावसाळ्यात सर्व माती खाली कोसळत पिंपळगावपर्यंत आलेली होती. हा प्रकार म्हणजे माळीण दुर्घटनेसारखाच आहे, असेही प्रा.दुधपचारे म्हणाले. नदीनाल्यासोबत ही माती लगतच्या शेतातही पसरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार निश्चितच संतापजनक असल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घ्यावी, अशीही मागणी आता समोर आली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस
वेकोलिच्या घुग्घुस, सिनाळा व मुंगोली या तीन खाणींना उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू व जलप्रदूषण होत असल्याची नोटीस बजावली आहे. मात्र, या नोटिसींना वेकोलिचे अधिकारी केराची टोपली दाखवत असल्याची माहिती आहे. वेकोलि प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने घेत नसल्याने आता वेकोलि अधिकाऱ्यांवरच थेट कारवाई करावी जेणेकरून अधिकारी हादरतील, अशी मागणी समोर आली आहे. एकदा का वेकोलिने जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने घेतले तर सर्व काही सुरळीत होईल, अशी आशा आहे. तिकडे वेकोलि लोकप्रतिनिधींनाही घाबरत नसल्याने ही सर्व समस्या निर्माण झालेली आहे.