43आ णीबाणीच्या काळात नोकरी सोडून सत्याग्रह केला. २१ दिवस ऑर्थर रोड कारागृहात कच्चा कैदी होतो. भारतातील आमची पहिलीच तुकडी, जी निर्दोष सुटली. शांततापूर्ण सत्याग्रह करणे हा प्रस्थापित सरकारविरुद्ध उठाव नसून तो नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, असा निकाल देऊन आमची सुटका झाली. त्यानंतरची चार वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी सेनेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. १९८० मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणे थांबविले.

– त्या वेळची एक घटना पुढे आयुष्यभर सामाजिक कामांची नाळ जोडून ठेवण्यास कारणीभूत ठरली. त्या वेळी विश्व हिंदू परिषदेचे एक ज्येष्ठ स्वयंसेवक कै. केशवराव केळकर पूर्णवेळ म्हणून थांबणाऱ्या चार-पाच कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘तुम्ही आता व्यक्तिगत जीवनात सुरुवात कराल. नोकरी-व्यवसाय, संसारी जीवनातून सामाजिक कामांसाठी फार वेळ देता येईलच, असे नाही, पण एक करा, ही ज्योत विझू देऊ नका. दिवा बारीक करा. घालवू नका. घालविल्यास पुन्हा लावता येईल, की नाही हे सांगता येत नाही. सध्या वेळेअभावी काम करत असाल तर भविष्यात वेळ मिळविल्यावर ते काम वाढविता येईल. त्यांचा सल्ला मी मानला. पुढील वाटचालीत मी तो दिवा विझू दिला नाही. नोकरीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच्या पदांवर कार्यरत असूनही सामाजिक कार्याची नाळ तुटू दिली नाही. सवड मिळताच सामाजिक कार्य करीत होतोच. १९८५ ते ९० या काळात सुमारे शंभर जणांना तलासरी तसेच मनोर येथील वनवासी कार्यासाठी असलेली वसतिगृहे दाखविण्यासाठी घेऊन गेलो. ओरिसामधील चक्रीवादळामुळे दोन ट्रक बिस्किटे थेट त्या भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पाठवू शकलो. ठाणे जिल्ह्य़ातील फिरत्या प्रयोगशाळांना प्रायोजक मिळवून दिले. अभाविपतर्फे आयोजित ‘डिपेक्स’मध्ये हातभार लावला. नोव्हेंबर २०१० मध्ये मी निवृत्त होणार होतो. त्यामुळे आता दिव्याची वात मोठी होण्याची वेळ येऊन ठेपल्याची जाणीव झाली. २००५ पासूनच त्या दृष्टीने मी तयारी करू लागलो.
रायगड जिल्ह्य़ातील माणगांव तालुक्यातील रातवड, उसद आणि वडघर येथे कल्याणच्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळा आहेत. तिथे तसेच पनवेल येथील पटवर्धन रुग्णालयात काम सुरू केले. या समाजोपयोगी कामांसाठी दात्यांकरवी मदत मिळवून देण्याचे काम सुरू केले. तब्बल दीडशे जणांना हे चारही प्रकल्प दाखविले. सकाळी सात-साडेसातला निघायचे आणि संध्याकाळी त्याच दरम्यान परत यायचे, असा तो दिनक्रम असायचा. २००६, २००८ आणि २००९ मध्ये अनुक्रमे रातवड, उसर आणि वडघर या शाळांचे बांधकाम पूर्ण केले. सुसज्ज वाचनालय, संगणक केंद्र, इ-लर्निग आदी आधुनिक शैक्षणिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे लोकसहभागातून हे प्रकल्प साकारले. लाखो रुपये खर्च झाले. मात्र एकाही देणगीदाराची पाटी लागलेली नाही. या दुर्गम भागातील शाळांचा दहावीचा निकाल ९५ ते शंभर टक्के लागतो. कोणताही क्लास नसतो. तरीही दरवर्षी काही विद्यार्थी दहावीत ८० ते ९० टक्के गुण मिळवितात. विशेष म्हणजे शाळेतील जे १७५ विद्यार्थी अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरून चालत येतात, त्यांना सायकली देण्यात आल्या आहेत.
– उसद येथील शाळेचा २००९ चा निकाल शंभर टक्के लागला. त्यातील तीन मुलांना ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. ते ऐकून या शाळेला ११ लाखांहून अधिक देणगी देणाऱ्या व्यक्तीला खूप आनंद झाला. त्यांनी त्या मुलांच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दाखवली. त्यातूनच एका नवीन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. विपरीत परिस्थितीतही दहावीत ९० टक्के गुण मिळवूनही केवळ आर्थिक कारणांमुळे काही मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांसाठी हेल्पलाइन तयार केली. शैक्षणिक प्रगतीच्या आधारावर ही मदत देण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक पालक मिळवून दिले. अर्थातच ही मदत कर्ज स्वरूपाची नाही. मोठे झाल्यावर, स्वत:च्या पायावर उभे राहिल्यावर त्याने एका असाच एखादा गरजू विद्यार्थी शोधून या ऋणातून मुक्त व्हावे, अशी अपेक्षा आहे.
– खरंतर माझ्या कामांचा पाढा वाचण्यासाठी हा लेखनप्रपंच नाही. पण माझ्या आयुष्याच्या या ‘सेकंड इनिंग’मध्ये सामाजिक कार्याला हातभार लावणारे अनेकजण भेटले. या सर्वाचेच अनुभव विलक्षण आहेत. हे अनुभवच ‘सेकंड इनिंग’मधून मांडण्याचा प्रयत्न आहे. माझं योगदान दिव्याची वात मोठी करण्यातइतपतच. अंधकारमय आयुष्य जगणाऱ्यांच्या आयुष्यात दीप उजळवणाऱ्यांच्या कहाण्या सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
रवींद्र कर्वे
(निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी, टीजेएसबी बँक)