लोकसभा निवडणुकीचा ज्वर सगळीकडेच जाणवत असताना अगदी रोज घराघरात शिरणाऱ्या मालिका, या मालिकांमधील कुटुंबेही त्याला अपवाद कसे असतील? नाही नाही म्हणता म्हणता जवळपास प्रत्येक वाहिनीने आपापल्या पध्दतीने लोकांमध्ये मतदानाबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लोकांना मतदान करण्यासाठी बजावणाऱ्या या कलाकारांनाही मतदान करता यावे यासाठी काही वाहिन्यांनी चित्रिकरणाला सुटी देऊ केली आहे. तर बऱ्याचजणांनी दुसऱ्या शिफ्टमध्ये चित्रिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेले महिनाभर विविध वाहिन्यांवर मतदान करण्याबद्दल या ना त्या पध्दतीने संदेश दिले जात आहेत. कधी कथानकातून तर कधी थेट आवाहन करत छोटय़ा पडद्यावरील कलाकारांनी लोकांना मतदान कसे केले पाहिजे, त्यासाठी काय काय आवश्यक गोष्टी लागतात याची जुजबी माहितीही दिली जाते आहे. त्यांच्या आवाहनामुळे प्रेक्षक तर मतदान करण्यासाठी बाहेर जातीलच; पण, दिवसरात्र चित्रिकरणात व्यग्र असणाऱ्या या छोटय़ा पडद्यावरील कलाकारांच्या मतदानाची चिंता वाहिन्यांनी आणि निर्मात्यांनी सोडवली आहे. आमच्याकडून कलाकारांना सुट्टीच देण्यात येणार आहे. मात्र, काही मालिकांच्या बाबतीत अडचण असेल तर त्यांना दुसऱ्या शिफ्टमध्ये चित्रिकरणासाठी बोलावले जाईल. याबद्दल सगळ्या कलाकारांना अधिकृतरित्या मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे २३ एप्रिलला कळवण्यात येईल, अशी माहिती सोनीच्या सूत्रांनी दिली.
सोनीप्रमाणेच मराठीत ‘स्टार प्रवाह’नेही सुट्टी किंवा चित्रिकरणाच्या वेळेतून सवलत देण्याचे धोरण स्वीकारले असल्याची माहिती वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख जयेश पाटील यांनी दिली आहे.  ‘स्टार प्रवाह’  वाहिनीवर ‘दुर्वा’ ही राजकीय मालिका सुरू असल्याने या मालिकेतून वाहिनीने प्रेक्षकांना मतदान करण्याविषयी थेट आवाहन केले होते. तर ‘माधुरी मिडलक्लास’मधील माधुरीचे मतदार ओळखपत्र हरवते, ते परत मिळवण्यासाठी तिला काय खटाटोप करायला लागतात हे दाखवून काहीही करा पण, मतदानाची संधी गमावू नका, असा संदेश दिला आहे. तर गेले दीड महिना ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील प्रत्येक कलाकाराने स्वतंत्रपणे आत्ताच्या परिस्थितीत मतदान कसे महत्वाचे आहे हे पटवून दिले आहे. ‘झी मराठी’वरही जवळपास प्रत्येक मालिकेतून मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. पण, असे असले तरी ‘डेली सोप’ची मागणी पूर्ण करण्यासाठी चित्रिकरणाला सुट्टी देणे जमणार नाही त्यामुळे सरसक ट दुसऱ्या शिफ्टमध्ये म्हणजेच दुपारी दोन-अडीचनंतर चित्रिकरण करण्याचा निर्णय काही निर्मात्यांनी घेतला आहे. ‘झी मराठी’ आणि ‘कलर्स’ या दोन वाहिन्यांवरील सर्व मालिकांचे चित्रिकरण हे अडीचनंतर सुरू करण्यात येणार आहे.