सात वेळा नागपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, रामटेकमधून माजी मंत्री मुकुल वासनिक, आम आदमी पक्षाचे रामटेकचे उमेदवार प्रताप गोस्वामी यांच्यासह विदर्भातील विविध राजकीय मतदार संघातील उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हाधिकारी परिसर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दुमदुमून गेला. मुत्तेमवार आणि वासनिक यांनी अर्ज भरण्याच्यावेळी शक्तिप्रदर्शन केले. यामधील काही प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती काँग्रेसच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व, म्हणजे दहाही मतदारसंघात १० एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १७ मार्चपासून सुरुवात झाली असून उद्या शनिवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. सोमवारी अर्जाची छाननी होईल. बुधवारी २४ मार्चला हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून, त्याच दिवशी सायंकाळी सर्व मतदारसंघातील उमेदवारांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार आणि मुकुल वासनिक यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मिरवणुकीने वासनिक आणि मुत्तेमवार जिल्हाधिकारी कार्यालयात आले. कार्यालय परिसरात लोकांना प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे कार्यालयाच्या बाहेर झालेल्या गर्दीमुळे या भागातील वाहतूक काही विस्कळीत झाली होती. ‘वारे पंजा आ गया पंजा’, मुत्तेमवार- वासनिक आगे बढो, जितेगा भाई काँग्रेस जितेगा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार अशोक धवड, अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक, सुनील केदार, नाना गावंडे, सुनीता गावंडे, सुबोध मोहिते, आमदार दीनानाथ पडोळे, माजी शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय पाटील, एकीकृत रिपब्लिकन पक्षाच्या सुलेखा कुंभारे आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गेल्या पाच दिवसांपासून निरस जाणवणाऱ्या या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरला. उमेदवारी अर्जभरण्याच्या निमित्ताने दोघांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आम आदमी पक्षाचे रामटेकचे उमेदवार प्रताप गोस्वामी, उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी, आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  

मुत्तेमवार आणि वासनिक यांनी अर्ज दाखल केले तेव्हा रोजगार हमी योजना मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत, माजी मंत्री अनिल अहमद, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री अनिल देशमुख अनुपस्थित होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत नितीन राऊत आणि अनिस अहमद यांच्यावर प्रचार न केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्ष श्रेष्ठीकडे त्यांची तक्रार करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून राऊत आणि अहमद यांची मुत्तेमवार यांच्यावर नाराजी असल्यामुळे ते अर्ज भरण्याच्यावेळी अनुपस्थित असल्याची चर्चा परिसरात होती. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले, राऊत आणि अहमद काही कामानिमित्त मुंबईला असून ते उपस्थित राहू शकले नाही. मात्र, उद्यापासून ते प्रचारात सहभागी होतील. त्यांची कुठलीही नाराजी नाही आणि असेल तर ती दूर करण्यात येईल.

मुत्तेमवार म्हणाले, आतापर्यंत सातवेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर शहराचा विकास केला आहे. नितीन गडकरी आणि ‘आप’च्या अंजली दमानिया यांच्याकडे निवडणुकीचा अनुभव नाही. त्यांची कामे जनतेपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. कार्यकर्ता ही माझी शक्ती असून त्यांच्या भरवशावर ही निवडणूक जिंकणार आहे. काँग्रेसच्या काळात राबविण्यात आलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणार आहे. वासनिक म्हणाले, रामटेकमध्ये गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामे जनतेसमोर घेऊन जाणार आहे. माझी लढाई भाजप शिवसेनेच्या उमेदवारांशी आहे. सुलेखा कुंभारे आणि जोगेंद्र कवाडे सोबत असल्यामुळे सर्व मिळून संघटितपणे प्रचार करून जातीयवादी शक्तींना पराभूत करू. ग्रामीण काँग्रेसमध्ये कुठलीही गटबाजी नसून सर्व नेते एकत्र येऊन काम करीत आहेत.