बुलढाणा : नांदुरा तालुक्यातील येरळी नजिक झालेल्या भीषण अपघातात पित्याचा मृत्यू झाला तर पुत्र गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने खामगाव येथे प्रथमोपचार नंतर त्याला अकोला येथे पुढील उपचारा साठी पाठवीण्यात आले.
रविवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडलो जळगाव जामोदकडून निघालेली होंडा सिटी कार (क्र. एम एच ०१बियू ८७९३) नांदुरा शहराकडे येत होती. भरधावं वेगाने येणाऱ्या या चार चाकीने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच २८५९) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जळगाव जामोद तालुक्यातील तिवडी येथील वडील राजू घाईट व मुलगा मंगेश घाईट हे दोघे गंभीर जखमी झाले.
त्यांना ओमसाई फॉउंडेशनच्या रुग्ण वाहिका द्वारे नांदुरा येथील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यांना खामगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात नेण्याचे सांगण्यात आले. मात्र प्रवासातच राजू घाईट यांचा मृत्यू झाला. मुलगा मंगेश घाईटची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी अकोल्यात पाठविण्यात आले आहे.
भरधाव कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात आले. यामुळे कार डिव्हायडरवर धडकून विरुद्ध दिशेला येऊन दुचाकीला धडक दिली. यामुळे कार आणि दुचाकीची मोडतोड झाली. या घटनेची माहिती येऊन धडकताच तिवडी गावात एकच खळबळ उडाली. घरातील कर्ता पुरुष दगावला आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याने घाईट परिवारात एकच आकांत उसळला.
चार दिवसांत दुसरा अपघात
तालुक्यातील येरळी नवीन पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. याच ठिकाणी केवळ चार दिवसांपूर्वी बोलेरो पिकपने धडक देऊन जावेद खान चांद खान (रा. नांदुरा) याचा मृत्यू झाला होता.