IPL चा तेरावा हंगाम चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी फारसा चांगला गेलेला नाही. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी रैना-हरभजन यांनी घेतलेली माघार त्यानंतर संघातील खेळाडूंना झालेली करोनाची लागण, प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि धोनीचं फॉर्मात नसलं या सर्वांचा संघाला चांगलाच फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीकडून यंदा चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. परंतू आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये धोनीकडून फक्त निराशा पदरी पडलेली आहे. धोनी यंदाच्या हंगामात आपला फॉर्म का बरं हरवून बसला असले, त्याच्या अपयशी होण्यामागची कारणं काय असावीत?? याचा घेतलेला हा आढावा…

धोनीची फटकेबाजीची क्षमता कालानुरुप कमी होतेय का??

आकडेवारीवर नजर टाकली तर ही गोष्ट खरी ठरते. टी-२० क्रिकेटमध्ये धोनीचा स्ट्राईक रेट आहे १३५.५४, आयपीएलमध्ये धोनीचा स्ट्राईक रेट आहे १२५.१९…धोनीने आतापर्यंत ३२६ टी-२० सामने खेळले ज्यात त्याच्या नावावर ३०१ षटकार जमा आहेत. २००८ ते २०१९ या काळात धोनीने खेळलेल्या १९० आयपीएल सामन्यांमध्ये धोनीने २०९ षटकार मारलेत. त्यामुळे ढोबळमानाने गणित केल्यास प्रत्येक सामन्यात धोनीने किमान १ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार लगावले आहेत. २०१८ चा आयपीएल हंगाम हा धोनीसाठी चांगला गेला. १६ सामन्यांमध्ये धोनीने ३० षटकार लगावले. गेल्या वर्षीच्या हंगामात ही आकडेवारी १५ सामन्यांत २३ षटकार अशी खाली आली. या दोन वर्षांची तुलना करायला गेल्यास यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये धोनी फक्त ६ षटकार मारु शकला आहे. त्यामुळे धोनी पूर्वीसारखी फटकेबाजी आता करु शकत नाहीये हे सिद्ध होतंय.

वाढतं वय आणि संथ फलंदाजी –

धोनीची गेल्या काही वर्षांमधली फलंदाजी नीट पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पूर्वीप्रमाणे फटकेबाजी न करता धोनीने मैदानावर येऊन एकेरी-दुहेरी धावा घेत आपली इनिंग बिल्ड केली आहे. २०१९ विश्वचषकात विंडीजविरुद्ध सामन्यात संघ १५०/४ असा संकटात सापडलेला असताना धोनीने सावध खेळ करत नाबाद ५६ धावा झळकावत संघाला २६८ धावांचा टप्पा गाठून दिला. या सामन्यात हार्दिकने फटकेबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला तर धोनीने एक बाजू लावून धरली. याआधीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांमध्ये त्याची अशीच संथ खेळी पहायला मिळाली. यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये दोनी दोनवेळा नाबाद राहिला. पहिल्यांदा सनराईजर्स हैदराबादविरुद्ध ३६ चेंडूत ४७ धावा आणि यानंतर राजस्थानविरुद्ध सामन्यात १७ चेंडूत २९ धावा करत धोनी नाबाद राहिला.

धोनी पूर्वीसारखी फलंदाजी का करत नाहीये??

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने धोनीला वगळून ऋषभ पंतला संधी दिली. सुमारे वर्षभर धोनी क्रिकेटपासून दूर होता. यानंतर नवीन वर्षात मार्च महिन्यात धोनी आयपीएलमधून पुनरागमन करणार होता, परंतू करोनामुळे परिस्थिती बिघडली आणि त्याचं पुनरागमन लांबलं. बीसीसीआयने युएईत स्पर्धेचं आयोजन करुन खेळाडूंना दिलासा दिला…पण करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिल्यामुळे धोनीचा म्हणावा तसा सराव झालेला नव्हता. यंदाच्या हंगामात एका सामन्यानंतर धोनीनेच याची कबुली दिली होती.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांच्या मते वर्षभराच्या कालावधीने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणं सोपी गोष्ट नसते. सध्या करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सामना खेळण्यासाठी तो अजुन पूर्णपणे फिट वाटत नाही. धोनीचं वाढतं वय लक्षात घेता त्याला स्वतःला फिट राखण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे, आता हे पहिल्यासारखं सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम त्याच्या खेळावर जाणवतो आहे.

सरावाला संधी न मिळणं धोनीला पडतंय महागात –

तेराव्या हंगामासाठी चेन्नईचा संघ युएईत दाखल झाल्यानंतरही संघातील दोघांना करोनाची लागण झाल्यामुळे चेन्नईच्या संघाला जास्तीचा काळ क्वारंटाइन व्हावं लागलं. यानंतरही सलामीच्या सामन्याआधी धोनीला सरावासाठी फारसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे मैदानात फटकेबाजी करताना धोनीचं टायमिंग योग्य रितीने साधलं जात नाहीये. पूर्वीप्रमाणे त्याच्या शरिराची हालचाल होताना दिसत नाही. यंदाच्या हंगामात धावा घेताना धापा टाकणारा धोनी असं विदारक चित्र सर्वांना पहायला मिळालं.

धोनी थकला, पण ३६ व्या वर्षात डिव्हीलियर्स अजुनही फटकेबाजी कसा करतोय??

एकीकडे धोनी फलंदाजीत निराशाजनक कामगिरी करत असताना दुसरीकडे एबी डिव्हीलियर्सही वयाच्या ३६ व्या वर्षी मैदानात तुफान फटकेबाजी करतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डिव्हीलियर्सचा फॉर्म अजुनही कायम आहे. परंतू धोनी आणि डिव्हीलियर्स या दोन्ही खेळाडूंमध्ये एक महत्वाचा फरक असा आहे की धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आणि आयपीएलचा अपवाद सोडला तर स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत नाही. दुसरीकडे डिल्हीलियर्स हा बिग बॅश लिग, स्थानिक स्पर्धांमध्ये खेळतो. तसेच धोनीच्या तुलनेत डिव्हीलियर्सच्या फलंदाजीची रेंज मोठी आहे. मि.३६० असं बिरुद मिरवणारा डिव्हीलियर्स मैदानात अनेकदा स्कूप, रिव्हर्स स्विप असे अनेक फटके खेळत चौफर फटकेबाजी करतो. धोनीच्या बाबतीत असं होतं नाही. फटकेबाजी करण्यात धोनी जरीही माहीर असला तरीही तो मैदानावर स्थिरावण्यासाठी आधी एकेरी दुहेरी धावा काढण्याला प्राधान्य देतो.

एरवी अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जचं यंदाच्या हंगामातलं आव्हान आता जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. उर्वरित सामन्यांमध्ये एक पराभव झाल्यास चेन्नई स्पर्धेबाहेर जाईल. आता प्रश्न इतकाच उरतो की धोनी पुन्हा पूर्वीसारख्या फॉर्ममध्ये येईल का?? तर यासाठी धोनीला नेट्समध्ये सरावाची प्रचंड गरज असल्याचं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं आहे.