ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १४६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. चौथ्या दिवसअखेर भारताची अवस्था ५ बाद ११२ अशी होती. त्यानंतर शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाला आणि सुमारे तासाभरात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ५ बळी टिपले. हनुमा विहारी आणि ऋषभ पंत या जोडी सामना वाचवता आला नाही. या सामन्यात भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडूची उणीव जाणवली. त्यामुळे आपली तंदुरुस्ती सिद्ध केलेल्या हार्दिक पांड्याला पुढील सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

या दरम्यान हार्दिक पांड्याने आपला क्रिकेटमधील गुरु कोण याबाबत सांगितले आहे. तो म्हणाला की मुंबई इंडियन्स या संघातून खेळायला लागलो तेव्हापासून मला क्रिकेटमध्ये थोडे फार नाव मिळाले. मुंबई हेच माझे पहिले घर आहे, कारण येथूनच मी क्रिकेटमधील चांगली सुरुवात करू शकलो. मी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियात स्थान मिळवले हे खरे असले तरी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्यामुळे मला खरी ओळख मिळाली, असे हार्दिकने एका मुलाखतीत सांगितले.

पॉंटिंगने मला खूप काही शिकवले. त्याने मला कायम खेळण्यासाठी पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. क्रिकेटप्रेमी मला ओळखू लागले ते रिकी पॉन्टिंगमुळे. त्याने माझ्यातील गुणवत्ता ओळखली आणि मला चांगला खेळ कसा करावा ते शिकवले. त्यामुळेच मी मुक्तपणे आणि निर्भीडपणे खेळायला शिकलो, असेही तो म्हणाला.