प्रदीप नणंदकर

लातूर भाजपमधील गटबाजी आता नवीन राहिलेली नाही. भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसवासी झालेले आणि पुन्हा भाजपात आलेले शिवाजी पाटील कव्हेकर आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांच्यात सुरू झालेल्या शीतयुद्धाने ही गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. लातूर जिल्हा परिषद, लातूर महानगरपालिका,जिल्ह्यातील दहा पंचायत समित्या, चार नगरपालिका ,आणि लातूर बाजार समितीची निवडणूक आता समोर आली आहे. १४ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, खासदार सुधाकर शृंगारे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीस शिवाजी पाटील कव्हेकर यांना निमंत्रित केले नाही किंवा मेळाव्यासाठीचे जे आवाहन करण्यात आले त्यावरही शिवाजी पाटील कव्हेकर यांचे नाव लिहिले गेले नाही, याबद्दल कव्हेकर समर्थक कार्यकर्त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांच्यावर टीकेची झोड उठवणारे प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

जिल्हाध्यक्ष रमेश कराड हे जाणीवपूर्वक शिवाजी पाटील कव्हेकर यांना डावलतात, त्यामुळे ते गटबाजी करत असल्याने पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रसिद्धी पत्रकावर कव्हेकर समर्थकांमध्ये व्यापारी आघाडीचे संचालक बाबासाहेब कोरे, भाजपा ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत शेळके ,उपाध्यक्ष निळकंठ पवार, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रताप शिंदे ,ग्रामीण जिल्हा चिटणीस बाबासाहेब देशमुख ,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या सह्या आहेत. पक्षाचे प्रदेश स्तरावरील नेते याची दखल घेणार का, हे ४ जून रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी स्पष्ट होणार आहे.

कव्हेकरांची प्रदक्षिणा

माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी आत्तापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षापासून झाली. ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व प्रदेश स्तरावर ही काम करत होते. लातूरच्या बाजार समितीत विलासराव देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव करत ते निवडून आले. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांचा त्यांनी धक्कादायक पराभव केला तेव्हा ते जनतादल पक्षात होते. राष्ट्रवादी काँग्रेस ,भाजपा पुन्हा काँग्रेस असा त्यांचा प्रवास झाला व गेल्या तीन वर्षापासून ते पुन्हा भाजपावासी झाले आहेत. भाजपने त्यांची वाटचाल पाहून त्यांना तिष्ठत ठेवत नुकतीच त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व किसान मोर्चाचे गोवा प्रभारी अशी जबाबदारी दिली आहे. त्यांनी आता भाजपमधील गटबाजीच्या विरोधात टीका करणारे पत्रक आपल्या समर्थकाकरवी काढल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे. पूर्वी ते भाजपात असताना रमेश कराड व त्यांच्यात चांगलेच वैमनस्य होते आता कराड हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत ,आमदार आहेत त्यामुळे कव्हेकर जुना राग काढत असल्याचा आरोपही त्यांच्यावर होतो आहे.

सन्मान मिळत नसल्याची तक्रार

शिवाजीराव कव्हेकरांचा जिल्हाध्यक्ष सन्मान करत नाहीत अशी त्यांच्या समर्थकांची तक्रार आता विरोधी पक्ष नेते देवंद्र फडणीस यांच्यापर्यंत करण्यात आली आहेे. जिल्हाध्यक्ष रमेश कराड जाणीवपूर्वक अवमानकारक वागणूक देत असल्याची कव्हेकरांची तक्रार त्यांच्या समर्थकांनी प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांच्याकडेही केली आहे.