नागपूर : स्मार्ट सिटीकडे शहराची वाटचाल सुरू असताना लोकसंख्येच्या तुलनेत शहरात  चांगल्या स्वच्छता गृहाचा अभाव आणि आहे त्या सार्वजानिक स्वच्छता गृहाची दयनीय अवस्था बघता गेल्या काही दिवसात महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत ठोस पाऊले उचलली नाही तर जी-२० सिविल सोसायटीपुढे पोलखोल करण्याचा इशारा नागपूर सिटीझन फोरमने दिला. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर सिटिझन्स फोरमने शहरातील सार्वजानिक स्वच्छतागृहाच्या विषयावर व्हेरायटी चौकात आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

हेही वाचा >>> कर्तव्यावर असतानाही गैरहजर दाखविले; आशा, गटप्रवर्तक अन्यायाविरोधात एकवटल्या, जि.प. अध्यक्षांनी दिले चौकशीचे निर्देश

शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या, महाविद्यालयीन युवती, नोकरदार महिला व विविध बाजारपेठांमध्ये काम करणाऱ्या महिला प्रातिनिधीक स्वरुपात या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. स्वच्छ व सुरक्षित प्रसाधन गृहांची मागणी करणारे फलक हाती घेत आंदोलनकर्त्या महिलांनी नागपूर महा पालिका व जनप्रतिनिधीच्या विरोधात घोषणा देत रोष प्रकट केला. गेल्या वर्षभरापासून नागपूर सिटिझन्स फोरमने “राईट टू पी” हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत जनजागृती, पब्लिक टाॅयलेटची तपासणी व जनमत संग्रह असे विविध उपक्रम आयोजित केले. महाविद्यालयीन विद्यार्थीनी, नोकरदार महिला, ऑटो रिक्षा चालक व फुटपाथ दुकानदारांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन महापालिका प्रशासनाकडे स्वच्छ व मुबलक स्वच्छता गृहांची मागणी केली.