पुणे : बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध आता नागरिकही कारवाई करू शकणार आहेत. पुणे पोलिसांनी विकसित केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ या मोबाइल ॲपद्वारे वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात थेट तक्रार करता येणार असून, त्याची पडताळणी करून वाहतूक विभागाकडून ४८ तासांत कारवाई केली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवनात या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते. वाहतूककोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक पोलिसांकडे असलेले मर्यादित मनुष्यबळ या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हे ॲप विकसित करण्यात आले आहे. ॲपच्या माध्यमातून नागरिक हे बेशिस्त वाहनचालकांचे छायाचित्र आणि माहिती पोलिसांकडे पाठवू शकतात. पदपथावर उभ्या असलेल्या किंवा चालविल्या जाणाऱ्या वाहनांची माहिती, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाइल वापरणे, फॅन्सी वाहन क्रमांक, काळी फिल्म लावलेली वाहने अशा प्रकारच्या नियमभंगाबाबत नागरिक तक्रार करू शकतील. तक्रार मिळाल्यानंतर ४८ तासांत पडताळणी करून पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून, तक्रारदाराचे नाव उघड न करण्याची दक्षता घेण्यात आली आहे. याशिवाय वाहतूककोंडी रोखण्यासाठी या ॲपच्या माध्यमातून अपघात, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यात पाणी साचणे, झाड कोसळणे, वाहन बिघडणे, बेवारस वाहन याबाबतची माहिती नागरिक देऊ शकणार आहेत.
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’च्या माध्यमातून नागरिकांना अधिक जबाबदारीची भूमिका निभावण्याची संधी मिळणार आहे. वाहतुकीला शिस्त लावणे, तसेच बेशिस्तांवर कारवाईसाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या ॲपचा वापर करावा. मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त