पुणे : शिरूर तालुक्यातील कारेगावात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना ग्रामीण पोलिसांनी पकडले. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे, तसेच ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध पारपत्र अधिनियमांतर्गत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमरोल रमजान शेख (वय ३२, रा. खोलना, बांगलादेश), अकलस मजेद शेख (वय ३९, रा. गोपालगंज, बांगलादेश), मोहम्मद अब्दुल्ला मलिक (वय ३५), जाहिद अबूबकर शेख (वय ३०, रा. दोघे रा. नोडाइल, बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत दहशतवादविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मोसीन बशीर शेख यांनी फिर्याद दिली आहे.

शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरात शेख, मलिक बेकायदा वास्तव्य करत होते. चौघांनी दलालाकडून बनावट आधारकार्ड मिळविले होते. कारेगावात बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर रांजणगाव पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाई केली. चौघांना अटक करून शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, अविनाश थोरात, विशाल गव्हाणे, दत्तात्रय शिंदे, विशाल भोरडे, रवींद्र जाधव, मोसीन शेख, ओमकार शिंदे, योगेश गुंड, संतोष साळुंखे, आकाश सवाने आणि पथकाने ही कारवाई केली.