मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका म्हणून ओळखली जाणारी कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३ मार्गिका गुरुवार, ९ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. या मार्गिकेचे काम २०१७ मध्ये सुरू झाले होते. काम सुरू झाल्यानंतर पाच-सहा वर्षांत ही मार्गिका पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे मार्गिकेस विलंब झाला. अखेर आता ‘मेट्रो ३’ पूर्ण क्षमतेने धावू लागली असून आता आरे – कफ परेड दरम्यानचा दोन तासांचा प्रवास केवळ ५६ मिनिटांत करता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘मेट्रो ३’ प्रकल्प नेमका कसा आहे, या प्रकल्पास विलंब का झाला आणि आता या मार्गिकेचा कसा फायदा प्रवाशांना होणार याबाबत घेतलेला हा आढावा…
मुंबईतील पहिली भुयारी मार्गिका

‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ -आरे मेट्रो ३’ ही ३३.५ किमी लांबीची मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका आहे. वांद्रे – कुलाबा मेट्रोची संकल्पना २००४ मध्ये मांडण्यात आली. पुढे एमएमआरडीएच्या प्रकल्पात ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ अशी ही मार्गिका करण्यात आली. प्रकल्पाचे नियोजन आणि आराखडा २०११ मध्ये तयार करण्यात आला. मात्र सरकारने या प्रकल्पाला २०१४ मध्ये मान्यता दिली. पुढे आवश्यक त्या परवानग्या घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कंत्राटदाराला कार्यादेश देऊन काम सुरू करण्यासाठी २०१७ उजाडले. मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या ठिकाणी भूगर्भात खोदकाम करण्याचे मोठे आव्हान एमएमआरसीसमोर होते. हे आव्हान पेलण्यासाठी आणि अंदाजे ५२ किमीचे (येण्यासाठी-जाण्यासाठी) भुयारीकरण करण्यासाठी एमएमआरसीने अत्याधुनिक असे टनेल बोरिंग यंत्र अर्थात टीबीएम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. मुंबईच्या पोटात (भूगर्भात) १७ अवाढव्य टीबीएम सोडून भुयारीकरणाला सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून पाच वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार होते. मात्र तांत्रिक अडचणी,आव्हानात्मक काम, आणि विविध कारणांमुळे प्रकल्प वादात अडकला. त्यामुळे कामावर परिणाम झाला आणि प्रकल्प लांबत गेला. आता मात्र या मार्गिकेचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी ऑक्टोबर २०२४ मध्ये आणि बीकेसी – आचार्य अत्रे चौक टप्पा मे २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आता आरे – कफ परेड दरम्यान ‘मेट्रो ३’ गुरुवार, ९ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे.

आरे ते कफ परेड केवळ ५६ मिनिटांत?

मेट्रो ३ मार्गिकेवर सकाळी ५.५५ ते रात्री १०.३० दरम्यान मेट्रो धावणार आहे. आरे – आचार्य अत्रे चौक मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या ७० हजार आहे. पण आता पूर्ण क्षमतेने ‘मेट्रो ३’ धावू लागल्याने ही संख्या वाढून दोन-अडीच लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या मार्गिकेवरील अपेक्षित दैनंदिन प्रवासी संख्या १३ लाख इतकी आहे. हे उद्दीष्ट्य गाठण्यासाठी पुढील काही वर्षे कठीण वाटत आहे. पण आता ही मेट्रो आरे, विमानतळ, बीकेसी, दादर, प्रभादेवी, वरळी, गिरगाव, काळबादेवी, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, विधानभवन अशा वर्दळीच्या, महत्त्वाच्या भागांना जोडत असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

तिकीट दर कसे असतील?

‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील तिकीट दर १० ते ७० रुपयांदरम्यान आहे. पहिल्या तीन किमीपर्यंतच्या प्रवासासाठी १० रुपये तिकीट असून पुढे ते किमीप्रमाणे वाढत जाते. त्यानुसार आरे – कफ परेड प्रवासासाठी प्रवाशांना ७० रुपये मोजावे लागत आहेत. आचार्य अत्रे चौक – कफ परेडसाठी ४० रुपये, बीकेसी – कफ परेडसाठी ६० रुपये तिकीट आहे. या मार्गिकेच्या माध्यमातून प्रवाशांना आता आरे – कफ परेड प्रवास दोन तासांऐवजी केवळ ५६ मिनिटात करता येणार आहे. या मार्गिकेतील कफ परेडवरून गुरुवारी सकाळी ५.५५ वाजता पहिली मेट्रो गाडी सुटली. आता आरे – कफ परेड मार्गिकेवर २८ मेट्रो गाड्यांच्या २८० फेऱ्या होत आहेत. गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांने भुयारी मेट्रो धावत आहे. पुढे ही मेट्रो मार्गिका अन्य मेट्रो मार्गिकांशी जोडली जाणार आहे. तर ३३७ किमीच्या मेट्रोचे जाळे पूर्ण झाल्यानंतर या मार्गिकेवरून इतर मेट्रो मार्गिकांवर पोहचणेही प्रवाशांना सोपे होणार आहे. मेट्रोचे जाळे निर्माण झाल्यास मेट्रो ३ सह सर्वच मेट्रो मार्गिकांना चांगला प्रतिसाद मिळेल आणि मेट्रो मार्गिका मुंबईची नवीन जीवनवाहिनी ठरेल असा दावा यानिमित्ताने केला जात आहे.

आतापर्यंतचा सर्वाधिक वादग्रस्त प्रकल्प?

आजघडीला मुंबईत अनेक पायाभूत सुविधा, विकास प्रकल्प सुरू आहेत. मात्र या सर्व प्रकल्पात ‘मेट्रो ३’ सर्वाधिक वादग्रस्त ठरला. आरे कारशेड आणि या प्रकल्पातील वृक्षतोड यामुळे हा प्रकल्प वादात अडकला. ‘मेट्रो ३’ची कारशेड आरेतील ३३ हेक्टर जागेवर उभारण्याचे जाहीर झाल्यापासून ते २०२२-२३ पर्यंत यावरून प्रचंड वाद सुरू होता. आजही पर्यावरणप्रेमी आरे कारशेडमुळेच मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कारशेड मार्गी लागली असली तरी वाद पूर्णत: संपलेला नाही. दरम्यान, २०१४ पासून आरे कारशेडला विरोध वाढला आणि ‘आरे वाचवा’सारखी जनचळवळ उभी राहिली.एमएमआरसीने २०१९ मध्ये रात्री झाडे कापल्यानंतर मोठ्या संख्येने मुंबईकर, पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले होते. काही दिवस यावरून मोठे आंदोलन सुरू होते. कारशेड आणि वृक्षतोडीवरून उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. या मार्गिकेच्या खर्चावरूनही वाद निर्माण झाला आहे. या मार्गिकेचा मूळ खर्च २३ हजार १३६ कोटी रुपये असा होता. पुढे तो ३३ हजार ४०५ कोटी आणि आता ३७ हजार कोटींच्यावर गेला आहे.