शुद्ध परंपरेचे पाईक राहून प्रयोग करीत राहिले, तरच संगीतातील अभिजातता टिकवता येईल, हे बालमुरलीकृष्ण यांनी ओळखले होते..

कर्नाटक संगीत हे हिंदुस्तानी संगीतापेक्षा कर्मठ असल्याची टीका सातत्याने होत असते. या पाश्र्वभूमीवर बालमुरलीकृष्ण यांनी भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर यांच्यासह सहगायन करून हिंदुस्थानी आणि कर्नाटक या दोन्ही परंपरांना जवळ आणण्याचा केलेला प्रयत्न अतिशय मोलाचा म्हटला पाहिजे.

जागतिक पातळीवर भारतीय संगीताचे स्थान अनन्यसाधारण मानले जाते, याचे कारण येथील असामान्य प्रतिभेच्या कलावंतांनी त्या संगीतात गेल्या अनेक शतकांमध्ये दिलेले प्रचंड योगदान हे आहे. सांस्कृतिकदृष्टय़ा कमालीची विविधता असलेल्या भारतासारख्या देशात संगीताने एकता आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळेच एवढय़ा मोठय़ा देशात समांतर म्हणता येतील अशा दोन संगीतपरंपरांचा उदय झाला आणि त्या दोन्ही परंपरा आपापले स्वत्व जपत, एकमेकांशी कोणत्याही पातळीवर द्वंद्वभाव न ठेवता, सातत्याने पुढे जात राहिल्या. हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत अशा दोन स्वायत्त आणि स्वतंत्र संगीतपरंपरा सुखाने नांदणारा देश म्हणून भारताला आपली मान निदान संगीताच्या क्षेत्रात तरी उंचावत ठेवता आली आहे. डॉ. एम. बालमुरलीकृष्ण यांच्यासारख्या कलावंताने या दोन्ही परंपरांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, तो अधिक महत्त्वाचा आणि संगीताच्या भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरला. गेली सुमारे पन्नास वर्षे हा कलावंत कर्नाटक संगीतात आपले स्थान अढळ करण्याचा प्रयत्न करीत असताना, अतिशय उदात्त आणि उन्नत असलेल्या हिंदुस्थानी संगीतपरंपरेशी आपली नाळ कशी जोडता येईल, याचा विचार करीत राहिला. गेली अनेक शतके, निखळपणे शुद्ध राहिलेल्या कर्नाटक संगीताचे वैशिष्टय़च हे की कोणत्याही अन्य संगीतपरंपरेचा या संगीतावर जराही परिणाम झाला नाही. हिंदुस्थानी संगीतावर मुसलमानी आक्रमणानंतर झालेला परिणाम स्पष्टपणे जाणवत असताना, कर्नाटक संगीताने आपली शुद्धता जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि ही परंपरा समृद्ध करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. स्वर, राग, ताल या संगीतातील मूलभूत गोष्टी दोन्ही संगीतात समान असल्या तरीही त्याच्या सादरीकरणात झालेला बदल या दोन परंपरांचे वेगळेपण स्पष्ट करतो. हे वेगळेपण टिकवण्यासाठी कर्नाटक संगीतात कर्मठपणा आला, अशी टीकाही होते. हिंदुस्थानी संगीतात अन्य संस्कृतींमधून आलेले संगीत अलगदपणे येऊन मिसळले आणि त्याने दुधात साखर विरघळावी तशी एका नव्याच स्वादाची अनुभूती निर्माण झाली. लोकसंगीतातून आलेल्या संगीताला अभिजात होण्याच्या वाटेवर आलेली अनेक प्रकारची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय आक्रमणे परतवून लावत हिंदुस्थानी संगीताने आपले वेगळेपण सातत्याने सिद्ध केले आणि आपली संगीतपरंपरा काळानुसार बदलवत ठेवण्याचाही प्रयत्न केला. कर्नाटक संगीताने आपली मूळ परंपरा जपण्याचा जो प्रयत्न केला, तो अभूतपूर्व म्हणावा, असा होता. दक्षिणेत मुसलमानी आक्रमण झाल्यानंतरही तेथील संगीतपरंपरेत जराही बदल होऊ न देण्यासाठी सामान्यजनांपर्यंत पोहोचलेल्या संगीताची जपणूक या संगीताचे जनचळवळीत रूपांतर झाले म्हणूनच होऊ शकली. बालमुरलीकृष्ण हे अशा शुद्ध परंपरेचे पाईक होते.

कर्नाटक संगीताच्या परंपरेचा बालमुरलीकृष्ण यांचा व्यासंग होता आणि तो करण्यासाठी त्यांना घरातूनच पाठबळ मिळाले होते. ज्या काळात संगीतसाधना म्हणजे भिकेचे डोहाळे समजले जात, त्याच काळात दक्षिणेकडील प्रांतांमध्ये मात्र संगीताला सार्वजनिक जीवनात प्रचंड महत्त्व होते. प्रत्येक घरात हे संगीत पोहोचले होते आणि प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संगीताची साधना करीत होता. हा काळ कर्नाटक संगीतासाठी खडतर असला, तरीही सामाजिक जीवनात संगीताला महत्त्व असल्यानेच ते संगीत आपली शुद्धता पुरेपूर टिकवू शकले. बालमुरलीकृष्ण यांचे वडील प्रसिद्ध वीणा आणि व्हायोलिनवादक होते. त्यांच्या मातोश्रीही वीणावादन करीत. आई आणि वडील यांच्यामुळे बालमुरलीकृष्ण यांनी संगीताच्या प्रांतात येणे स्वाभाविक मानले, तरीही तेथे स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी करावी लागणारी मेहनत आणि त्या संगीतातील नाजूक, सूक्ष्म पातळीवरील तपशिलांना आत्मसात करून त्यामध्ये नवी भर घालण्याचे काम स्वत: कलावंतालाच करणे भाग असते. बालमुरली यांनी ते अथक प्रयत्नाने साध्य केले आणि त्यामुळेच त्यांना आचार्यपदापर्यंत पोहोचता आले. संगीताच्या क्षेत्रात नवे प्रयोग करताना परंपरेशी फटकून वागता येत नाही. परंपरेतूनच नवतेचा शोध घेताना, प्रतिभा आणि प्रज्ञा यांचा संगम झाला नाही, तर ती कला अभिजाततेच्या पातळीवर पोहोचू शकत नाही. बालमुरली यांनी नेमके हेच केले आणि त्या संगीतातील परंपरांचा शोध घेता घेताच त्यांनी ते संगीत पुढे नेण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. अन्यथा घरोघरी असलेल्या कलावंतांसाठी ते आदराचे ठरतेच ना.

कर्नाटक संगीतातील परंपरा गायनाशी निगडित आहेत, हे खरे असले तरीही पाश्चिमात्यांकडून आलेल्या व्हायोलिन या वाद्याने या संगीतात आपले जे अढळ स्थान निर्माण केले, ते हिंदुस्थानी संगीतात सारंगी या वाद्याला मिळवता आले नाही. काळाच्या त्याच टप्प्यात हार्मोनिअम या वाद्याच्या आगमनानंतर हिंदुस्थानी संगीतात या परदेशी स्वर बनावटीच्या वाद्याने बस्तान बसवले. कर्नाटक संगीतात मात्र या वाद्याला प्रवेशबंदी झाली, याचे कारण गळ्याशी जवळ जाणाऱ्या सारंगीला पर्याय ठरणाऱ्या व्हायोलिनने तेथे आपली जागा निश्चित केली होती. ब्रिटिशांनीही आश्चर्याने बोटे तोंडात घालावीत, इतके या वाद्यावर प्रभुत्व मिळवलेल्या कलावंतांनी व्हायोलिनला संगीताच्या दरबारात अतिशय मानाचे स्थान मिळवून दिले. त्यामुळे कर्नाटक संगीतात वाद्यवादनात व्हायोलिनशिवाय अन्य वाद्याला शिरकावच करता आला नाही. म्हणजे सतार, सरोद, बासरी यांसारख्या वाद्यांवर कर्नाटक संगीत वाजवण्याची कल्पनाही त्यामुळे मागे पडली असावी. गायन हाच या संगीताचा पाया होता, याचे कारण या संगीतातील नव्या परंपरा गीताशी निगडित होत्या. पुरंदरदास या संताने या संगीतात जी पद्यांची भर घातली, त्यामुळे या संगीताला शब्दप्रधानता मिळाली. हे पुरंदरदास मूळचे महाराष्ट्रातील, पुण्याजवळील पुरंदर तालुक्यातील. संत नामदेव पंजाबात गेले, तसे संत पुरंदरदास कर्नाटकात गेले. या दोघांनीही त्या त्या प्रांतात आपले अढळ स्थान निर्माण केले. पुरंदरदासांच्या संगीतरचना आजही कर्नाटक संगीतातील अविभाज्य घटक मानल्या जातात. त्यागराज हे या संगीताचे आद्य गुरू. त्यांच्या परंपरेत राहून बालमुरलीकृष्ण यांनी आपली साधना केली आणि त्या संगीतात नव्याने मोलाची भर घातली.

कर्नाटक संगीत कर्मठ असल्याची टीका सातत्याने होत असते. त्या संगीतात हिंदुस्थानी संगीताप्रमाणे उत्स्फूर्तता नसल्याचेही म्हटले जाते. मुक्तपणा नसल्याचेही सांगितले जाते. या पाश्र्वभूमीवर बालमुरलीकृष्ण यांनी हिंदुस्थानी आणि कर्नाटक या दोन्ही परंपरांना जवळ आणण्याचा केलेला प्रयत्न अतिशय मोलाचा म्हटला पाहिजे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे तर मूळचे कर्नाटकातील. त्यांना तेथील संगीताची उत्तम जाण होती. कन्नड संगीत नाटकांचे तर ते ‘हीरो’च बनले होते. तरीही तेथेच राहून त्यांनी हिंदुस्थानी संगीताची आराधना केली. या दोन्ही समांतर परंपरांचे महत्त्व जाणणाऱ्या भीमसेनजींबरोबर बालमुरलीकृष्ण यांनी सहगायनाचा कार्यक्रम केला. तो देशभर इतका नावाजला गेला, की या दोन्ही परंपरांबद्दलची आपुलकी त्यामुळे अधिकच वाढली. या दोन्ही दिग्गज कलावंतांनी आपापल्या परंपरांचे भान राखत असतानाच दुसऱ्याबद्दल दाखवलेली अदब महत्त्वाची होती. त्यानंतर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याबरोबरही असाच सहगायनाचा उपक्रम झाला, त्यालाही तेवढीच उत्स्फूर्त दाद मिळाली. एरवी या दोन परंपरा आपापल्या जागी थोर असताना, त्यांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न भारतीय संगीताच्या भवितव्याच्या दृष्टीने अनोखा होता. पाश्चात्त्य संगीतातील अनेक वाद्ये आणि गायनपद्धतींशी सांगड घालत भारतात फ्यूजन संगीताचे जे प्रयोग होत होते, त्यापेक्षा हा प्रयोग अधिक सकस होता आणि संगीत पुढे जाण्यासाठी उपयोगाचाही होता. बालमुरलीकृष्ण यांना त्यासाठी कायमच कुर्निसात करायला हवा. संगीत टिकवून ठेवणे आणि त्यामध्ये असामान्य ऊर्जा ओतून ते पुढे नेणे या दोन वेगळ्या गोष्टी असतात. दोन्हींना महत्त्व असले, तरीही ऊर्जा ओतणे केव्हाही अधिक वरच्या दर्जाचे. बालमुरलीकृष्ण हे दुसऱ्या प्रकारातील एक असामान्यत्व लाभलेले कलावंत होते. म्हणूनच त्यांचे निधन ही हुरहुर लावणारी आणि व्याकूळ करायला लावणारी घटना आहे. त्यांना ‘लोकसत्ता’तर्फे श्रद्धांजली!