05 April 2020

News Flash

विषाणू आणि विखार

अमेरिकी आरोग्य-सज्जतेचे धिंडवडे निघत असताना चीनला दोष देणे अमेरिकेस अशोभनीय आहेच आणि परवडणारेही नाही...

अमेरिकेच्या औषध उद्योगातील एका मोठय़ा प्रवाहावर चीनचे नियंत्रण असून तो आटल्यास अमेरिकेची कोंडी होईल असे अनेक तज्ज्ञ सोदाहरण दाखवून देतात.

अमेरिकी आरोग्य-सज्जतेचे धिंडवडे निघत असताना चीनला दोष देणे अमेरिकेस अशोभनीय आहेच आणि परवडणारेही नाही..

चीनशी चलनयुद्ध आणि व्यापारयुद्ध यांत अमेरिकेने तहाची तयारी दाखवली.. मात्र अमेरिकेच्या औषध उद्योगातील एका मोठय़ा प्रवाहावर चीनचे नियंत्रण असून तो आटल्यास अमेरिकेची कोंडी होईल असे अनेक तज्ज्ञ सोदाहरण दाखवून देतात..

काही नेते स्वत:च्या प्रतिध्वनी कक्षात मश्गूल असतात. तो त्यांचा ‘आनंद’ हिरावून घेण्याचा अधिकार आपणास नाही. पण या नेत्यांच्या आत्ममग्नतेमुळे इतरांच्या जीवनमानावर परिणाम होणार असेल तर मात्र त्याची दखल घ्यावी लागते. हे असे नेते अन्य कोणाशी संवाद साधत नाहीत. तसे करणे त्यांना कमीपणाचे वाटते. ते फक्त स्वत:चाच आवाज ऐकतात. अशा मातबरांच्या मांदियाळीतील मोठे नाव म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. ते सध्या करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीस सामोरे जात आहेत. जी गोष्ट घडणारच नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता तीच अंगावर येऊन आदळल्यामुळे त्यातून मार्ग काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या अशा आत्ममग्न नेत्यांचे आणखी एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्या स्वत:च्या प्रेमात ते इतके आकंठ विहार करीत असतात की त्यांना त्यामुळे आपल्याच वागण्यातील विसंगती दिसतदेखील नाही. म्हणूनच सध्याच्या करोना साथीसाठी ट्रम्प चीनला दोष देतात. जगाने चीनला खडसावले पाहिजे आणि त्या देशाकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई घ्यायला पाहिजे असेही त्यांचे मत आहे. त्यांचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पेओ हे त्यापेक्षाही एक पाऊल पुढे गेले आणि या संपूर्ण साथीची जबाबदारी त्यांनी चीनवर टाकली.

दोनच आठवडय़ांपूर्वी खुद्द ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची या साथ हाताळणीसाठी पाठ थोपटली होती. ही करोनाची साथ हाताळण्यात जिनपिंग यांनी दाखवलेली कार्यक्षमता आणि कौशल्य वाखाणण्यासारखे आहे, असे या ट्रम्प यांचे मत होते. पण दोनच आठवडय़ांत ते बदलले आणि नायकत्वाच्या स्थानी बसवले गेलेल्या जिनपिंग यांच्या शिरावर ट्रम्प यांनी आपल्याच हाताने खलनायकत्वाचा काटेरी मुकुट ठेवला. गेल्या आठवडय़ात त्यांनी करोनाचा उल्लेख ‘चिनी विषाणू’ असा केला. पोम्पेओ या विषाणूस ‘वुहान विषाणू’ म्हणाले. या आजाराचा संबंध चीनशी जोडण्यातील अमेरिकेची उतावीळताच यातून उघड होते. ‘चीनने जगास या आजाराच्या गांभीर्याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती’, असे ट्रम्प यांचे म्हणणे. ते किती चूक वा बरोबर याची या क्षणी चर्चा करणे फजूल आणि निर्थक. याचे कारण असे काही होऊ  घातल्याची कल्पना प्रथम अमेरिकेच्या गृह आणि सुरक्षा यंत्रणांनीच आपल्या अध्यक्षांना दिली होती. याचा अर्थ अमेरिकेवर असे काही संकट आल्यास सामोरे जावे लागण्यासाठी काय काय करावे लागेल आणि ते कसे करावयाचे याचा साद्यंत अहवाल अमेरिकेच्या संबंधित यंत्रणांनी सिद्ध केला होता, असे धक्कादायक सत्य पुढे आले आहे. तथापि, आत्ममग्न ट्रम्प यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचेच परिणाम अमेरिका आता भोगताना दिसतो. हे का आणि कसे झाले हे समजून घेणे फारच उद्बोधक ठरावे.

साधारण ११ वर्षांपूर्वी, २००९ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीआधीच, अमेरिकेत एबोला या आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याचे समजले, तोवर धाकटे जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला आणि या आजाराच्या निमित्ताने साथीच्या आजारांवरील संशोधनास गती दिली. ओबामा काळात म्हणजे त्याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात या संदर्भात चाचणी घेतली गेली. तीत या रोगाचे गांभीर्य होते त्यापेक्षा अधिक दाखवले गेल्याचे आढळले. पण याचा परिणाम असा की त्यामुळे भीती वाटत होती तितके बळी या आजाराने घेतले नाहीत. त्यामुळे त्यानंतर आलेल्या एबोलाच्या साथीला अमेरिकेने अधिक तयारीने तोंड दिले.

यातूनच पुढे त्या देशाची अशा आजाराबाबतची संरक्षण सिद्धता वाढली आणि ती तशी वाढावी यासाठी प्रत्येक अध्यक्षाने प्रयत्न केले. यातील शेवटचा मोठा प्रयत्न बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय काळात झाला. त्यात सर्वोच्च पातळीवर विविध यंत्रणांनी एकत्र येऊन असे काही झाल्यास परिस्थिती कशी हाताळायची यासाठी काही पद्धत ठरवून दिली. त्यातून अग्निशमन यंत्रणेच्या ज्या प्रमाणे चाचण्या घेतल्या जातात त्या प्रमाणे या आजार सिद्धता यंत्रणेच्या तपासण्या घेण्याची पद्धत स्वीकारली गेली. तीत अमेरिकेच्या गृह ते आरोग्य अशा सर्व महत्त्वाच्या यंत्रणा सहभागी होतात आणि खरोखरच अशी काही साथ आली आहे, असे मानून तितक्याच गांभीर्याने परिस्थिती हाताळतात.

या संदर्भातील अशी शेवटची चाचणी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात घेतली गेली. ‘क्रिम्झन कंटेजिअन’ असे तिचे नाव. वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, इलिनॉय आदी बारा राज्ये या चाचणीत सहभागी होती आणि पेंटागॉन, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, रेडक्रॉस आणि अमेरिकेची राष्ट्रीय परिचारिका संघटना आदींचा त्यात समावेश होता. या चाचणीचे निष्कर्ष आणि त्यानुसार करावयाचे उपाय याबाबत साद्यंत उपाययोजना ट्रम्प प्रशासनास सुचवली गेली. तथापि त्या सरकारातील उच्च पदस्थांत ‘संगीत खुर्ची’सदृश स्थिती असल्याने याबाबतच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले. ट्रम्प प्रशासनाचे एकेकाळचे महत्त्वाचे अधिकारी माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचा यानंतरच्या कार्यवाहीत महत्त्वाचा वाटा असणार होता. पण ट्रम्प आणि त्यांचे फाटले आणि दोघांतील मतभेद चव्हाटय़ावरही आले. याचा थेट परिणाम या चाचणी-पश्चात उपाययोजनांवर झाला. न्यूयॉर्क टाइम्स आदी नियतकालिकांनी दिलेल्या वृत्तानुसार या उपाय योजनांत विषाणुजन्य साथीच्या आणीबाणीत करावयाच्या उपाययोजना, औषध कंपन्यांना द्यावयाचे आदेश, आजार चाचणीसाठी आवश्यक साधनसामग्री निर्मितीस द्यावयाची गती अशा अनेक मुद्दय़ांचा समावेश होता.

नेमकी या सगळ्याचीच उणीव करोनाचा विषाणू अमेरिकेत मोठय़ा प्रमाणावर पसरला तेव्हा दिसून आली. ट्रम्प प्रशासन त्यामुळे दोन मुद्दय़ांवर उघडे पडले. एक म्हणजे त्यांच्याच सरकारने घडवलेल्या चाचण्या आणि त्यातील प्रस्तावांकडे झालेले दुर्लक्ष आणि दुसरे म्हणजे या साथीचे गांभीर्य समजून घेण्यातील असमर्थतता. यातील पहिल्यास ट्रम्प काही प्रमाणात जबाबदार आहेत तर दुसऱ्यास पूर्णपणे. ही साथ म्हणजे जणू काही कल्पनाविलास आहे असे त्यांचे सुरुवातीस वागणे होते. पण आता ते अंगाशी आले. अमेरिका सद्य:स्थितीत करोनाचा सर्वाधिक प्रसारक देश असून त्यामुळे त्या देशातील बळींच्या संख्येतही झपाटय़ाने वाढ होताना दिसते.

अशा वेळी खरे तर ट्रम्प यांनी आहे त्या परिस्थितीतून जास्तीत जास्त जणांचे सहकार्य घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ते राहिले बाजूलाच. उलट ट्रम्प या कसोटीच्या क्षणी चीनला बोल लावून त्या शत्रुत्वास अधिकच धार करीत असल्याचे मानले जाते. गेली दोन वर्षे चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावाचे राहिले आहेत. त्यातूनच दोहोंत आधी चलनयुद्ध आणि मग व्यापारयुद्ध झाले. ते पूर्ण शांत व्हायच्या आतच या करोनाच्या निमित्ताने काळ आला. म्हणून चीनला दुखावणे अगदीच अयोग्य. अमेरिकेच्या औषध उद्योगातील एका मोठय़ा प्रवाहावर चीनचे नियंत्रण असून तो आटल्यास अमेरिकेची कोंडी होईल असे अनेक तज्ज्ञ सोदाहरण दाखवून देतात.

तथापि आत्ममग्न ट्रम्प यांना याची जाणीव आहे का, हा खरा प्रश्न. या विषाणुग्रस्त वातावरणात आणखी नवा विखार ट्रम्प यांनी निर्माण करू नये अशी अपेक्षा संबंधित क्षेत्रात व्यक्त होते. पण त्यासाठी ट्रम्प यांना स्वत:चा प्रतिध्वनी कक्ष सोडावा लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 1:05 am

Web Title: coronavirus out break and its impact loksatta editorial dd70
टॅग Corona,Coronavirus
Next Stories
1 करताल वादनानंतर..
2 बहिष्काराचा विषाणू..
3 खोड आणि फांद्या
Just Now!
X