धोनीच्या दर्जाचा यष्टिरक्षक-फलंदाज मिळत नाही, हा मुद्दा नाही. धोनीला संघात ठेवण्याबाबत आग्रही राहताना धोनीचेच निकष पाळले जात नाहीत, हा खरा मुद्दा आहे..

महेंद्रसिंह धोनीला वार्षिक करारयादीतून वगळण्यात आले, ही बातमी नाही. तसे वगळले नसते, तरच ती खरी बातमी होती. क्रिकेटपटूंच्या श्रेणीनिहाय वार्षिक यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआय) काही निकष असतात. करारबद्ध होण्याच्या पात्रतेसाठी वर्षभर खेळत राहावे लागते. बीसीसीआयचे ‘वर्ष’ हे १ ऑक्टोबरला सुरू होते आणि ३० सप्टेंबरला संपते. या काळातील कामगिरीचा विचार करतानाच, संबंधित क्रिकेटपटूची पुढील क्रिकेट वर्षांतली संघाच्या दृष्टीने उपयुक्तता, आवश्यकता आणि उपलब्धता विचारात घेतली जाते. त्यानंतरच त्याचा करारयादीसाठी विचार केला जातो. धोनीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, विश्वचषक स्पर्धेनंतर तो भारतीय संघाकडून खेळलेला नाही. कसोटी क्रिकेटमधून त्याने कधीच निवृत्ती घेतलेली आहे. विश्वचषक स्पर्धा जुलै मध्ये संपली. दरम्यानच्या काळात भारतीय संघ अनेक सामने खेळला. या सामन्यांसाठी धोनीचा विचार निवड समितीने केलेला नाही किंवा धोनीनेही स्थानिक क्रिकेट खेळून पुन्हा संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाही. एकदिवसीय संघातही धोनीचा विचार केला जाणार नाही, असे निवड समितीने एक-दोनदा तरी सूचित केलेले आहेच. राहता राहिले टी-२० क्रिकेट. यात धोनी अजूनही आयपीएलच्या माध्यमातून सक्रिय आहे. तो आयपीएलमध्ये चमकला, तर या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी तो खेळणारच, असे प्रशिक्षक रवी शास्त्रीही म्हणाले आहेतच. सगळी गंमतच आहे. धर्मवेडय़ांप्रमाणेच क्रिकेटवेडे असलेल्या या देशामध्ये क्रिकेटमधील देवांना रिटायर करणे इतके अवघड का ठरते, हे तर्काग्रहींसाठी न सुटणारे कोडे आहे. असा खेळाडू इतर कोणी असता, तरी समजण्यासारखे होते. पण धोनीसारख्या कर्तव्यकठोर माजी कर्णधाराच्या बाबतीतही असे घडावे हे विचित्रच. याचे कारण क्रिकेटच्या मदानावर आपण कितीही बलाढय़ असलो, तरी मदानाबाहेरील शहाणपणामध्ये तसूभरही पुढे सरकलेलो नाही; यापेक्षा दुसरे काय असू शकेल?

सर्वप्रथम वर्तमानातील धोनीच्या उपयुक्ततेविषयी. परवा एका दुर्मीळ मुलाखतीमध्ये धोनीने जे सांगितले, ते खूप महत्त्वाचे होते. विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारत पराभूत झाला. त्या सामन्यात धोनी धावचीत झाला. ती धाव घेताना झेपावता आले नाही, ही धोनीची खंत. झेपावता आले नाही, याचे कारण धोनी आज ३८ वर्षांचा आहे. चार वर्षांपूर्वी त्याला झेप घेता आलीच असती. आता शरीर त्या चापल्याने साथ देत नाही, हे कटू वास्तव धोनीने आणि त्याच्या चाहत्यांनी स्वीकारण्याची गरज आहे. धोनी आज देशातला कदाचित सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज असेल किंवा नसेल. त्याच्यासमोर या स्पर्धेतले ऋषभ पंत किंवा संजू सॅमसन किती तरी तरुण आहेत. ते धोनीला पर्याय ठरू शकतात का, याचे उत्तर शोधण्यापूर्वी जरा गेल्या दशकात जावे लागेल. त्या वेळी धोनी एकदिवसीय संघाचा कर्णधार होता. शिवाय टी-२० विश्वचषक आणि आयपीएलमध्ये नेतृत्वाची चमक दाखवलेली होतीच. एका कुठल्याशा सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला, तेव्हा त्या पराभवाची मीमांसा करताना धोनी म्हणाला, की संघात केवळ चांगले फलंदाज असून उपयोग नाही. त्यांनी क्षेत्ररक्षणही केले पाहिजे. पन्नासेक धावा करणारे मदानावर मंद हालचालींमुळे वीस धावा प्रतिस्पध्र्याना घेऊ देत असतील, तर काय फायदा? त्याचा रोख संघातले वरिष्ठ फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आदींकडे होता. अकरा जणांच्या क्रिकेट संघात निवड झालेला प्रत्येक खेळाडू परिपूर्ण असेल वा नसेल, पण तो चपळ आणि तंदुरुस्त असलाच पाहिजे, असा धोनीचा आग्रह होता. सचिन नंतरही अनेक वर्षे खेळत राहिला. धोनीने मांडलेल्या निकषांवर टिकून राहण्याची जिद्द सचिनने विनातक्रार दाखवली. बाकीच्यांना ते साधले नाही आणि ते निवृत्त झाले. धोनीसमोर कुणाच्या कर्तृत्वाची कोणतीही मातब्बरी नव्हती. मदानावर एखादा खेळाडू त्याच्या व्यूहरचनेनुसार आणि गरजेनुरूप कामगिरी करू शकतो का, इतकेच त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. ही सगळी पार्श्वभूमी मांडण्याचे कारण म्हणजे, खुद्द ‘त्या’ धोनीने आजच्या धोनीचीही गय केली नसती. थोडक्यात, धोनीचे निकष लावायचे झाल्यास धोनीची निवड सध्याच्या कोणत्याही भारतीय संघात होण्याची शक्यता नाही! मग तरीही त्याला रीतसर निरोप का दिला जात नाही? याचे एक मोठे कारण म्हणजे विराट कोहली!

धोनीच्या ठायी असलेली कर्तव्यकठोर अलिप्तता विराटकडे नाही. विराट हा जगातला सध्याचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. सचिनचे विक्रमही तो मोडू शकेल, अशी स्थिती आहे. त्याचे नेतृत्वगुणही उत्तम आहेत. पण ते वादातीत नाहीत. गोतावळा मानसिकतेतून विराट पुरेसा बाहेर पडला आहे, असे दिसत नाही. त्याच्या नावावर अद्याप एकही आयसीसी अजिंक्यपद नाही. ही एक बाब चांगला कणर्धार आणि महान कर्णधार यांच्यातील सीमारेषा ठरते. धोनीच्या हालचाली मंदावलेल्या असोत, त्याच्याकडून डावाच्या अखेरच्या टप्प्यात निर्णायक धावाही होत नसोत, पण मदानावर आजही सल्लागार म्हणून विराटला धोनीची नितांत आवश्यकता भासतेच भासते. टी-२० या प्रकारात तर विराटला आयपीएलही जिंकता आलेले नाही. तशात रोहित शर्माशी त्याची आजवर असलेली सुप्त स्पर्धा आता व्यक्त होऊ लागली आहे. कारण टी-२० मध्ये रोहित विराटपेक्षा अधिक चांगला कर्णधार (फलंदाज नव्हे) असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत विराटसाठी धोनीची उपस्थिती हा अखेरचा जुगार आहे. म्हणूनच, करारबद्ध क्रिकेटपटूंच्या यादीत नसला, तरी धोनी टी-२० संघातील प्रवेशाच्या बाबतीत विचाराधीन आहे.

हा सगळा प्रकार भारतीय संघाच्या सध्याच्या नवोन्मेषी प्रतिमेशी पूर्णत: विसंगत आहे. सचिन किंवा कपिलदेव यांच्याप्रमाणे रखडलेली निवृत्ती न स्वीकारता स्वतच्या मर्जीने ऐन भरात असूनही निवृत्त झालेले सुनील गावस्कर म्हणूनच खऱ्या अर्थाने महान ठरतात. इतक्या मोठय़ा क्रिकेटवेडय़ा देशामध्ये धोनीच्या दर्जाचा एकही यष्टिरक्षक-फलंदाज मिळत नाही, हा मुद्दा नाही. धोनीला संघात ठेवण्याबाबत आग्रही राहताना धोनीचेच निकष पाळले जात नाहीत, हा खरा मुद्दा आहे. आश्चर्य म्हणजे, खुद्द धोनीही स्वतबाबत त्याचा निकष लावायला तयार नाही. हा विराटच्या संगतीचा परिणाम समजायचा का? धोनीला रिटायर करून प्रगतिशील मार्गक्रमण करत राहण्याची संधी भारतीय क्रिकेट व्यवस्थेने दवडली आहे. करारयादीतून त्याला वगळतानाच, पुढील टी-२० विश्वचषकासाठी त्याचा विचार होणार नाही, हे जाहीर व्हायला हवे होते. तसे झालेले नाही. आयसीसी अजिंक्यपदे मिळवून स्वतचा बायोडेटा झगमगीत करायचा असेल, तर विराटने धोनीसारखे वागले पाहिजे. नपेक्षा विक्रमवीर फलंदाज यापलीकडे विराटची वेगळी ओळख येणारा काळच पुसून टाकेल!