मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात संपूर्ण संघ ३६ धावांमध्ये गारद. कर्णधार आणि प्रमुख फलंदाज विराट कोहली, मोक्याचा गोलंदाज मोहम्मद शमी, अनुभवी फलंदाज व गोलंदाज अनुक्रमे रोहित व इशांत शर्मा यांची अनुपस्थिती, आणखी गोलंदाज उमेश यादव सामन्यातील निर्णायक क्षणी जायबंदी. दोन नवोदित खेळाडू आणि एक तुलनेने अननुभवी कर्णधार. समोर ऑस्ट्रेलियासारखा बलाढय़ संघ, त्यांच्याच मैदानावर आणखी एक नामुष्कीजनक पराभवाचा धक्का देण्यासाठी आसुसलेला.. मेलबर्न कसोटीमध्ये भारताचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेसमोर आव्हानांचे असे डोंगर उभे ठाकले होते. परंतु अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाची चुणूक यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच, परंतु भारतातील मालिकेदरम्यान पाहावयास मिळाली होती. धरमशालात झालेल्या त्याही सामन्यात विराटच्या अनुपस्थितीमुळे अजिंक्यकडे नेतृत्व चालून आले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ती मालिका १-१ अशी बरोबरीत होती आणि धरमशालातील सामन्याला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले होते. त्याही वेळी धाडसी आणि कल्पक नेतृत्वाच्या जोरावर अजिंक्यने मोक्याच्या क्षणी सामना खेचून आणला होता. त्या नेतृत्वगुणांचे कौतुक अगदी परवापर्यंत इयन चॅपेल यांच्यासारखे विख्यात माजी कर्णधार आणि क्रिकेट विश्लेषक करत होते. मुंबईतील स्थानिक आणि रणजी क्रिकेटवर पोसलेल्या अजिंक्यचे क्रिकेटविषयीचे आकलन अतिशय सखोल आहे. मुंबईकर कर्णधाराप्रमाणेच आक्रमक नेतृत्वासाठी तो ओळखला जातो. मेलबर्न कसोटीमध्ये फलंदाजीची बाजू अधिकाधिक बळकट करण्याचा पर्याय त्याच्यासमोर होता. त्याऐवजी त्याने पाच गोलंदाज (चार मुख्य गोलंदाज अधिक अष्टपैलू रवींद्र जडेजा) खेळवले. त्यामुळे दुसऱ्या डावात उमेश यादव नसल्याचा फटका भारतीय संघाला बसला नाही. कर्णधार रहाणेप्रमाणेच फलंदाज रहाणेकडूनही भरीव योगदान अपेक्षित होते. कारण संघातील सर्वात अनुभवी फलंदाज तोच होता. अजिंक्यने खणखणीत शतकच झळकवून दाखवले. त्याच्या शतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली आणि विजयासाठी ती पुरेशी ठरली. सध्याचा हा संघ परिपूर्ण नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत. हा संघ पूर्ण ताकदीनिशी खेळत नसल्याचेही स्पष्टच आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या अ‍ॅडलेड कसोटीमध्ये जवळपास बहुतांश काळ भारताचे वर्चस्व होते. परंतु एका सत्रात भारताचा डाव अभूतपूर्वरीत्या गडगडला. ३६ ही भारताच्या कसोटी इतिहासातील नीचांकी धावसंख्या होतीच; पण अलीकडच्या काळात कोणताही संघ अशा प्रकारे कोसळला नव्हता. या पराभवामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून उभे राहणे हेच प्रमुख आव्हान होते. तशात विराट आणि शमी या प्रमुख क्रिकेटपटूंची अनुपस्थिती हे आव्हान अधिक खडतर बनवणारी ठरली. परंतु अजिंक्य रहाणे आणि त्याच्या जिगरबाज सहकाऱ्यांनी ते पेलले. मेलबर्नच्या संपूर्ण सामन्यात भारतीय संघाचाच सातत्याने वरचष्मा राहिला. अ‍ॅडलेडमधील नामुष्की जणू घडलीच नाही या भावनेने हा संघ खेळला. अजिंक्य हा अत्यंत स्थितप्रज्ञ खेळाडू व कर्णधार आहे. यशाने तो हुरळून जात नाही वा अपयशाने विचलितही होत नाही. उत्कट भावनांचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या विराट कोहलीपेक्षा तो कितीतरी वेगळा ठरतो. कदाचित मेलबर्नला विराटच्या उत्कटतेपेक्षा अजिंक्यच्या अविचल स्थितप्रज्ञेचीच अधिक आवश्यकता होती! अजून मालिका संपलेली नाही, दोन सामने बाकी आहेत. तेव्हा दिग्विजय मिळवल्यागत जो जल्लोष सुरू झाला तो बराचसा अनाठायी आहे. हा विजय ऐतिहासिक नक्कीच ठरेल, मात्र त्याहीपुढे जाऊन १-१ अशा बरोबरीवरून मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तो मालिका विजय खऱ्या अर्थाने इतिहास नव्याने लिहिणारा ठरेल. ज्यांना आताच जल्लोष करण्याची घाई झाली आहे, त्यांनी त्यांच्या लाडक्या अजिंक्य रहाणेकडून पाय जमिनीवर घट्ट रोवण्याचे धडे घ्यायला हरकत नाही!