सध्या भारत व चीन यांच्यात संघर्ष चिघळत असतानाच संरक्षण संशोधन व विकास संस्थेने एचएसटीडीव्ही या स्क्रॅमजेट वाहनाचे केलेले सफल परीक्षण हा योगायोग असू शकत नाही. त्यातून भारताने एक वेगळा संदेश चीनलाच नव्हे तर सगळ्या जगाला दिला आहे. ‘एचएसटीडीव्ही’ वाहनाची ही चाचणी ओडिशातील बालासोरच्या अब्दुल कलाम प्रक्षेपण केंद्रावरून करण्यात आली तेव्हा त्याला इस्रोच्या एखाद्या उपग्रह किंवा अवकाशयानाच्या प्रक्षेपणाइतकेच महत्त्व होते हे स्पष्ट झाले, कारण तेथे वैज्ञानिकांची मांदियाळी जमलेली होती. भारताच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्यात हे यश महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात, या तंत्रज्ञानाचे महत्त्व केवळ संरक्षण क्षेत्रापुरते नसून त्याचे इतर शांततामय उपयोगही आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण निम्म्या खर्चात उपग्रह अवकाशात पाठवू शकू. ‘अग्नि’ क्षेपणास्त्र मालिकेच्या विकासात भारत काही प्रमाणात मागे पडला होता त्या पार्श्वभूमीवर हे यश जास्त उठून दिसणारे आहे. अमेरिका, रशिया व चीन या देशांकडे सध्या या ‘स्क्रॅमजेट’ तंत्रज्ञानाची क्षमता आहे ती आपण स्वबळावर मिळवली. ‘आत्मनिर्भरते’चा बोलबाला सुरू होण्यापूर्वीपासून संरक्षण क्षेत्रातील हे भक्कम पाऊल उचलण्याची तयारी सुरू होती. इतके संवेदनशील तंत्रज्ञान कुणीही भारताला देणार नाही व ते आता आपण स्वत: विकसित केल्याने ताशी सात हजार किमी वेगाने मारा करणारी स्वनातीत क्षेपणास्त्रे (आवाजाच्या सहापट वेगाने जाणारे मॅक-६) तयार करणे शक्य होणार आहे. अतिदूरचे लक्ष्य ही क्षेपणास्त्रे भेदू शकतात. शत्रूला या क्षेपणास्त्रांचा मार्ग लक्षात येऊ शकत नाही. चाचणीतील वाहनाने २० सेकंदांत तीस कि.मी. उंची गाठली. त्यात घन इंधनाचा वापर करण्यात आला होता. सध्या अमेरिकेतील प्रसिद्ध अवकाश उद्योजक इलॉन मस्क यांनी तसेच चीननेही फेरवापराची अवकाश वाहने तयार केली आहेत; ती तयार करण्यासाठी भारताची ही पूर्वतयारी आहे असे म्हणता येईल, यात उष्णतारोधक आवरण व इतर सर्व तंत्रज्ञानाचा कस लागला आहे. फेरवापराच्या अवकाश वाहनांमुळे उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी होणारा खर्च कमी होतो. या वाहनाची रचना व्ही. के. सारस्वत डीआरडीओचे प्रमुख असतानाच झाली होती. २००४ मध्ये बरीच तयारी झाली होती. यातील काही तांत्रिक भागांत आपल्याला इस्रायल, ब्रिटन, रशिया यांनी मदत केली आहे. यापूर्वीही या क्रूझ वाहनाची एक चाचणी १२ जून २०१९ रोजी झाली होती. सध्या भारत रशियाच्या मदतीने ब्राह्मोस क्षेपणास्त्रे तयार करीत आहे त्यापेक्षा वेगवान क्षेपणास्त्रे नंतर आपण स्वदेशी पातळीवर बनवू शकू. ब्राह्मोसचा वेग ताशी ३६०० किलोमीटर आहे. त्यानंतर भारत जे हायपरसॉनिक म्हणजे स्वनातीत ब्राह्मोस क्षेपणास्त्र तयार करील त्याचा वेग ताशी सात हजार किलोमीटर राहील, पण ती क्षेपणास्त्रे तयार करण्यास भारताला आणखी पाच वर्षांचा काळ लागेल. संरक्षण तंत्रज्ञानात भारताची ही कामगिरी मैलाचा दगड ठरावी अशीच आहे. भारताने अणुचाचण्या केल्यानंतर अमेरिकेने भारताला क्रायोजेनिक तंत्रज्ञान नाकारले होते तेही भारताने ते स्वदेशी पातळीवर तयार केले. आता कुणी भारताला स्क्रॅमजेट तंत्रज्ञान देण्याची वाट पाहण्याच्या आतच आपण ते यशस्वी केले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Sep 2020 रोजी प्रकाशित
स्वनातीत यश!
‘अग्नि’ क्षेपणास्त्र मालिकेच्या विकासात भारत काही प्रमाणात मागे पडला होता त्या पार्श्वभूमीवर हे यश जास्त उठून दिसणारे आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 09-09-2020 at 00:02 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on successful testing of the scramjet vehicle hstdv by the drdo abn