राजकीय पक्षाचा एखादा सदस्य सातत्याने पक्षाला अडचणीत आणत असेल तर त्याला शिक्षा दिली जाते, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते, त्याची चौकशी केली जाते, त्याला पक्षातून निलंबित केले जाते, चौकशीनंतर तो दोषी आढळला तर त्याला पक्षातून काढून टाकले जाते. भोपाळची खासदार प्रज्ञा ठाकूर भाजपला सातत्याने अडचणीत आणत असताना, पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात उघडपणे बोलत असताना तिची मात्र भाजपमधून हकालपट्टी होत नाही. प्रज्ञा ठाकूरने कितीही वादग्रस्त विधान केले तरी प्रत्येक वेळी भाजप तिला पाठीशी घालतो. बुधवारीही प्रज्ञा ठाकूरने भाजपला कोंडीत पकडले; पण पक्षनेत्यांनी तिला ताबडतोब सावरून घेतले. एसपीजी दुरुस्ती विधेयकाच्या चच्रेत महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचा, तसेच जालियनवाला बागेत नरसंहार घडवणारा जनरल डायर याच्यावर गोळी झाडणारे उधमसिंग यांचा अशा दोन भिन्न प्रवृत्तींचा संदर्भ दिला गेला. द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्या भाषणावेळी हस्तक्षेप करत प्रज्ञा ठाकूरने, ‘देशभक्तांचे उदाहरण देऊ नका,’ असे राजा यांना ठणकावले. त्यावरून वाद उसळल्यावर, भाजपने आणि प्रज्ञा ठाकूरने गोडसे नव्हे, उधमसिंगला उद्देशून देशभक्त म्हटल्याचा युक्तिवाद केला; पण ए. राजा यांचे म्हणणे होते की, देशभक्त हा शब्द गोडसेलाच उद्देशून उच्चारला गेला होता. प्रज्ञा ठाकूरने गोडसेला पहिल्यांदाच देशभक्त म्हटलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या भरप्रचारात नि:संदिग्धपणे गोडसेला प्रज्ञा ठाकूरने देशभक्त केले होते. ‘ही पक्षाची भूमिका नाही’ असे लगोलग स्पष्टपणे सांगणाऱ्या भाजपने, तिला कोणतीही शिक्षा दिली नाही. महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती वाजतगाजत साजरी केली गेली असली तरी प्रज्ञा ठाकूरची लोकसभेची उमेदवारी भाजपने मागे घेतली नाही. प्रज्ञा ठाकूरच्या वादग्रस्त विधानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाईट वाटले इतकेच. प्रज्ञाला आपण कधीच मनातून क्षमा करणार नाही, असे बोथट विधान करून मोदी यांनी प्रज्ञा ठाकूर यांना ‘क्षमा’ करून टाकली होती काय? एखाद्या व्यक्तीची एक चूक माफ करता येऊ शकते, पण तीच चूक दुसऱ्यांदा- तीही जाणीवपूर्वक होत असेल तर माफी द्यावी का, हा प्रश्न विचारला जातो. बुधवारी लोकसभेत प्रज्ञा ठाकूरने तीच चूक पुन्हा केली, मग तिची हकालपट्टी नाही तर निदान निलंबनाची तरी कारवाई व्हायला हवी होती. पण ती झालेली नाही. या चुकीवर पंतप्रधान वा पक्षाध्यक्षांनी चकार शब्द काढलेला नाही. फक्त तिला संरक्षणविषयक सल्लागार समितीतून काढून टाकण्याची शिफारस केली गेली. भाजपच्या संसदीय समितीच्या बठकीला येण्यास मनाई करण्यात आली. या ‘शिक्षे’तून भाजपने काय साधले? वास्तविक, भाजपचे केंद्रीय नेतृत्व प्रज्ञा ठाकूरची हकालपट्टी करू शकत नाही. प्रज्ञा हे हिंदुत्वाचे जाज्वल्य उदाहरण म्हणून भाजप मिरवतो. ‘प्रज्ञा हे खोटय़ा धर्मनिरपेक्षतेला दिलेले उत्तर’ असल्याची पावती भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीच दिली होती. प्रज्ञा ठाकूर लोकसभेत येणे हा भाजपने गौरव मानला आहे. विकासाचा अजेंडा राबवताना भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा गौण ठरवलेला नाही. मोदींनंतर आता ‘योगी’ आदित्यनाथ, ‘साध्वी’ प्रज्ञा हेच हिंदुत्ववादी राजकारणाचे ध्वजकत्रे ठरू लागले आहेत. पक्षाची अधिकृत भूमिका निराळी आहे, पण या अधिकृततेचे पावित्र्य कोणाला? प्रज्ञा ठाकूर हीच दहशतवादी आहे, असा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांनी केला; पण निव्वळ आरोप करून प्रज्ञाच्या विधानांवर, मानसिकतेवर आणि ‘अनधिकृत’ भूमिकेवर अंकुश लागण्याची शक्यता नाही, हे भाजप जाणतो. ‘समोर आहेच कोण?’ ही भाजपची विरोधकांविषयीची मानसिकता केंद्रीय पातळीवर कायम आहे. म्हणूनच प्रज्ञाला बोलण्याची मुभा दिली जाते आणि ती वादग्रस्त ठरते तेव्हा तिच्यापासून पक्षाला अलिप्त केले जाते वा तिच्यावर कारवाई केल्याचा देखावा केला जातो. आत्ताही नेमके हेच झालेले दिसते!