07 July 2020

News Flash

आपले अश्रू एवढे सुकले?

मुंबईकरांच्या मानसिकतेतील संथपणे होऊ घातलेल्या बदलाची लक्षणे ठीक नाहीत.

अनावर गर्दीत स्वत:चा तोल सांभाळू न शकल्याने बाहेर फेकला गेलेला भावेश नकाते हा तरुणही अशाच दुर्दैवाचा बळी ठरला

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात एका सहप्रवाशाकडून होणारी छळणूक थांबविण्याची विनंती एका तरुणीने ट्विटरवरून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना केली आणि काही मिनिटांतच रेल्वे सुरक्षा दलाचे पथक तिच्या मदतीसाठी दाखल झाले. त्यानंतर काही क्षणांतच या घटनेचे भरभरून कौतुक करणाऱ्या प्रतिक्रियांचा महापूर समाजमाध्यमांवर सुरू झाला, तेव्हा या माध्यमाच्या प्रभावाची सत्यता साऱ्यांनाच पटली होती. ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वीची. तीन दिवस त्याचा भरपूर गवगवा सुरू असतानाच, मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या दररोजच्या समस्येचे आणखी एक भीषण रूप पुन्हा एकदा याच माध्यमाद्वारे जगासमोर आले. उपनगरी रेल्वेची अनावर गर्दी हे असहाय मुंबईकरांचे रोजचेच रडगाणे झाल्याने, त्यासाठी ढाळले जाणारे अश्रूदेखील आता वाळून गेले आहेत. याच अनावर गर्दीतून स्वत:ची जागा शोधण्यासाठी धडपडणाऱ्या शेकडो जीवांना गुदमरवून टाकणारी गर्दीच अखेरचा श्वास घ्यावयास लावणारी ठरते, हेही विदारक वास्तव आहे. मुंबईत दररोज सरासरी ११ जण वेगवेगळ्या रेल्वे दुर्घटनांचे बळी ठरतात. शनिवारी अशाच अनावर गर्दीत स्वत:चा तोल सांभाळू न शकल्याने बाहेर फेकला गेलेला भावेश नकाते हा तरुणही अशाच दुर्दैवाचा बळी ठरला. पाऊल ठेवण्यापुरत्या जागेसाठी गर्दीची विनवणी करत असतानाच एका क्षणी त्याचा आधार सुटला, पायही निसटला आणि धावत्या गाडीतून भावेश बाहेर फेकला गेला. उपचाराचे सोपस्कार सुरू होईपर्यंत त्याने प्राण सोडले होते. या घटनेनंतर मुंबईच्या संवेदनांना पान्हा फुटला, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा तीव्रतेने ऐरणीवर आला. मन सुन्न करणाऱ्या या घटनेनंतर मानवी स्वभावाची आणखी एक नवीच बाजू उजेडात आली आहे. जगण्यामरण्याच्या काठावरून जेव्हा भावेश सहप्रवाशांना मदतीचे आवाहन करत होता, प्रवासाचा प्रत्येक क्षण जेव्हा त्याला जणू मृत्यूकडे खेचण्यासाठी धडपडत होता, त्याच क्षणाचे जिवंत चित्रण करण्यासाठी एक सहप्रवासी सरसावला होता. हा प्रकार विषण्ण करणारा आहे. भावेशच्या मृत्यूच्या क्षणाचे जिवंत चित्रण पुढे समाजमाध्यमांवरून व्हायरल झाले. तो क्षण प्रत्येकास चटका लावणारा होता हे खरे असले, तरी अशा क्षणांचे चित्रण करण्याची मानसिकता बळावत असल्याबद्दल घेतला जाणारा आक्षेप पुन्हा अधोरेखित झाला. ज्या हातांनी मदतीसाठी पुढे व्हावयास हवे, तेच हात दुर्दैवी क्षणांचे चित्रण करण्यासाठी सरसावतात, ही मुंबईकरांच्या मानसिकतेतील संथपणे होऊ घातलेल्या बदलाची लक्षणे ठीक नाहीत. मुंबईच्या उपनगरी गाडीच्या प्रवासात असा अनुभव कधी ना कधी प्रत्येकानेच घेतलेला असल्याने, त्या वेदनांची जाणीव जपणाऱ्या मुंबईचा स्वभाव हळूहळू समाजमाध्यमांच्या व्यसनापायी लोप तर पावत चाललेला नाही ना, अशा एका नव्या, अस्वस्थ सवालाने डोके वर काढले आहे. अशा दुर्घटनांमध्ये रेल्वे प्रशासनाची संवेदनशीलता अनेकदा प्रश्नचिन्हांकितच असते. तेही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. अपघातानंतरची काही मिनिटे अत्यंत संवेदनशील असतात. त्या काळात उपचार झाले तर जिवावरचे संकट टळू शकते, पण नेमका तोच काळ कागदोपत्री सोपस्कारांमध्ये वाया जातो आणि तेवढय़ाच वेळात अपघातग्रस्ताला मृत्यू कवेत घेतो. स्टेशन मास्टरचा मेमो हाती पडल्याखेरीज अपघातग्रस्तास उपचारासाठी हलवू नये, हा जुनाट नियम बासनात गुंडाळला, तरी या भयाण स्थितीत फरक पडू शकेल. चौथा कॉरिडॉर वगरे स्वप्ने पूर्ण होतील तेव्हा होवोत, निदान मेमोचे प्रकरण तरी तातडीने निकालात काढून लोकांच्या जिवाशी होणारा खेळ थांबवावा, एवढीच आता अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2015 1:10 am

Web Title: mumbai youth dies after falling from crowded local train
Next Stories
1 जल्पक नावाचे कावळे!
2 ‘कार्ट’ची बनते मग ढकलगाडी!
3 कागदावरचा कचरा!
Just Now!
X