22 November 2019

News Flash

डेस्मंडजी.. देश बदल रहा है!

हा खरं तर आयआयटीचा अभियंता.

हा खरं तर आयआयटीचा अभियंता. तो अमेरिकेत होता बराच काळ. मग स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी तो मायदेशी परतला. उद्योग नवा असल्याने त्यासाठी प्रशिक्षण घेतलं, गुंतवणूकदार गाठले आणि मग त्याने जे बनवले ते अद्भुत आणि विदेशी ब्रॅण्डची आठवण करून देणारे होते..

परदेशात कोणाशी दोस्ताना झाला तर नंतरच्या गप्पांतले दोन प्रश्न अस्वस्थ करायचे.

पहिला प्रश्न पहिल्यांदा हेलसिंकी विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्यांनं एकदा विचारला. आमच्याकडे नोकिया आहे, शेजारी स्वीडनमध्ये व्होल्वो किंवा बोफोर्स आहे, पलीकडच्या डेन्मार्कमध्ये लेगो किंवा कार्ल्सबर्ग आहे..तसा भारताचा ब्रॅण्ड कोणता? हा त्याचा प्रश्न.

दुसरा प्रश्न इस्तंबुलमधल्या एका निवांत सायंकाळी ‘ब्ल्युमॉस्क’च्या साक्षीनं आणि ‘राकी’च्या संगतीत अशाच एका सहप्रवाशानं विचारला. माझी ‘राकी’ला स्पर्श करण्याची ती पहिलीच वेळ. कशी असते ती, काय करते.. काहीच माहिती नाही. लहानशा चणीची ‘राकी’ तिकडे भलतीच लोकप्रिय आहे. पारदर्शी आणि क्षणार्धात गोऱ्या होणाऱ्या ‘राकी’चा तुर्की जनतेला कोण अभिमान. तर तिचा परिचय होतोय न होतोय तर याचा प्रश्न. या देशाची कशी ‘राकी’ आहे.. तसं तुमच्या देशाचं वैशिष्टय़ काय..?

अधिक गैरसमज न करता आता सांगायला हवं की ‘राकी’ हे एक पेय आहे. तुर्कीचं स्वत:चं असं. दिसायला पाण्यासारखं. म्हणजे व्होडका दिसते तसं. छोटय़ा, लहान चणीच्या अरुंद ग्लासातनं ते प्यायचं. त्याआधी त्यात पाणी मिसळावं लागतं. तर पाणी घातल्या घातल्या ते पांढरं होतं. दुधासारखं. चवीला बडीशेपेचंच पेय जणू.

या घटनेला चार-पाच वर्ष झाली असतील. त्यानंतर भारतात अमृत तयार व्हायला लागली. जातिवंत सिंगल माल्ट. तिच्याविषयी मागे ‘अन्यथा’त लिहिलं होतं. आता अमृत चांगलीच रुजलीये आपल्याकडे. भरपूर मागणी असते तिला. अमृत कर्नाटकी ढंगाची. त्या राज्यात तयार होते. शेजारच्या गोव्यात पॉल जॉन नावाची सिंगल माल्ट तयार व्हायला लागलीये. ती पण उत्तम आहे. नंतर एकदम उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या रामपूर नावाच्या छोटय़ाशा गावातून त्याच नावाची आणखी एक भारदस्त सिंगल माल्ट आपल्याकडे तयार होते. एखादा भरदार, झुपकेदार मिश्यांचा सरदार दिसतो तसं तिच्याकडे पाहिल्यावर वाटतं. तिच्याच वरती हिमाचलातल्या सोलन गावात सोलन नं.१ आणि पायाशी रामपूर. हिमालयाचा पायगुणच काही वेगळा म्हणायचा. (या सोलन पेयाला स्कॉच म्हणण्याचं पाप काही जण करतात. ते अक्षम्य आहे. स्कॉटलंडच्या दऱ्याडोंगरांत तयार होते तीच स्कॉच. तसं काय नाशकातल्या गोदावरीच्या पाण्यालाही गंगाजल म्हणतात, पण खरं गंगाजल ते तिकडच्या हृषीकेशातलं. शुभ्र, थंडगार स्फटिकासारख्या दगडांवरनं वाहणारं. तसंच स्कॉचचंही आहे. असो.) तर नाही नाही म्हणता (खरं म्हणजे नाही म्हणतं कोण?) या देशात आता एक नाही, दोन नाही, तर तीन तीन सिंगल माल्ट बनायला लागल्यात. अभिमान वाटावा कोणालाही अशीच ही बाब.

या अभिमानानं फुललेली छाती अधिकच फुगावी असा एक प्रसंग दोनेक महिन्यांपूर्वी घडला. वर्षांन्त सोहळा समोर असताना त्याची माहिती मिळणं अनेकांना समयोचित वाटेल.

तर या हर्षोल्हासाचं कारण आहे डेस्मंडजी. झालं असं की एकानं अशाच एका निवांत सप्ताहांत सायंकाळी गप्पांत या डेस्मंडजीचा परिचय करून दिला. तोच रंग. तेच रूप. स्वादही तसाच. त्याच्याशी परिचय असल्यानं परिणामही तसाच असणार याची खात्री होती. म्हणून तसं सांभाळूनच स्वागत केलं डेस्मंडजीचं.

हे डेस्मंडजी परिचय मला थेट अमेरिकेतल्या टेक्सासला घेऊन गेले. हे मेक्सिकोच्या सीमेवरचं राज्य. काऊ बॉइजसाठी प्रसिद्ध. तसंच रांगडं. सभ्यासभ्यतेच्या मर्यादा पाळेल न पाळेल या सीमेवरचं. तिथल्या ह्य़ूस्टन शहरांत मोठमोठी, अवाढव्य मैदानं आहेत. अशा मोकळ्या जागेत वसलेले असतात तावेर्न. या तावेर्नना बार म्हणणं नदीला विस्तारित नाला म्हणण्याइतकं पाप. नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेली मोकळी ढाकळी जागा, वेताच्या खुच्र्या, अनागरी वातावरण आणि हाताशी वेळच वेळ घेऊन सोबतीला बसलेले पाहुणे म्हणजे तावेर्न. टकिला फुलते, रंगते आणि बहरते ती अशा वातावरणात. मेक्सिकोचं हे राष्ट्रीय पेय.

तर हे डेस्मंडजी हे टकिला या पेयाचंच नाव. महत्त्वाचा..म्हणजे छाती फुगवणारा.. भाग म्हणजे हे डेस्मंडजी भारतीय आहेत. शुद्ध देशी बनावटीचे. आता आपल्याकडे या क्षेत्रात देशी म्हटलं की हाताची चिमूट थेट नाकपुडय़ा बंद करायला लागते. पण या डेस्मंडजीचं तसं नाही. ते देशी आहेत. पण अमृत, पॉल जॉन किंवा रामपूर यांच्या माळेतले. अभिमान वाटावा असे. खरं तर भारतात टकिला तयार होते हेच किती कौतुकास्पद आहे.

यावर आता डेस्मंडजीला टकिला अशी सरळ नावानं का हाक मारली जात नाही, असा प्रश्न इथपर्यंत वाचलेल्यांना पडला असेल. तर त्याचं उत्तर असं की तसं करायला कायद्यानंच मनाई आहे. टकिला म्हणवून घेण्याचा मान फक्त मेक्सिको या देशात तयार होणाऱ्या द्रवाचाच. स्कॉचसारखं आहे हे. स्कॉटलंडच्या पवित्र भूमीत तयार होते तीच स्कॉच हे जसं तसंच मेक्सिकोत जन्मून अन्यत्र वाहते तीच टकिला. आपल्याकडे असतात ते डेस्मंडजी. या पेयाचं नाव डेस्मंडजी कारण ते बनवणाऱ्याचं नाव डेस्मंड नाझारेथ.

हा खरं तर आयआयटीचा अभियंता. अमेरिकेत होता बराच काळ. तिथं तो मार्गारिटाच्या प्रेमात पडला. (या मार्गारिटाच्या प्रेमात न पडणं अशक्यच. ‘करातुनी तव खिदळत आले.’ या बाकिबाब बोरकरांच्या ओळींची आठवण यावी अशा आकारात, बर्फ चुरा आणि मीठ ओठावर देत मार्गारिटा समोर येते तेव्हा भल्याभल्यांचं व्रत मोडतं.) मार्गारिटाचा गाभा म्हणजे टकिला. पण भारतात आल्यावर नाझारेथला जाणवलं.. इथं सगळं काही आहे, पण मार्गारिटा नाही. मार्गारिटा नाही कारण खरी टकिलाच भारतात तयार होत नाही.

तेव्हा या पठ्ठय़ानं टकिला स्वदेशी तयार करण्याचा घाट घातला. त्यासाठी प्रशिक्षण घेतलं, गुंतवणूकदार गाठले आणि स्वत: टकिला टेस्टरही बनला. आज आंध्र आणि गोवा अशा दोन ठिकाणी डेस्मंडजी तयार होते. सर्वसामान्यांना अजून त्यांचा तितका परिचय नाही. पण मार्गारिटावर प्रेम करणारे अनेक डेस्मंडजींना ओळखतात. मार्गारिटाकडे जाण्याचा भारतीय मार्ग डेस्मंडजींच्या अंगणातनं जातो.

पण हे डेस्मंडजी भारतीय आहेत हा इतकाच काही अभिमानाचा मुद्दा नाही. खरा धक्का तर पुढेच आहे. टकिला बनते कशापासून?

घायपात या किरटय़ा, कोरडय़ा आणि काटेरी झाडाच्या कंद आणि फळापासून. या एरवी दुर्लक्षित, दुष्काळी अशा या झाडात एक विशिष्ट प्रकारची शर्करा असते. टकिला बनवण्यासाठी ती फारच महत्त्वाची. मेक्सिकोतही टकिला अशीच बनते. Blue Agave.म्हणजे आपली रानटी घायपात.. हा त्याचा मूळ घटक. त्या देशात टकिला बनवण्यासाठी वापरता यावी या उद्देशानं घायपात लावली जाते. मग या कंपनीचे कर्मचारी या झाडाची धारदार पानं कापून त्याच्या कंदापर्यंत जाण्याचा मार्ग सुकर करतात. हे कंद मग मुरवायचे, ठरावीक तापमानात भाजायचे, त्यातली शर्करा वेगळी करायची आणि ती विशिष्ट भांडय़ांत आंबवून त्यापासनं टकिला तयार करायची.. असा हा सगळा प्रवास.

डेस्मंडजी याच मार्गानं निघालेत. त्याच प्रकारचं घायपात, तशीच त्याची लागवड आणि पुढची सगळी प्रक्रियाही तशीच. या कल्पनाविस्ताराचं कौतुक करावं तितकं थोडंच. त्यामुळे एक झालंय..

आता परदेशात दुसऱ्या प्रश्नाची भीती वाटत नाही. अमृत काय, पॉल जॉन काय, रामपूर काय किंवा ताजे डेस्मंडजी काय.. यांचा खूप आधार वाटतो. त्यामुळे ताठ मानेनं सांगता येतं..

देश बदल रहा है.. ३१ डिसेंबरचा आनंद वाढवील अशीच ही भावना.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

First Published on December 29, 2018 4:24 am

Web Title: the success story of iit engineer
Just Now!
X