उंचावलेल्या राहणीमानामुळे बहुसंख्य लोकांच्या दारात किमान एक तरी चार चाकी गाडी दिसते. विविध किंमत श्रेणींतील पर्याय, वित्तीय सुविधा आणि वाहतुकीसाठीची गरज या गोष्टींमुळे स्वत:चे वाहन खरेदी करण्याकडे सामान्यांचा ओढाही वाढत चालला आहे. पण वाहन खरेदी करणे सोपे झाले असले तरी, त्या वाहनाची योग्य देखभाल करणे आणि नियमित सव्‍‌र्हिसिंग करणे हे कठीण काम आहे. याशिवाय गाडीसाठी लागणाऱ्या इंधनखर्चाचे व्यवस्थापन, गाडीच्या विम्याची मुदत, हप्ते, कर्जाच्या हप्त्यांच्या तारखा, सव्‍‌र्हिसिंगचा कालावधी यांच्याकडे लक्ष ठेवले नाही तर, मोठा गोंधळ होऊन बसतो. अशा वेळी आपल्या संपूर्ण गाडीचे व्यवस्थापन पाहणारी एखादी यंत्रणा उपलब्ध झाली तर?..

‘सीटीएन कॉडरेसो’ने विकसित केलेले ड्रिव्हो- कार मॅनेजमेंट (Drivvo – Car management) हे अ‍ॅप या कामी अतिशय उपयुक्त ठरू शकते. गाडीचा इंधन वापर, खर्च, देखभाल खर्च, सव्‍‌र्हिस शुल्क, सरासरी इंधन उपयोग, मासिक खर्च अशा अनेक गोष्टींची नोंद ठेवणारे हे अ‍ॅप एक प्रकारे गाडीच्या व्यवस्थापनाचेच काम करते. या अ‍ॅपमधून पुढील गोष्टी करता येतात.

  • प्रवासातील इंधन वापराचा तपशील.
  • संपूर्ण इंधन व्यवस्थापन. पेट्रोलपंप सूचक नकाशा.
  • गाडीशी संबंधित खर्च नोंदवण्याची सुविधा.
  • गाडीच्या सव्‍‌र्हिसिंगची तारीख कळवणे.
  • गाडीची एकूण धाव (रनिंग) आणि त्या प्रमाणात आलेल्या इंधनखर्चाशी तुलना करून सरासरी इंधन वापर.
  • दिशादर्शक मार्ग, नकाशे इत्यादी.

गाडीतले मनोरंजन

गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे किंवा मेसेज करणे किंवा हेडफोनवर गाणी ऐकणे किती धोकादायक आहे, हे सांगायला नको. कायद्यानेही अशा गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. अशा वेळी एकटय़ाने गाडी चालवीत असताना काय करायचे, हा प्रश्न पडतो. यासाठी ‘कार डॅशड्रॉइड’ (Car Dashdroid)ि हे अ‍ॅप अतिशय उपयुक्त ठरू शकते. या अ‍ॅपचे वैशिष्टय़ म्हणजे, तुमचे सर्व मेसेजिंग अ‍ॅप यात एकत्रित करून एकाच ठिकाणी हे सर्व मेसेज मिळतात. शिवाय गाडी चालवीत असताना हे मेसेज वाचण्याचीही गरज लागत नाही. मेसेज येताच हे अ‍ॅप तो मेसेज (इंग्रजी) मोठय़ा आवाजात वाचून दाखवते. विशेष म्हणजे, तुम्हीही मेसेज टाइप न करता केवळ बोलून त्या मेसेजला उत्तरही देऊ शकता. यासाठी हे अ‍ॅप स्मार्टफोनमधील ‘व्हॉइस कमांड’चा उपयोग करते. त्याच पद्धतीने या अ‍ॅपच्या माध्यमातून कॉल करणेही सोपे होते. आणखी महत्त्वाचे म्हणजे, अशाच पद्धतीने तुम्ही गाणीही वाजवू शकता. अशा प्रकारचे ४० शॉर्टकट्स या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. हवामानाचा अंदाज, गाणी वाजवणे, दिशादर्शक, वेगदर्शक, लोकेशन अशा गोष्टी हे अ‍ॅप दर्शवते.

asif.bagwan@expressindia.com