इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे. या महाजालात माहितीचा अफाट खजिना आहे. परंतु, नेमकी आणि मुद्देसुद माहिती मिळवणं हे दिव्य असतं. बऱ्याचदा आपण एखाद्या घटनेविषयी किंवा व्यक्तीविषयी इंटरनेटवर सर्च करायला जातो, तेव्हा अपेक्षित माहितीपेक्षा वेगळी आणि अनावश्यक माहितीच आपल्याला अधिक पाहायला मिळते. अशा वेळी ‘विकीपीडिया’ हे संकेतस्थळ अतिशय उपयुक्त ठरतं. जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणताही भूभाग, माणसे, कोणतेही क्षेत्र, कोणतीही घटना, इतिहास, भूगोल इतकंच काय अंतराळातील गोष्टींची माहिती विकीपीडियाच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्यामुळे अनेकांच्या माहितीशोधाची सुरुवात विकीपीडियापासून होते. तब्बल २८० भाषांतील ३ कोटी २० लाख माहिती आणि संदर्भ असलेले हे संकेतस्थळ विद्यार्थ्यांपासून तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकालाच उपयोगी पडते. हाच खजिना स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्यासोबत सदैव ठेवता येईल. अँड्रॉइडवर विकीपीडियाचे बिटा अ‍ॅप असून त्याच्या माध्यमातून आपल्याला हवे ते संदर्भ झटकन मिळवता येतात. माहितीचे वाचन सोपे जावे म्हणून या अ‍ॅपमध्ये काही बदलही करण्यात आले आहेत. विकीपीडियावरील एखादा संदर्भ वाचत असताना काही शब्दांना स्वतंत्र इंटरनेट लिंक दिलेली असते. ही लिंक ओपन केल्यानंतर पुन्हा पूर्वलेखाकडे जाता यावे, यासाठी या अ‍ॅपमध्ये ‘टॅब्ड ब्राउजिंग’ची सुविधा देण्यात आली आहे. त्यायोगे अशा लिंक स्वतंत्र खुल्या होतात. शिवाय या लिंकचा ‘प्रीव्ह्य़ू’ देखील आपल्याला पाहता येतो. या अ‍ॅपमध्ये तुम्ही हवे ते लेख संकलितही करून ठेवू शकता. त्यामुळे तुम्ही ऑफलाइन असलात तरी हे लेख वाचता येतात. प्रत्येक लेखासोबत संबंधित छायाचित्रे, आकृत्या, तक्ते पुरवण्यात आले असून त्यातून दृश्य माहिती अधिक प्रभावीपणे मिळते. याशिवाय एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थही जाणून घेण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये आहेत. या अ‍ॅपचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात तर तुमच्या आसपासची महत्त्वाची ठिकाणे, गोष्टी यांची यादी हे अ‍ॅप आपोआप प्रदर्शित करते. याचा फायदा एखाद्या पर्यटनस्थळी गेल्यानंतर होऊ शकतो.

इंग्रजी, मराठी ‘शब्देश्वरी’

इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजी अर्थ सांगणाऱ्या शब्दकोशांचे असंख्य अ‍ॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. यापैकीच अथेन्सा सॉफ्टची ‘मराठी डिक्शनरी’ हे लक्षणीय अ‍ॅप आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे अ‍ॅप ऑफलाइन आणि पूर्णत: मोफत आहे. त्यामुळे तुम्ही इंटरनेटशिवाय त्याचा वापर करू शकता. या अ‍ॅपमध्ये इंग्रजी वा मराठी दोन्ही भाषेत शब्द टाइप करण्याची सुविधा असून शब्द टाइप करत असतानाच शब्दांचे बहुपर्याय ‘पॉपअप’ होत असतात. या ठिकाणी एकाच शब्दाचे दुसऱ्या भाषेतील अनेक समानार्थी शब्द प्रदर्शित करण्यात येतात. तसेच शब्दांचा विरुद्धार्थी शब्द शोधण्याची सुविधाही या अ‍ॅपमध्ये आहे. त्यामुळे शब्दांचे अधिक अचूक अर्थ जाणून घेणे अतिशय सोपे जाते. हे अ‍ॅप एकप्रकारे भाषा शिकवण्याचेही काम करते. या अ‍ॅपमध्ये ‘मल्टिपल चॉइस क्वेश्चन’ची सुविधा असून त्याद्वारे शब्द, त्यांचे उच्चार, अर्थ शिकता येतात. याखेरीज शब्दखेळ आणि रंजक माहितीदेखील या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे.

 

-असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com