News Flash

नवा ‘जीवनगुरू’?

सकाळी वेळेत उठणं जमत नसेल तर त्याचीही सोय हे अ‍ॅप लावतं.

नवा ‘जीवनगुरू’?
6सध्याचं जग इतक्या झपाटय़ानं पुढे चाललं आहे की, त्यासोबत आपल्यालाही धावावंच लागतं. कधी पैशासाठी, कधी प्रसिद्धीसाठी, कधी करिअरसाठी तर कधी शिक्षणासाठी आपली धावाधाव सुरूच असते. या धावपळीने आपली एकूण जीवनशैलीच धकाधकीची बनवून टाकली आहे. हे सारं करत असताना जीवनशैलीशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. या मानसिक, शारीरिक समस्यांकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं तर त्या वाढत जाऊन आजार बनतात. त्यामुळे या समस्यांची सोडवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने उत्तरं शोधत असतो. कुणी वजन वाढवायला डाएट सुरू करतो तर कुणी वजन कमी करायला. कुणी रक्तदाब कमी करण्यासाठी योगव्यायाम करतो तर कुणी शरीर सुडौल करण्यासाठी जिमची वाट धरतो. कुणी मानसिक शांतीसाठी अध्यात्माकडे वळतो तर कुणी दारूसारख्या व्यसनांमध्ये याचं उत्तर शोधतो. हे झाले प्रत्येकाचे आपापले पर्याय. पण या सर्वासाठी एक सामायिक पर्याय स्मार्टफोनवरील अ‍ॅपच्या रूपात उपलब्ध झाला आहे. ते म्हणजे ‘फॅब्युलस-मोटिव्हेट मी’ (Fabulous – Motivate Me!) हे अ‍ॅप.
नावाप्रमाणे हे अ‍ॅप एखाद्या व्यक्तीला ‘मोटिव्हेट’ अर्थात प्रोत्साहित करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी उपयोगी ठरू शकतात, त्या 8गोष्टींमध्ये मार्गदर्शन करतं. अगदी ‘सात मिनिटांच्या वर्कआउट’पासून ‘विपश्यना’पर्यंत हे अ‍ॅप वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला देतं. याशिवाय ‘हॅप्पीनेस ट्रेनर’, ‘पॉवर नॅप’, ‘स्ट्रेचिंग एक्सरसाइज’ अशा गोष्टीही या अ‍ॅपमध्ये आहेत. हे झालं व्यायामाचं. पण हे अ‍ॅप तुम्हाला आहाराबद्दलही मार्गदर्शन करतं. वजन कमी करायचं असेल किंवा शारीरिक ऊर्जा वाढवायची असेल तर कसा आहार घ्यावा, याचा वैयक्तिक आराखडाच हे अ‍ॅप आखून देतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे अ‍ॅप ‘पर्सनल व्हॉइस कोच’च्या माध्यमातून तुम्हाला आहाराबाबत मार्गदर्शन करत राहतं. एवढंच नव्हे तर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर झोप येण्यासाठी काय काय गोष्टी करता येतात, याचीही जंत्री या अ‍ॅपमध्ये आहे. सकाळी वेळेत उठणं जमत नसेल तर त्याचीही सोय हे अ‍ॅप लावतं. या सगळ्या गोष्टींवर हे अ‍ॅप शास्त्रीय पद्धतीने उत्तरं पुरवतं. त्यामुळे एका अर्थाने हे अ‍ॅप ‘जीवनगुरू’चंच काम करतं, असं म्हणायला हरकत नाही.

वेळेचं व्यवस्थापन
वेळेचं व्यवस्थापन ही आजच्या काळातील महत्त्वाची गोष्ट बनली आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या कामांचं वेळेनुसार नियोजन
करणं आवश्यक आहे. यासाठी अनेकदा मोठी माणसे दिमतीला सेक्रेटरी ठेवतात तर, सर्वसामान्य माणूस एखाद्या डायरीत किंवा डोक्यातच या गोष्टींची नोंद करून ठेवतो. पण विसरभोळा गोकुळ ज्याप्रमाणे उपरण्याला स्मरणगाठी मारतो, पण कोणती गाठ कसली याची आठवण त्याला राहात नाही, त्याचप्रमाणे डायरीत कधी काय आहे हे पाहण्याचं भान आपल्याला राहात नाही. अशा वेळी कुणीतरी आठवण करून द्यावी, असं वाटत असेल तर ‘टू डू कॅलेंडर प्लॅनर’ To-Do Calendar Planner) हे अ‍ॅप नक्कीच उपयोगी ठरू शकेल. या अ‍ॅपमध्ये तुम्ही दैनंदिन, साप्ताहिक किंवा मासिक कामांची नोंद करू शकता. त्यानुसार हे अ‍ॅप तुम्हाला स्मरण करून देतं. याशिवाय तुमच्या समोरील ध्येय आणि त्यासाठी करायची कामे यांची नोंद करून तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात का, हे तपासण्याची सुविधाही या अ‍ॅपमध्ये आहे. एखाद्या ठिकाणी जायचं असल्यास त्या ठिकाणचे ‘गुगल मॅप लोकेशन’देखील तुम्ही आधीच ‘सेव्ह’ करून ठेवू शकता. त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला शोधाशोध करावी लागत नाही. मित्रमंडळींचे वाढदिवस, महत्त्वाचे दिन, मुलाखतीची वेळ किंवा बिल भरायची तारीख या सगळ्यांची नोंद तुम्ही या अ‍ॅपमध्ये करू शकता.
असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 1:32 am

Web Title: information and use of different mobile apps
टॅग : Smartphone
Next Stories
1 अभ्यासाच्या प्रेमात
2 बगिच्याचे सौंदर्य खुलवा
3 झटपट ‘स्कॅनर’
Just Now!
X