स्मार्टफोनमुळे छायाचित्रे काढणे किंवा व्हिडीओ रेकॉर्डिग करणे अतिशय सोपे झाले आहे. याशिवाय विविध अ‍ॅप्सच्या मदतीने आपल्या छायाचित्रांना किंवा व्हिडीओंना आकर्षक ‘इफेक्ट’ही देता येतात. मात्र, अँड्रॉइडवरील ‘मॅजिस्टो व्हिडीओ एडिटर’(magisto video editor) हे अ‍ॅप तुमच्या छायाचित्रांना, व्हिडीओंना अधिक आकर्षक बनवते. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमची छायाचित्रे एकत्र करून त्यातून ‘मूव्ही’ निर्माण करू शकता. या ‘मूव्ही’ला पाश्र्वसंगीताची जोड देण्याची सुविधाही अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी पर्यटनाला गेल्यानंतर काढलेली छायाचित्रे एकत्रीत करून तयार केलेल्या ‘मूव्ही’द्वारे या पर्यटनाच्या आठवणी अधिक आकर्षकपणे जपता येतात, सादर करता येतात. असे तयार केलेले व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगल प्लस, ट्विटर, ई-मेल, यूटय़ूब, व्हॉट्सअ‍ॅप अशा प्रत्येक माध्यमावर ‘शेअर’ करणे शक्य आहे. विशेष म्हणजे, तुमच्या गॅलरीतील फोटो निवडून हे अ‍ॅप आपोआप त्यांची ‘मूव्ही’ बनवते. या मूव्हीला तुम्ही तुमच्या आवडीचे पाश्र्वसंगीत जोडून ती श्रवणीयही बनवू शकता. याशिवाय, ‘व्हिडीओ स्टॅबिलायझेशन’, ‘फेशियल रेकग्निशन’, ‘स्मूथ ट्रान्झिशन’ अशा अनेक प्रकारचे इफेक्ट देऊन व्हिडीओंचा दर्जा वाढवता येतो. याशिवाय कॅमेऱ्यातून चित्रित केलेल्या व्हिडीओंचा कोलाज करण्याची सुविधाही या अ‍ॅपमध्ये आहे. तसेच फुडी व्हिडीओ, स्पोर्ट्स व्हिडीओ, बर्थडे मूव्हीज, स्लाइड शो अशा पर्यायांचा वापर करून हे व्हिडीओ रंजक बनवता येतात.

एकाच स्क्रीनवर सर्व काही..
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आकर्षक रंगसंगती, वेगवेगळे आयकॉन्स असलेल्या ‘थिम्स’ असतात. या ‘थिम’चा वापर करून आपण वेळोवेळी आपल्या स्मार्टफोनचा ‘अ‍ॅपिअरन्स’ अर्थात रंगढंग बदलू शकतो. पण त्याहीपलीकडे अधिक आकर्षक थिम पुरवणारे अ‍ॅप अँड्रॉइडवर उपलब्ध आहेत. त्यापैकीच ‘अ‍ॅटोम लाँचर’चे ‘विजेट’ अ‍ॅप आहे. ‘विजेट’ म्हणजे स्मार्टफोनवरील विविध अ‍ॅप किंवा उपयोजना त्वरित वापरता यावेत, यासाठी मुख्य स्क्रीनवर निर्माण केलेल्या त्यांच्या ‘शॉर्टकट लिंक्स’. ज्याप्रमाणे संगणकाच्या डेस्कटॉपवर विविध सॉफ्टवेअरचे ‘आयकॉन्स’ असतात त्याप्रमाणे स्मार्टफोनवर ‘विजेट’ असतात. शिवाय हे ‘विजेट’ प्रत्यक्ष अ‍ॅप चालू न करताही आपल्याला ‘नोटिफिकेशन्स’ दाखवतात. अशाच प्रकारे ‘अ‍ॅटोम’चे विजेट अ‍ॅप (Atom All in One Widgets)काम करते. यासाठी ‘अ‍ॅटोम लाँचर’चे अ‍ॅप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करावे लागते. ते इन्स्टॉल केल्यानंतर ‘विजेट’चे अ‍ॅप इन्स्टॉल करता येईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून होमस्क्रीनवरील घडय़ाळाच्या रंगसंगतीत, प्रकारात बदल करता येतो. तसेच यामध्ये कॅलेंडरचे दैनंदिन आणि मासिक अशा दोन प्रकारचे विजेट आहेत. याखेरीज वायफाय, ब्लूटुथ, जीपीएस, रोटेशन, सिंक, ब्राइटनेस यामध्ये झटपट बदल करण्यासाठी होमस्क्रीनवरच ‘विजेट’ उपलब्ध आहेत. याशिवाय संपर्क, मेसेज, कॉल आदी सुविधाही पटकन वापरता येतात. या अ‍ॅपसाठी स्मार्टफोनमध्ये किमान १० एमबी इतकी जागा असणे आवश्यक आहे. तसेच हे अ‍ॅप अँड्रॉइड ४.०.२ पेक्षा प्रगत आवृत्त्यांवरच नीट काम करते. टॅबवर मात्र हे अ‍ॅप चालत नाही.

– असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com