29 May 2020

News Flash

नावडत्याचा स्वीकार

त्याला मराठीत आणि गणितात अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क मिळाले.

कित्येक वेळा आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. नुसत्याच कराव्या लागत नाहीत तर त्यासाठी प्रचंड मेहनतही घ्यावी लागते. त्या नाही केल्या तर त्याचा उपयोगही नसतो म्हणूनच ती गोष्ट मनापासून केली तर होणारा त्रास नक्की कमी होऊ  शकेल. नावडत्या गोष्टींचाही स्वीकार तुम्हाला काम पुढे नेण्याची प्रेरणा देतो.

आदित्यच्या चाचणी परीक्षेचा निकाल लागला. त्याला मराठीत आणि गणितात अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क मिळाले. तसंही शाळेतल्या आणि क्लासच्या शिक्षकांनी या वर्षीचं गणित थोडं कठीण असल्याची कल्पना दिली होती. त्याचे मित्र-मैत्रिणीसुद्धा यावेळी गणित खूप कठीण जातंय असं म्हणायचे. एकंदरीत सगळ्यांचीच गणितात घसरगुंडी झालेली दिसत होती.

घरी आल्यावर आदित्यने केतकीला पेपर दाखवले. पेपर बघून केतकीच्या चेहऱ्यावरील नाराजी बघून आदित्य तिला लागलीच म्हणाला, ‘‘अगं आई, वर्गात सगळ्यांनाच गणितात खूप कमी मार्क्‍स पडले आहेत. बरेच जण नापास पण झाले आहेत. त्या मानाने मला खूपच चांगले मार्क्‍स पडले. शाळेतल्या आणि शिकवणीच्या सरांनी पण यावेळचं गणित कठीण आहे म्हणून सांगितलं होतं.’’ केतकी त्याला म्हणाली, ‘‘खरंच तुला यावेळचा गणिताचा अभ्यास कठीण वाटतोय? तुझा तू अभ्यास करावंसं असं मला आणि बाबांना वाटत होतं. पण तुला क्लास लावायचा होता म्हणून आम्ही तुला परवानगी दिली.’’ आदित्यचं उत्तर तयारच होतं, ‘‘ अगं, पण सगळ्यांनीच गणित कठीण असल्यानं क्लास लावला ना?’’ केतकी त्याला समजावत म्हणाली, ‘‘अरे, बाकीच्यांनी क्लास लावला म्हणून तू लावलास? तसं आम्हांला सांगायचं तरी होतंस. तुला स्वत:ला काही ठरवता येतं की नाही? जरा स्वत:चा स्वत: विचार करायला शिक. बाकीच्यांचं बोट धरून चालणार का तू? जरा तुझा पेपर नीट बघ आणि परत एकदा तो शांतपणे सोडव. आणि मराठीचं काय?’’

आदित्य चिडून म्हणाला, ‘‘आई किती प्रश्न विचारते तू? मराठीत मार्क मिळवून पुढे त्याचा काय उपयोग आहे? ऱ्हस्व, दीर्घ चुकल्यानं काय फरक पडणार आहे? भाषा तर तीच राहाते ना? आता कोणी मराठीत पत्रं लिहितात का, मग कशाला पाहिजे पत्रलेखन? आणि निबंधाचा काय उपयोग आहे पुढच्या आयुष्यात? मला नाही आवडत भाषेचा अभ्यास करायला. मला पुढे जाऊनही भाषेत काहीही करायचं नाही. दुसरा इतिहास हा विषय. काय करायच्या आहेत त्या सनावळी पाठ करून? सांग ना सांग, त्याचा काय उपयोग आहे? ‘कॉम्प्युटर’ विषयात जे शिकवतात ते तर आता कोणीही वापरत नाही. मग ज्या गोष्टी आता वापरतच नाहीत त्या आम्हाला का शिकवतात? नुसती कटकट आहे. त्रास देतात आम्हाला. वैताग आलाय मला या शाळेचा..मला शाळेत शिकायचंच नाही..’’ आदित्य पुढेही असं तावातावानं बोलतच राहिला. केतकीने त्याला पूर्ण बोलू दिलं. केतकी त्याला म्हणाली, ‘‘तू म्हणतो आहेस त्यातील काही गोष्टी मला पटतात. पण तुझा हा त्रागा किती खरा आहे? मी आई आहे तुझी म्हणून ऐकून घेतलं. पण समोरचा माणूस ऐकून घेईल का? प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी मिळेल का? किंवा हवी तशी होईल का? नाही झाली तर शाळा सोडेन असे टोकाचे विचार करणार का? किंवा तशी टोकाची कृती करणार का? तुला शाळा सोडायची असेल तर आमची काही ना नाही. पण मग तू पुढे काय करणार? किंवा त्याच्यात तुला आईबाबांनी कशी साथ द्यायची? आम्ही तुझ्या निर्णयाला कदाचित साथ देवूही पण त्याचे चांगले-वाईट परिणाम तुलाच भोगावे लागतील. सगळ्या गोष्टींवर शांतपणे विचार कर. पाहिजे तर लिहून काढ. तुला नक्की वाट सापडेल. काही लागलं तर आम्ही आहोतच.’’ आदित्यला काही कळतच नव्हतं की शाळा सोडतो म्हणालो तरी ही चिडत नाही, ओरडत नाही. पण तिच्या चेहऱ्यावर काळजी मात्र दिसून येते. ती ऐकून पण घेते. शाळा तशी मला आवडतेच. अभ्यासातले हे काही प्रकार मला आवडत नाहीत. पण शाळेत इतक्या अ‍ॅक्टिव्हिटीज चालतात त्या सगळ्या मला खूप आवडतात. आता आईने काय करायचं ते सांगायचं ना तर मलाच म्हणते आहे तूच शोध म्हणून. मला कसं जमणार? मोठी आहे ना ती? ‘पालकांचं ऐकलं पाहिजे. तुम्हाला काही कळत नाही.’ असा सूर शाळेतल्या गणिताच्या सरांचापण असतो. आईबाबा असं कधी म्हणत नाही म्हणा. म्हणूनच ती दोघे तुमच्या अडचणी तुम्ही सोडवा, असं म्हणतात. लागलं तर मदत पण करतात. आम्हाला दोघांनाही कधीच हिडीसफिडीस करत नाहीत किंवा आम्ही म्हणतो ते त्यांना अयोग्य वाटलं तर मान्य करत नाहीत. पण कितीही चुका घडल्या तरी आदरानेच वागवतात.. किती चपखल शब्द मिळाला, ‘आदर’.. म्हणून आईबाबा जवळचे वाटतात. तसे मित्र-मैत्रिणींबरोबर राहायलापण खूप आवडतं. तुषार, केदार सांगतात की, त्यांचे आईबाबा ऐकूनच घेत नाहीत, त्यांना आम्हाला काय वाटतं ते कळतच नाही. सतत दुसऱ्यानं किती चांगले मार्क मिळवले, बाकीच्यांना कसं येतं तुम्हालाच येत नाही हे सांगतात. त्यापेक्षा त्यांच्याशी बोलणं नकोच. असं आमच्याकडे कधीच होत नाही. आम्ही चौघे खूप गप्पा मारतो. तर आई म्हणते त्याप्रमाणे करून तर बघू. मराठी, इतिहासाचं काही पटत नाही आहे. पण गणिताचा पेपर परत सोडवायचा हे ठीक आहे.

आदित्यने गणिताचा पेपर नीट बघितला. काही चुका धांधरटपणामुळे झाल्या होत्या. त्यात बेरीज वजाबाकीसारख्या चुका होत्या. पण काही गणितं पूर्ण चुकली होती. मला ही गणितं येणारच नाहीत. ती किती कठीण आहेत. अशी त्याची धारणा झाली होती. त्यानं बाबांना तसं सांगितलं. मकरंदने त्याला पुस्तकातील प्रकरणं आधी नीट वाचायला सांगितली. दोन दिवसांनी रविवार होता. तेव्हा आदित्य नेटाने अभ्यासाला बसला.  एक प्रकरण त्यानं वाचलं आणि त्यावरची गणितं सोडवली. चक्क त्याला गणितं सुटायला लागली. दोन आली नाहीत ती त्यानं मकरंदकडून सोडवून घेतली.

आदित्यला कोडं पडलं की आधी ही गणितं आली नाहीत, पण आता आली असं का झालं असावं? त्यानं शांतपणे बसून विचार केला. हळूहळू त्याला काही गोष्टींचा उलगडा होत गेला. ‘या वर्षीचं गणित कठीण आहे असं सगळे म्हणत होते. त्यामुळे मीही मलापण गणित कठीणच जाणार असा ग्रह करून घेतला. सगळे क्लासला जातायत म्हणून मीही त्यांच्याबरोबर जाऊ  लागलो. पण स्वत:हून वाचून समजावून गणित सोडवण्याचा प्रयत्नच नाही केला. आता शांतपणे अभ्यास केल्यावर माझ्या वेडय़ासारख्या केलेल्या चुका तर कळल्याच, पण बरीचशी गणित माझी मला सोडवता आली. थोडक्यात मला वैचारिक पंगुत्व आलं होतं. आई म्हणते ते खरं आहे. ‘आपले मार्ग आपणच शोधले पाहिजे. अडचण आली तर शिक्षक, आईबाबा मार्गदर्शन करायला आहेतच की.’ पण त्याचा अजूनही मराठीचा आणि इतिहासचा प्रश्न सुटला नव्हता. त्याने केतकीकडे त्याला हे विषय आवडत नाही म्हणून परत तक्रार केली. केतकीने त्याला विचारलं की, ‘‘प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणे होणं शक्य आहे का? एवढी उत्तरं सापडली तुला. याचं पण सापडेलच की.’’ आदित्य हिरमुसला आणि तेथून निघून गेला.

आता या गोष्टीवर काहीही विचार करायचा नाही असं ठरवून तो गोष्टीचं पुस्तक वाचायला लागला. गोष्टीतल्या मुलाचे वडील अकाली जातात. तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षांला असतो. त्याला पदव्युत्तर शिक्षणपण घ्यायचं असतं. पण परिस्थितीमुळे त्याला शिकत असताना नोकरी पण करावी लागते. पदवी नसल्यानं त्याला कुरिअर बॉयची नोकरी पत्करावी लागते. खूप लांबपर्यंत उन्हातान्हात, पावसात त्याला हिंडावं लागे. मालक विक्षिप्त असल्यानं त्याची सतत बोलणी खावी लागत. शिवाय त्याच्याकडून मालक बाकीची पण कामं करून घेई. त्याच्या मनात नोकरी सोडून द्यावी असं येई, पण परिस्थितीमुळे त्याला नोकरी टिकवण्यासाठी मालकाशी जुळवून घेऊन काम करायला लागे. शिवाय हसऱ्या चेहऱ्याचा मुखवटा घालूनच लोकांकडे कुरिअर द्यायला लागे. पुढची गोष्ट वाचायच्या आधीच आदित्यला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.

यावेळी त्यानं लिहून काढलं. ‘कित्येक वेळा आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. नुसत्याच कराव्या लागत नाहीत तर त्यासाठी प्रचंड मेहनतही घ्यावी लागते. नाही केले तर उपयोगही नसतो. म्हणूनच ती गोष्ट स्वीकारून केली तर होणारा त्रास नक्की कमी होऊ  शकेल. मी इतिहासातील सनावळी लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करेन. याचा उपयोग स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करता येईल. नावडत्या विषयांचा अभ्यास रंजक पद्धतीनं करता येईल का याचे मार्ग शोधायला हवेत. नाहीतर मध्ये मध्ये छोटे छोटे ब्रेक घेईन. याने होणार त्रास पूर्णपणे जाणार नाही पण कमी नक्कीच होऊ  शकेल. हा अभ्यास कशाला करायचा या वाक्यानं माझाच त्रास वाढतो नि विषय समजण्याची शक्यतापण दुरावते. या त्रासापासून मीच माझा बचाव करू शकेन.’

आता ‘स्व मदत’ हीच सर्वोत्तम मदत हे आदित्यला उमगलं होतं.

माधवी गोखले

madhavigokhale66@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2016 1:05 am

Web Title: dislike and response
Next Stories
1 रागावर ताबा
2 भावनांचा अर्थ
3 निसर्गाचा चमत्कार
Just Now!
X