News Flash

नियोजन भान.. : समारोपाची फेरउजळणी

गुंतवणूक पर्यायांची सांगड घालताना आपल्या जोखीम क्षमतेचा व्यवस्थित विचार करा.

प्रतिनिधिक छायाचित्र

अर्धा डझन कच्चे लिंबू -१२ 

नमस्कार! हा हा म्हणता २०१७ साल संपायला आलं. तुमच्या समोर एक मोठा पट मांडायची जबाबदारी दडपण आणणारी नक्कीच होती. ध्येय सरळ होतं – अतिशय क्लिष्ट समजला जाणारा, आर्थिक नियोजन – हा विषय नियमितपणे, महिन्यातून एकदा, समजायला सोप्या अशा पद्धतीने वाचकांकडे पोहोचवायचा. गेले ११ महिने, म्हणजे जानेवारी ते नोव्हेंबर ‘अर्धा डझन कच्चे लिंबू’ या सदराखाली आर्थिक नियोजन कसं करायचं आणि त्यात मिळालेले खरे अनुभव हे मांडताना मला आणि माझ्या मैत्रिणींना अतिशय आनंद झाला.

आज वर्षांच्या शेवटच्या महिन्यात, ‘अर्धा डझन कच्चे लिंबू’चा शेवटचा भाग लिहिताना आर्थिक नियोजनाच्या ठळक मुद्दय़ांची पुनरावृत्ती करत आहे. नवीन वर्षांच्या आर्थिक नियोजनाची तयारी आताच झाली पाहिजे. नाताळ झाला की कधी ३१ डिसेंबर येतो आणि पार्टी संपून नवीन वर्ष कसं लगेच सुरू होतं हे कळतंच नाही. म्हणून या आठवडय़ात सर्व तयारी होऊन जाऊ दे! १ जानेवारी २०१८ पासून कोणतीही सबब चालणार नाही, कुठल्याही प्रकारची दिरंगाई करायची नाही. काय, बरोबर ना? चला तर मग, शुभस्य शीघ्रं!

१. आपल्या आर्थिक उद्दिष्टांची यादी बनवा. तुम्हाला कोणत्या कारणासाठी पैसे हवे आहेत, किती हवे आहेत आणि कधी हवे आहेत हे स्पष्ट करा. किती पैसे लागणार हे ठरविताना महागाईचा अंदाज नक्की घ्या. तुम्हाला पाच वर्षांनी जर पैसे लागत असतील, तर ध्येय चार वर्षांत पूर्ण करायचं हे लक्षात ठेवा. ध्येयाच्या एक वर्ष आधी तयार केलेली गुंतवणूक जास्त जोखमीच्या पर्यायामध्ये न ठेवता सुरक्षित ठिकाणी ठेवा.

२. तुमची मिळकत, खर्च, आजवरची गुंतवणूक आणि कर्ज हे खालील प्रमाणे मांडून घ्या. (सोबतचे कोष्टक पाहा)

३. गुंतवणूक करायच्या आधी आरोग्य विमा आणि आयुर्विमा तपासा. येणाऱ्या काळात आरोग्याशी निगडित असेलेले खर्च हे सामान्य महागाईपेक्षा अधिक दराने वाढायचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे आरोग्य विमा कव्हर वेळोवेळी वाढवणे गरजेचे आहे. त्यात अपघाती मृत्यू व गंभीर आजारांसाठी सोय करावी. टॉप-अप कव्हरचा वापर करा. त्याचं प्रीमियम कमी असतं आयुर्विमा घेताना आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्यांचा (कर्ज, मुलांचं शिक्षण, मोठे खर्च, लग्न) आढावा घेऊन मग ळी१े कव्हर घेतलेलं चांगलं. स्टेप-अप (विमा कव्हर वाढवण्यासाठी) आणि स्टेप-डाऊन (विमा कव्हर कमी करण्यासाठी) पर्यायांचा योग्य पद्धतीने वापर करा.

४. गुंतवणूक पर्यायांची सांगड घालताना आपल्या जोखीम क्षमतेचा व्यवस्थित विचार करा. सगळेच पैसे सुरक्षित ठेवले तर पुढे ते योग्य पद्धतीने वाढणार नाही. म्हणून झेपेल तितकी जोखीम घेऊन गुंतवणूक करा. जोखीम क्षमता वाढवण्यासाठी वाचन करा, माहिती मिळवा आणि सल्लागाराबरोबर चर्चा करून निर्णय घ्या.

५. प्रत्येक गुंतवणूक पर्याय समजून घ्या. कुणाच्या तरी सांगण्यावर विश्वास ठेवू नका. प्रश्न विचारा. आणि जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोवर पैशाचे व्यवहार करू नका.

६. गुंतवणूक पर्याय निवडताना जोखीम क्षमता, आर्थिक ध्येय आणि ध्येयपूर्तीसाठी लागणारा काळ यांचा योग्य समन्वय साधा. कमी काळात लागणारा पैसा जास्त जोखमीच्या गुंतवणुकीत घालू नका. तसंच दीर्घकालीन ध्येयांसाठी अगदी सुरक्षित गुंतवणूक उपयोगी नाही.

७. इमर्जन्सी फंड हा असलाच पाहिजे. सहा महिन्यांचा पगार किंवा सहा महिन्यांचा खर्च – इतकी रक्कम वेळेला उपलब्ध होईल याची काळजी घ्या. बचत खाते,ोऊ, लिक्विड म्युचुअल फंड, आर्ब्रिटाज फंड, या गुंतवणूक पर्यायांचा वापर करा.

८. रिटायरमेन्ट फंड नोकरी लागल्या पासूनच तयार करायला घ्या. जास्त काळ गुंतवणूक केल्याने अधिक जोखीम घेता येते आणि कमी जबाबदारी असेपर्यंत जास्त बचत करता येते. कुटुंब मोठं व्हायला लागलं की गरजा व इतर खर्च वाढतात आणि बचतीचा दर कमी होतो.

९. खर्च व्यवस्थापन हा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. खर्च करताना हुशारी बाळगा आणि आपलं राहणीमान सांभाळा.

१०. कर्ज घेताना त्यातून नक्की काय साध्य होतंय हे बघा. खर्चासाठी कर्ज घेऊ  नका. अर्थात वेळ प्रसंगानुसार कधी तरी कर्ज घेणं ठीक आहे. परंतु गरज नसताना कर्ज टाळा.

११. कर नियोजन वर्षांच्या सुरुवातीला करा. कर वाचवण्याच्या पर्यायांची योग्य माहिती मिळवा. कर वाचवण्यापेक्षा कर भरणंसुद्धा कधी तरी फायद्याचं ठरतं.

१२. गुंतवणुकीचे निर्णय भावनिक होऊन घेऊ  नका. नातेवाईकांना मदत करा, पण आपलं नुकसान करू नका.

१३. पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणून मुलांचे लाड पुरवताना तुमच्या आर्थिक परिस्थितीचा योग्य आणि खरा आढावा घ्या.

१४. गुंतवणूक आणि त्यातून मिळणारे परतावे हे आपल्या अपेक्षे प्रमाणे आहेत की नाही हे नियमितपणे तपासा. एखादी गुंतवणूक जर मनाजोगे परतावे देत नसेल तर त्या मागचं कारण शोधा आणि गरज असल्यास त्यातून बाहेर पडा. नुकसानामागे अजून नुकसान करून घेऊ  नका.

१५. पगाराच्या पलीकडे विचार करा. आपण आयुष्यभर सक्रिय राहू शकत नाही. म्हणून मिळकत वाढवण्यासाठी इतर पर्याय शोधा. शिवाय खासगी नोकरीची हमी नसते. त्यामुळे मिळकतीचा दुसरा पर्याय असणं फार महत्त्वाचं आहे. इंटरनेटच्या साहाय्याने खूप काही करता येतं. त्याचा योग्य वापर करा.

१६. आर्थिक नियोजन कुटुंबासाठी आहे. त्यात नवरा, बायको आणि मुलांचा सहभाग असणं गरजेचं आहे. मुलांना योग्य वेळी योग्य धडे द्या जेणेकरून त्यांना आर्थिक जबाबदाऱ्यांची जाणीव होईल आणि ती आर्थिकरीत्या साक्षर होतील.

१७. क्रेडिट कार्ड, सेल आणि ऑन-लाइन खरेदी सांभाळून करा. योग्य वापर केल्यास फायदा आणि गैरवापर केल्यास नुकसान होतं.

१८. गुतंवणूक मोठीच करायला हवी असं नाहीये. रु. १००ची मासिक रकढ १५% दराने १० वर्षांत रु. २७,००० इतकी होऊ शकते.

१९. चक्रवाढ दराचा खरा फायदा ७-८ वर्ष सरल्यावर लक्षात येतो. म्हणूनच गुंतवणुकीला जास्त वेळ द्या.

२०. प्रत्येक गुंतवणुकीमधे नॉमिनेशन करायचं लक्षात ठेवा.

२१. आपल्या सगळ्या गुंतवणूकींची माहिती व्यवस्थित एकत्र ठेवा आणि एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे त्याची एक प्रत ठेवा.

२२. इच्छापत्र करा. तुमच्या पश्चात तुमच्या संपत्तीच्या व्यवस्थित नियोजनाची तरतूद करा.

आर्थिक नियोजन हा एक आव्हानात्मक प्रवास आहे. सकारात्मक मन:स्थिती ठेवा आणि चिकाटी, आत्मविश्वासाने आर्थिक नियोजन करा. तुम्हाला फायदा नक्कीच होईल.

नवीन वर्ष  सर्वाना सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावो हीच सदीच्छा. शुभं भवतु!

तृप्ती राणे trupti_vrane@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:55 am

Web Title: article on financial planning by trupti rane
Next Stories
1 कर  समाधान : आरोग्य विमा आणि  प्राप्तिकर कायदा
2 फंड विश्लेषण : रंगला वर्खाचा विडा..
3 स्त्री आरोग्यविमा
Just Now!
X