arth02’ प्रश्न: मी माझ्या नावाने २००६ मध्ये एक घर विकत घेतले होते. या घरासाठी घेतलेले गृहकर्ज मी डिसेंबर २०१५ मध्ये संपूर्णपणे फेडले. आता मी पुण्याला कुटुंबासहित स्थलांतर केले आहे. मी पुण्याला माझ्या आणि पत्नीच्या संयुक्त नावाने एक घर विकत घेतले आहे. या घरासाठी गृहकर्ज घेतले आहे. माझा प्रश्न असा आहे की, मी माझे पुण्याचे घर भाडय़ाने दिले असे दाखवून २ लाख रुपयांपेक्षा जास्त भरलेल्या व्याजाची उत्पन्नातून वजावट घेता येईल का? २०१५-१६ या आर्थिक वर्षांत मी PRE-EMI  व्याज भरले आहे त्याची वजावट मला मिळू शकेल का? मला एका घरावर संपत्ती कर (वेल्थ टॅक्स) भरावा लागेल का?
– प्रसन्ना मोहरील, पुणे
उत्तर : जर करदात्याकडे एकच राहते घर असेल तर घरभाडे उत्पन्न हे शून्य समजले जाते. जर करदात्याकडे एकापेक्षा जास्त घरे असतील तर त्यापैकी कोणतेही एक घर हे राहते घर समजता येईल आणि त्याचे उत्पन्न हे शून्य समजले जाईल आणि दुसऱ्या घराच्या घरभाडे उत्पन्नावर कर भरावा लागेल. आपण जर मुंबईचे घर भाडय़ाने दिले नसेल तर दोन्हीपैकी कोणतेही एक घर राहते दाखवता येईल. कलम २४ प्रमाणे गृह कर्जावरील व्याजावर उत्पन्नातून २,००,००० रुपयांची सूट मिळते. ही मर्यादा ज्या घरावरील घरभाडे उत्पन्न शून्य आहे, अशा स्वत:च्या राहत्या घरासाठी आहे. दुसऱ्या घराचे घरभाडे उत्पन्न करपात्र उत्पन्नात दाखवावे लागते (जरी घर भाडय़ाने दिले नसले तरी) त्यांच्यासाठी ही मर्यादा लागू नाही. ज्या आर्थिक वर्षांत घराचा ताबा घेतला त्या वर्षीपासून व्याजाची आणि मुद्दल परतफेडीची वजावट उत्पन्नातून घेता येते. जर आपण घराचा ताबा २०१५-१६ या आर्थिक वर्षांत घेतला असेल तर या वर्षांत दिलेल्या व्याजाची वजावट घेता येईल. आता संपत्ती कर कायदा रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे संपत्ती कर भरावा लागणार नाही.

’ प्रश्न : मी करनिर्धारण वर्ष २०१४-१५ सालचे विवरणपत्र भरले होते आणि ३६,५०० रुपयांचा कर परताव्याचा (रिफंड) दावा केला होता. मला तो जानेवारी २०१६ मध्ये व्याजासहित ४०,५१५ रुपये मिळाला. ही कर परताव्याची रक्कम करपात्र आहे का?
पंकज देसाई, ई-मेलद्वारे
उत्तर: कर परताव्याची रक्कम ३६,५०० रुपये ही करपात्र नाही, परंतु त्यावर कलम २४४ अ नुसार मिळालेले व्याज म्हणजेच ४,०१५ रुपये (४०,५१५ वजा ३६,५००) हे करपात्र आहेत. ते तुम्हाला आर्थिक वर्ष २०१५-१६ (कर निर्धारण वर्ष २०१६-१७) च्या उत्पन्नामध्ये दाखवून त्यावर कर भरावा लागेल.

’ प्रश्न :मी कर निर्धारण वर्ष २०१५-१६ यासाठीचा प्राप्तिकर मला ८,६८० रुपये भरणे आवश्यक असताना मी ८,६४५ रुपये एवढा भरला, म्हणजे मी ३५ रुपये कमी भरले, पण ही चूक माझी नसून सदर लिपिकाची आहे. तरीपण यासाठी आता काय उपाययोजना करावी याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
– जयप्रकाश जिभकाटे, ई-मेलद्वारे
उत्तर : स्व:निर्धारण कर (सेल्फ असेसमेंट टॅक्स) हे विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी भरणे गरजेचे असते. जर हा कर पूर्ण भरला नसेल आणि आपण विवरणपत्र ३५ रुपये कर देय असे दाखवून दाखल केले असेल तर ते सदोष विवरणपत्र म्हणून समजले जाते. यासंबंधी प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयातून आपल्याला दोष दूर करण्यासंबंधी सूचना येईल आणि आपल्याला कलम १३९(९) प्रमाणे सुधारित विवरणपत्र भरण्याची संधी देण्यात येईल. या वेळी योग्य ते पैसे (व्याजासहित) भरून सुधारित विवरणपत्र भरता येईल किंवा प्राप्तीकर खात्याची सूचना येण्याची वाट न बघता आपण स्वत:च कलम १३९(५) नुसार व्याजासहित पैसे भरून सुधारित विवरणपत्र दाखल करू शकता.

’ प्रश्न : मी ७३ वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आहे. मी दर वर्षी प्राप्तिकर भरतो. मी आर्थिक वर्ष २०१५-१६ चा अग्रिम कर भरला आहे. माझा मेडिक्लेम नाही. माझ्या मुलीने माझ्या वैद्यकीय उपचारांसाठी पाच लाख रुपये खर्च केले तिला तिने काढलेल्या मेडिक्लेम विम्याअंतर्गत २ लाख रुपये मिळाले. उरलेले ३ लाख रुपये मी माझ्या बचत खात्यातून मुलीला दिले. माझा प्रश्न असा आहे की, या तीन लाख रुपयांची कलम ८० डीनुसार मी वजावट दाखवू शकतो का? आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये माझे करपात्र उत्पन्न नाही तर मला मी भरलेला अग्रिम कर परत मिळेल का?
– बळवंत दांडेकर, ठाणे</strong>
उत्तर : कलम ८० डीनुसार मेडिक्लेम विमा हफ्ता भरला तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ३०,००० रुपयांची वजावट उत्पन्नातून मिळू शकते. यामध्ये वैद्यकीय उपचारांचा समावेश नाही. आपण आपल्या मुलीला दिलेल्या ३ लाख रुपयांची वजावट कलम ८० डीनुसार मिळू शकणार नाही. काही ठरावीक रोगांसाठी केलेल्या खर्चाची वजावट कलम ८० डीडीबीनुसार मिळू शकते. यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्षे ते ८० वर्षे आहे त्यांना ६०,००० रुपयांपर्यंत; अति ज्येष्ठ, ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना ८०,००० रुपये आणि इतर नागरिकांना ४०,००० रुपयांपर्यंतची वजावट उत्पन्नातून मिळू शकते. आपण भरलेला अग्रिम कर हा विवरणपत्र भरून आपल्याला परत मिळवता येईल.

’ प्रश्न : मी माझ्या आई-वडिलांना दरमहा २०,००० रुपये घरखर्चासाठी देतो. माझ्या खात्यातील धनादेश मी त्यांच्या खात्यात जमा करतो. या व्यवहारावर मला किंवा माझ्या आई-वडिलांना कर भरावा लागेल का?
– आदित्य गडकर, औरंगाबाद</strong>
उत्तर : नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी कलम ५६ नुसार करपात्र नाहीत. त्या भेटींवर भेट देणाऱ्याला किंवा भेट घेणाऱ्याला कर भरावा लागत नाही.

’ प्रश्न : मला कलम १४३(१) नुसार प्राप्तिकर खात्याकडून (सीपीसी, बंगळुरू) एक पत्र आले आहे, त्यानुसार त्यांनी माझा ५,५६० इतका कर देय असा दर्शविला आहे; परंतु मी माझ्या विवरणपत्रात ३,२०० रुपयांचा कर परताव्याचा (रिफंड) दावा केला होता. आता मला काय करावे लागेल?
– संदेश मोरे, अहमदनगर</strong>
उत्तर : कलम १४३ (१) च्या सूचनेत विवरणपत्रात भरलेल्या रकमा आणि प्राप्तिकर खात्यानुसार रकमा असा तुलनात्मक तक्ता असतो. सर्वात प्रथम कोणत्या रकमेमध्ये फरक आहे ते शोधून काढले पाहिजे. असा फरक हा अनेक कारणांनी येऊ शकतो, जसे उद्गम कर, भरलेला स्व-निर्धारण कर, उत्पन्न किंवा कर गणताना झालेली चूक, वगैरे. फरक का आला याचे कारण शोधल्यानंतर जर प्राप्तिकर खात्याची चूक असेल तर त्याचे उत्तर ऑनलाइन द्यावे. जर आपली चूक असेल तर कर भरावा.

’ प्रश्न : माझे वय ६० वर्षे आहे. मार्च २००३ मध्ये एक घर मी २,५०,००० रुपयांना विकत घेतले होते. ते आता जुलै २०१६ पर्यंत अंदाजे ४० लाख रुपयांना विकून नवीन घर घेणार आहे. या विक्रीवर मला किती कर भरावा लागेल? कर वाचविण्यासाठी या व्यवहारावर होणारा किती नफा मी नवीन घरात गुंतवू शकते? मला त्यासाठी विवरणपत्र भरावे लागेल का? व केव्हा?
– शैला, ई-मेलद्वारे
उत्तर : आपल्याला या व्यवहारावर किती भांडवली नफा झाला ते पाहावे लागेल. घराची विक्री तीन वर्षांनंतर केल्यामुळे हा नफा दीर्घ मुदतीचा असेल. हा भांडवली नफा खालीलप्रमाणे:
घराची विक्री किंमत : ४०,००,००० रुपये
घराची खरेदी किंमत : २,५०,००० रुपये
महागाई निर्देशांकानुसार (इंडेक्सेशन) खरेदी मूल्य :
२००२-०३ सालचा महागाई निर्देशांक ४४७
२०१६-१७ सालचा महागाई निर्देशांक ११३० (गृहीत)*
इंडेक्सेशननुसार खरेदी मूल्य :
२,५०,००० ७ ११३० रु ४४७ = ६,३१,९९१ रुपये
दीर्घ मुदतीचा भांडवली नफा = ३३,६८,००९ रुपये
*(२०१६-१७ या आर्थिक वर्षांचा महागाई निर्देशांक अजून सूचित झालेला नाही. या भांडवली नफ्यासाठी तो ११३० इतका गृहीत धरण्यात आला आहे.)
या ३३,६८,००९ रुपये दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २०.६०% दराने (शैक्षणिक करासहित) कर भरावा लागेल.

या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचवायचा असेल तर ३३,६८,००९ रुपये या रकमेएवढी गुंतवणूक नवीन घरात करावी लागेल. नवीन घर आपल्याला दोन वर्षांच्या आत विकत (बांधले तर तीन वर्षांच्या आत) घेणे गरजेचे आहे. ज्या वर्षांत हा व्यवहार होईल त्या वर्षीचे विवरणपत्र दाखल करावे लागेल यासाठी वर्ष संपल्यानंतर ३१ जुलैपूर्वी विवरणपत्र दाखल करावे.

 लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.

प्रवीण देशपांडे