वस्त्र विक्रीतील आपला व्यवसाय काही दिवसांपूर्वीच एकत्र करणाऱ्या आदित्य बिर्ला समूहाने तिच्या किरकोळ विक्री व्यवसायाचा विस्तार केला आहे. कंपनीने ज्युबिलिएन्ट इंडस्ट्रिजचा हायपरमार्केट व्यवसाय समूहाने रोखीने खरेदी केला आहे.
ज्युबिलिएन्ट इंडस्ट्रिज अंतर्गत ज्युबिलिएन्ट अ‍ॅग्रि अ‍ॅन्ड कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडमार्फत बंगळुरुतएकूण २.८७ लाख चौरस फूट जागेत चार हायपरमार्केट दालने चालविली जातात. येत्या चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
गेल्या पंधरवडय़ात भारतीय रिटेलमधील हे तिसरे ताबा व विलिनीकरण आहे. यापूर्वी आदित्य बिर्ला समूहाने आपल्या अखत्यारितील दोन वस्त्र कंपन्यांचे ५,२९० कोटी रुपयांच्या आदित्य बिर्ला फॅशन अ‍ॅन्ड रिटेलमध्ये विलिनीकरण करून घेतले होते. यामार्फत देशातील सर्वात मोठी वस्त्र दालन संख्या असणारी ही कंपनी बनली. यानंतर लगेचच भारती रिटेल व फ्युचर रिटेल यांच्या दरम्यान व्यवसाय एकत्रिकरणाचा करार झाला होता. आदित्य बिर्ला रिटेलच्या अखत्यारितील एकूण दालन संख्या आता १,८६९ झाली आहे. तर व्यवसाय ६,००० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येते.