आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात देशाचया निर्यात ५.८ टक्क्य़ांची, तर आयातीत ११.३ टक्के इतकी घसरण झाल्याचे दिसू शकेल. मात्र सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे निर्यात क्षेत्राला अपेक्षित पाठबळ दिले जाईल. जागतिक स्तरावर अर्थचक्र गतिमान होत जाईल तसतसे, आयात-निर्यातीचे प्रमाण वाढत जाईल, असे ‘आर्थिक पाहणी अहवाल २०२१’ने नमूद केले आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या प्रथम सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) निर्यात २१.३१ टक्क्य़ांनी घसरून १२५.२५ अब्ज अमेरिकी डॉलर नोंदविली गेली.

आयात याच सहामाहीत ४० टक्क्य़ांच्या घसरणीने १४८.६९ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली आहे.

या तुलनेत उत्तरार्धातील सहामाहीत आयात-निर्यातीतील घसरणीचे प्रमाण कमी झालेले दिसेल.

कोविड साथीचे थैमान सुरू होण्याआधीच जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदावलेपणामुळे देशाच्या परराष्ट्र व्यापाराला उतरती कळा लागली होती, असेही अहवालाने म्हटले आहे.