देशाच्या भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांनी नवनवीन शिखरे गाठण्याचा विक्रमी सूर बुधवारीही कायम राहिला असून, सेन्सेक्सने पुन्हा ११७ अंशांची कमाई करून २६,५६०.१५ असा तर निफ्टीने ३१ अंश कमावून ७,९३६.०५ अशा अभूतपूर्व पातळ्या गाठल्या. युरोपात आर्थिक संकटाच्या निवारणासाठी पुन्हा एकदा उत्तेजकाचा डोस देणे सुरू होईल, तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारासंबंधीचे ताजे संकेत याबद्दलची ही स्थानिक बाजाराची उत्साहदायी प्रतिक्रिया असल्याचे सुचविण्यात आले.
बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी त्यांच्या सार्वकालिक उच्चांक स्तरावर विश्राम घेतला. सेन्सेक्सची ही सलग पाचव्या दिवशी झालेली वाढ आहे, तर त्याने  सलग तिसऱ्या दिवशी मजल-दरमजल नवनवीन शिखर दाखविले आहे. गुरुवार हा ऑगस्ट महिन्यांतील डेरिव्हेटिव्हज् व्यवहार मालिकेच्या समापनाचा दिवस पाहता, आज बाजाराच्या व्यवहारातील सक्रियता स्वाभाविकपणे उंचावल्याचेही दलालांचे म्हणणे आहे.
संरक्षण सामग्रीशी संलग्न समभागांमध्ये तब्बल २० टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. केंद्र सरकारने या क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या निर्णयावर अधिसूचना काढून शिक्कामोर्तब केल्याचे सकारात्मक परिणाम या समभागांच्या मागणीवर पडलेले दिसले. त्याचप्रमाणे वाहन उद्योग, आयटी, तेल शुद्धीकरण, ग्राहकोपयोगी वस्तू, बँकांच्या समभागांना आज बाजारात मोठी मागणी दिसून आली.
त्या उलट स्थावर मालमत्ता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोळसा खाणवाटपाविषयीच्या निर्णयाचे परिणाम म्हणून ऊर्जा व धातू क्षेत्रातील समभागांमध्ये बुधवारीही विक्रीचा सपाटा सुरू राहिल्याने, त्यांचे भाव गडगडले.
जगभरात अन्यत्र आशियाई बाजारांनीही अमेरिकेतील अर्थस्थितीबाबत ताजी आकडेवारी पाहता दणदणीत मुसंडी मारलेली आढळून आले. आपल्याकडील मध्यान्ह वेळेनुसार सुरू होणाऱ्या युरोपीय बाजारांमध्ये प्रारंभिक नरमाई दिसून आली.
ब्रिटनचा फुट्सी निर्देशांक मात्र किरकोळ वाढ दर्शवीत खुला झाला. प्रामुख्याने युक्रेन-रशिया समस्येचे सावट या बाजारांवर अद्याप कायम असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.