कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या वित्त वर्ष २०२०-२१ मधील व्याजदराबाबत येत्या ४ मार्चला निर्णय होण्याची शक्यता आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची येत्या ४ मार्चला श्रीनगरला बैठक होत आहे. या बैठकीत चर्चेला येणाऱ्या विषयांची माहिती लवकरच स्पष्ट होणार असल्याचे संघटनेचे विश्वस्त के. ई. रघुनाथन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

वित्त वर्ष २०१९-२० मधील वार्षिक ८.५ टक्क्यांच्या तुलनेत चालू वर्षांतील व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करोना-टाळेबंदीमुळे आर्थिक चणचणीतील संघटनेच्या अनेक सदस्यांनी निधीतील रक्कम काढून घेण्याचे तसेच कमी योगदान देण्याचे धोरण अनुसरल्याने सरकारला अधिक व्याज देणे शक्य होणार नसल्याचे मानले जाते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने वर्ष २०१८-१९ मधील ८.६५ टक्क्यांवरून पुढील वित्त वर्षांत दर कमी करत ते सात वर्षांच्या तळात आणून ठेवले होते. यापूर्वी, २०१२-१३ मध्ये दर ८.५० टक्के असे किमान होते. तुलनेत २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१५-१६ मध्ये ८.८० टक्के असे अधिक होते.