पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळावर केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून ललित कुमार चंदेल यांची नियुक्ती केली गेली आहे. भारत सरकारने १८ ऑगस्टला हा नियुक्ती आदेश जारी केला.
भारतीय आर्थिक सेवेच्या (आयईएस) १९९५ सालच्या तुकडीतील अधिकारी असलेले ललित कुमार हे केंद्रीय अर्थमंत्रालयात वित्तीय सेवा विभागात आर्थिक सल्लागार या पदावर कार्यरत होते. अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, एमबीए आणि फेलो ऑफ इन्शुरन्स या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. येथील नियुक्तीपूर्वी ललित कुमार आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळावर सरकारनियुक्त संचालक होते. त्यांनी भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये अनेक पातळ्यांवर काम केले आहे, ज्यात बँकिंग, विमा क्षेत्र, भांडवल बाजार, परकीय मदत, ग्रामीण विकास, ऊर्जा, सिंचन आणि आरोग्य यांचा समावेश आहे. यापूर्वी त्यांनी सरकारनियुक्त संचालक म्हणून नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., ओरिएण्टल इन्शुरन्स कं. लि., कॉर्पोरेशन बँक, अॅग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया आणि नॅशनल इन्शुरन्स अकादमी या ठिकाणी काम केले.