पेट्रोलच्या पाठोपाठ शहरात सीएनजीवर वाहने चालविणेही महाग ठरणार आहे. महानगर गॅसने वाहनांसाठीचे सीएनजी दर किलोमागे थेट ३ रुपयांनी वाढवले आहे. त्याचवेळी घराघरांत होणाऱ्या नळाद्वारे वायु पुरवठय़ाचा टप्पाही संकुचित केला आहे.
भारतीय चलनाच्या तुलनेत भडकणाऱ्या डॉलरची आग थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली असून, मुंबईत नळाद्वारे वायुपुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने त्याचे टप्पे कमी करत वाहनांसाठीचे दरही महाग केले आहेत. जूननंतर दुसऱ्यांदा दरवाढ झाली आहे.
यापूर्वी महागडय़ा डॉलरमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढविल्यानंतर आता शहरात नैसर्गिक वायूवर धावणाऱ्या गाडय़ा हाकणेही महाग ठरणार आहे. महानगर गॅसने सीएनजीच्या दरात किलोमागे ३ रुपयांची वाढ शुक्रवार मध्यरात्रीपासूनच लागू केली आहे. त्यामुळे मुंबई शहरात या वायूचे दर ३८.९५, ठाण्यात ३९.६९ व नवी मुंबईत ३९.४४ रुपये प्रति किलो झाले आहेत. नवे जारी करण्यात आलेले हे दर सर्व करांसहित आहेत. वाढत्या डॉलरमुळे वायूच्या किमती वाढविण्यात आल्या असल्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत त्या अनुक्रमे ६७ व ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीने याचबरोबर नळाद्वारे पुरवठा केले जाणाऱ्या वायूचे (पीएनजी) टप्पे बदलले आहेत. त्याच्या दरांमध्ये बदल करण्यात आला नसला तरी टप्पा कमी केल्यामुळे स्वयंपाकाचा वायूही महागडाच ठरणार आहे. टप्पा ०.३० स्टॅण्डर्ड क्युबिक मीटर प्रतिदिनने (एससीएमडी) कमी करण्यात आला आहे.
परिसर व नवे दर प्रति किलो (सर्व दरांसह) (कंसात जुने दर)
मुंबई, तळोजा, अंबरनाथ, पनवेल, खारघर रु. ३८.९५ (रु. ३५.९५)
ठाणे रु. ३९.६९ (रु. ३६.४७)
नवी मुंबई, भिवंडी रु. ३९.४४ (३६.३०)
मीरा रोड, भाईंदर रु. ३९.२६ (रु.३६.१७)
कल्याण रु. ३९.२०
उल्हासनगर रु. ३९.९४
पीएनजी टप्पा (एससीएमडी) जुना टप्पा नवा टप्पा
पहिला ०.०० ते ०.८० ०.०० ते ०.५०
दुसरा ०.८१ ते १.२० ०.५१ ते ०.९०
तिसरा १.२० ते पुढे ०.९० ते पुढे
दर वाढले नाही तरी नळाद्वारे वायुही महागच
जुलैमध्ये सुधारित करण्यात आलेले नळाद्वारे वायूचे दर मुंबईत २४.०९ व ठाण्यात २४.१७ रुपये स्टॅण्डर्ड क्युबिक मीटर प्रति दिन होते. आता दर वाढविण्यात आले नसले तरी टप्पा कमी करण्यात आल्याने अधिक किंमत पडणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यासाठी २४.०९ रुपये तर दुसऱ्या टप्प्यासाठी २६.७७ रुपये स्टॅण्डर्ड क्युबिक मीटर प्रति दिन दर पडणार आहेत. पहिले दोन टप्पे हे घरगुती ग्राहकांसाठी आहेत.