देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने मंगळवारी चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत महसुलात (अमेरिकी डॉलरमधील) ५ टक्क्यांची वाढ नोंदविणारी अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी नोंदविली. या दमदार कामगिरीमुळे कंपनीच्या समभागाचे मूल्यही व्यवहारात तब्बल १५ टक्क्यांपर्यंत वाढले. कंपनीने आगामी कालावधीत अधिक महसूल तसेच व्यवसाय वाढ अंदाजली आहे.
एरवी तिमाही निकालाच्या हंगामाची सुरुवात करणाऱ्या इन्फोसिसने यंदा काहीशा उशिराने वित्तीय निष्कर्ष जारी केले. देशातील अव्वलस्थानी असलेल्या स्पर्धक टीसीएसने गेल्या आठवडय़ाच्या नफ्यातील परंतु एकंदर अपेक्षेपेक्षा किंचित खाली जाणारे तिमाही निष्कर्ष जाहीर केले होते. इन्फोसिसच्या तुलनेत टाटा समूहातील या कंपनीच्या डॉलरमधील महसुलात ३.५ टक्के वाढ राखली गेली होती. इन्फोसिसच्या एप्रिल ते जून २०१५ मधील नफ्यात ४.९८ टक्के वाढ होत तो ३,०३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इन्फोसिसच्या या कामगिरीने बदलेल्या जागतिक स्थितीत, देशातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगाबद्दल आशा उजळल्या आहेत.
यंदाच्या पहिल्या तिमाहीत मात्र कंपनीच्या रुपयातील महसुलात १२.४० टक्के वाढ होऊन तो १४,३५४ कोटी रुपये झाला आहे. भक्कम होत असलेल्या डॉलरचा लाभ कंपनीला काही प्रमाणात झाला आहे. त्यामुळेच चालू आर्थिक वर्षांसाठी कंपनीने १० ते १२ टक्के महसूल वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर विक्री वाढही ११ ते १३ टक्क्यांपर्यंत राहण्याची कंपनीला आशा आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या नासकॉमने चालू आर्थिक वर्षांत या क्षेत्राची वाढ १४ ते १६ टक्क्यांपर्यंत अपेक्षिली आहे.
कंपनीचे मुख्याधिकारी विशाल सिक्का यांच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसने गेल्या तिमाहीत ७९ नवे ग्राहक जोडले. कंपनीतील कर्मचारी गळतीचे प्रमाण यंदा कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. जून २०१५ अखेर कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या १,७९,५२३ राहिली आहे.

समभागाची ११ टक्क्यांनी झेप
इन्फोसिसच्या निकालासंबंधाने भांडवली बाजार तसेच गुंतवणूकदारांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. बाजाराच्या मंगळवारच्या व्यवहारांना प्रारंभ होण्यापूर्वीच प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्याने, सुरुवातीलाच दुहेरी आकडय़ात १५ टक्क्यांपर्यंत समभागाने उसळी घेतली. कंपनीच्या समभागाचे मूल्य दिवसअखेर त्याच प्रमाणात वाढते राहिले. सोमवारच्या तुलनेत ११.०५ टक्के वाढीसह समभाग मुंबई शेअर बाजाराच्या दफ्तरी १,११२.६५ रुपयांवर स्थिरावला. इन्फोसिसचे समभाग मूल्य गेल्या सहा महिन्यांत ६ टक्क्यांनी घसरले आहे. त्याचा यापूर्वीचा तळ १,००० रुपयांच्याही खाली, ९३० रुपये होता.