वाहनांना नसलेल्या मागणीमुळे कंपनीच्या प्रकल्पातील उत्पादन तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रने घेतला आहे. मात्र कंपनी कोणत्या प्रकल्पात व कोणत्या तारखेदरम्यान उत्पादन बंद ठेवेल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. कंपनीचे महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिकसह उत्तरेतील हरिद्वार येथेही वाहन उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीने तिची उपकंपनी महिंद्र व्हेईकल मॅन्युफॅक्चर्स लिमिटेडमध्येही काम ठप्प ठेवण्याविषयी मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे. वाहन विक्रीत सतत घसरण नोंदविणाऱ्या महिंद्र समूहाने यापूर्वीही मर्यादित कालावधीसाठी उत्पादन बंद प्रक्रिया राबविली आहे. तर कामगारांच्या आंदोलनामुळे कंपनीला तिच्या नाशिक येथील प्रकल्पातही काही दिवस काम बंद ठेवावे लागले होते. कंपनीने एप्रिलमध्ये १२ टक्के कमी वाहन विक्री नोंदविली आहे.