एटीएमसाठी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याच्या बहाण्याने बँकांच्या खर्चातील वाढीच्या आकडय़ांवरून चर्चा रंगली असतानाच त्यांना याबाबतचा ताळेबंद आता अधिक अद्ययावत करावा लागणार आहे. बँकांना येत्या जुलैपासून दृक मार्गदर्शक व ब्रेल लिपीतील कीपॅड असलेले नवे एटीएम लावण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने जारी केले आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित हे एटीएम बसविण्यासाठी यामुळे बँकांना पुन्हा खर्चघडी बसवावी लागणार आहे.
बँकांना त्यांच्या एकूण एटीएमपैकी एक तृतियांश एटीएम हे अंध खातेदारांना पूरक ठरतील असे उभारण्याच्या सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने २००९ मध्ये दिल्या होत्या. त्याचाच विस्तार करताना मध्यवर्ती बँकेने आता बँकांना सर्व एटीएम हे ब्रेल लिपीचे कीपॅड असलेले व दृक मार्गदर्शन करणारे असावेत, असे सांगितले आहे. यानुसार हे एटीएम १ जुलै २०१४ पासून बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दृक व कीपॅडच्या माध्यमातून खातेदारांना सूचना देणारे एटीएम बसविण्यासाठी बँकांनी आराखडा आखावा तसेच सध्याचे एटीएम अशा अद्ययावत रचनेत बदलण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. अशा पद्धतीने अंध खातेदारांना सेवा पुरविल्यानंतर तिचा आढावा वेळोवेळी घ्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे. अपंग व्यक्तींसाठी आवश्यकता पडल्यास एटीएम ठिकाणी चाकाची खुर्ची पुरविण्याचीही सोय करावी, असेही म्हटले आहे.
अनेक बँकांच्या एकापेक्षा अधिक एटीएम असलेल्या ठिकाणी एक तरी एटीएम हे उपरोक्त सुविधा असलेले असते. मात्र आता ते अनिवार्य असेल. यामुळे बँकांना सध्याच्या एटीएममधील रचना बदलावी लागेल. त्यासाठीच्या तंत्रज्ञानासाठी या बँकांना अधिक खर्चही करावा लागेल. बंगळुरूच्या एका प्रकरणानंतर एटीएममधील सुरक्षा ऐरणीवर आली होती. त्यासाठी लागणारा वाढीव खर्च हा व्यवहारावरील वाढीव शुल्काच्या माध्यमातून आकारण्याची तयारी बँकांनी केली.

निर्यातदारांना १० वर्षे मुदतीपर्यंत कर्जे
दीर्घकालीन करार पूर्ण करण्यासाठी निधिओघाची आवश्यकता भासणाऱ्या निर्यातदारांना रिझव्‍‌र्ह बँकेने दिलासा दिला आहे. निर्यातदारांना दिले जाणाऱ्या कर्जाची मुदत १० वर्षांपर्यंत वाढविण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने परवानगी दिली आहे. सध्या विविध बँकांमार्फत निर्यातदारांना किमान एक वर्षांपर्यंत कर्ज मिळते. निर्यातदारांची परतफेड समाधानकारक असल्यास ही मुदत किमान तीन वर्षांपर्यंत वाढविण्यात येईल, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.