देशातील सर्वात मोठी तेल आणि वायू निर्माती कंपनी ओएनजीसीने नवीन स्रोतांचे संशोधन आणि सध्याच्या जुन्या स्रोतांमधून उत्पादनातील नैसर्गिक घसरण रोखण्यासाठी तब्बल ८१,८९० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची शुक्रवारी माहिती दिली.
येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित भागधारकांना संबोधित करताना, ओएनजीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश के सराफ यांनी, ‘‘कंपनीची प्रमुख तेल व वायू उत्पादन करणाऱ्या स्रोतांमधून तेल आणि वायूच्या उपशाला नैसर्गिक ओहोटी लागली आहे,’’ अशी कबुली दिली. तथापि ही घसरण रोखून या ठिकाणाहून उत्पादन उंचावण्यासाठी कंपनीने उपाययोजना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. उन्नत तेल प्राप्ती (आयओआर) आणि वर्धिष्णू तेल प्राप्ती (ईओआर) योजना राबविल्या जात असून, त्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असल्याची त्यांनी माहिती दिली.
या प्रयत्नांना यशही आले असून, एकंदर ८७.४१ दशलक्ष टनाची उत्पादनात झालेली वृद्धी याचा प्रत्यय असल्याचे सराफ म्हणाले. या आघाडीवर एकूण २४ प्रकल्पांसाठी ४१,३१६ कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीचे नियोजन असून, त्यापैकी १९ प्रकल्पांच्या ठिकाणी काम पूर्णही झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
तेल आणि वायूच्या संशोधित साठय़ांमधून उत्पादन घेण्याचे काम वेगाने सुरू करण्याची गरज लक्षात घेता ओएनजीसीने विकसन सुरू केलेल्या १५ संभाव्य प्रकल्पांपैकी सात प्रकल्पांचे काम पूर्ण केले असून, अन्य आठ प्रकल्पांमध्ये ते विविध टप्प्यांवर सुरू आहे. या प्रकल्पांवर अंदाजे ४०,५३७.७ कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांमधून ४५.६६ दशलक्ष टनाचे कच्चे तेल आणि ६७.४४ अब्ज घन मीटर नैसर्गिक वायू उत्पादन होईल, असे सराफ म्हणाले.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्व सागरकिनाऱ्यावर केजी-डी६ तेल क्षेत्राशेजारी असलेल्या केजी-डीडब्ल्यूएन-९८/२ आणि केजी-डी५ क्षेत्रातून तसेच पश्चिम किनाऱ्यावरील दमण वायू क्षेत्रातून उत्पादन सुरू करण्यावर ओएनजीसीने लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले. या कामासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने ५२१९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली असून, दमण क्षेत्रातून दिवसा ८.५ दशलक्ष घनमीटर नैसर्गिक वायूचे येथून उत्पादन जुलै २०१६ पासून सुरू होणे अपेक्षित आहे, तर केजी-डीडब्ल्यूएन-९८/२ मधून २०१८ पासून उत्पादनाला सुरुवात होऊ शकेल.