केंद्रीय अर्थसंकल्प येत्या २९ फेब्रुवारीला लोकसभेमध्ये सादर केला जाईल. काय स्वस्त आणि काय महाग होणार? यासोबतच कर आकारणीचे स्वरुप कसे असेल? अशा थेट खिशात हात घालणाऱया बाबींवर सर्वसामान्यांपासून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच लक्ष असते. सध्या प्रो-कब्बडीच्या क्षितीजावरचा तारा असणारा मुंबईचा रिशांक देवाडिगाला यंदाच्या अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत जाणून घेऊयात….

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींबाबत अर्थसंकल्पात घेतले जाणारे निर्णय याचा प्रत्येकाच्या कौटुंबिक बजेटवर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे अगदी थेट नाही, पण प्रत्येकाचे कौंटुंबिक बजेट हे केंद्रीय अर्थसंकल्पावर  नक्कीच अवलंबून असते. त्यामुळे इतरांप्रमाणे माझ्या घरचं बजेट हे देखील केंद्रीय बजेटवर अवलंबून आहे. सध्या प्रो-कबड्डीच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकता येईल की नाही याबाबत मी साशंक आहे. पण शक्य झालेच तर नक्की ऐकेन.

देशात युवांची संख्या सर्वाधिक आहे आणि रोजगार हा युवांशी संबंधित  सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे अर्थसंकल्र्पाचा सर्वाधिक भर हा देशात रोजगार निर्मितीवर असला पाहिजे, असे मनापासून वाटते. देशासाठी खेळणाऱया आज अनेक युवा खेळाडूंना रोजगार नाही ही दुर्देवी गोष्ट आहे.

एक खेळाडू म्हणून बोलायचे झाल्यास अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी नक्कीच भरघोस तरतूदी अपेक्षित आहेत. क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांनाही सध्या सुगीचे दिवस आले असल्याचे खरे असले तरी आजही काही प्रश्न कायम आहेत. रणजीसारखीच कबड्डीतही स्थानिक खेळाडूंच्या गुणांना जोपासणारी स्पर्धा घेतली गेली पाहिजे. फक्त कबड्डीच नाही, तर इतर खेळांतही तसे प्रयत्न व्हायला हवेत. खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करता येईल अशा स्पर्धा देशात होतील, या दृष्टीने क्रीडा मंत्रालयाच्या मार्फत प्रयत्न सुरू व्हायला हवेत. त्यादृष्टीने  अर्थसंकल्पात तरतूदी केल्या जातील अशी अपेक्षा नक्कीच आहे.

अर्थमंत्र्यांच्या क्षमतेबाबत काहीच शंका नाही. ‘अच्छे दिन’ हा मुद्दा एका बाजूला, पण सकारात्मक वातावरण देशात आहे एवढं मात्र नक्की. त्यामुळे केवळ टीका करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या पातळीवर सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हवा. मोदींनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान मला सर्वाधिक भावले. अभियानाला यशस्वी व्हायला थोडा कालावधी लागेल कारण, स्वच्छतेची सवय जेव्हा प्रत्येकाला लागेल तेव्हा या अभियानाचे खरे यश असेल.