सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद निर्मितीतील सेलमधील हिस्सा विक्रीसाठी (ऑफर फॉर सेल) कंपनीच्या समभागाचे किमान मूल्य ६३ रुपये निश्चित करण्यात आले आहे. सरकार यामाध्यमातून कंपनीतील ५.८२ टक्के हिस्सा कमी करणार आहे. याद्वारे १,५१४ कोटी रुपये उभारले जाण्याची शक्यता आहे. यासाठी २४.०३ कोटी समभाग उपलब्ध करून दिले जाणार आहे. कंपनीचा समभाग गुरुवारी मुंबईच्या शेअर बाजार व्यासपीठावर १.७७ टक्के घसरणीसह ६३.९० रुपयांवर बंद झाला. गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी हे समभाग मूल्य होते. तर मार्च २०१२ पासून समभाग ३० टक्क्यांनी खाली आला आहे. कंपनीने डिसेंबर २०१२ अखेरच्या तिमाहीत २३ टक्के नफ्यातील घसरण नोंदविली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील हिस्सा विक्रीतून महिनाअखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षांसाठी २४ हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठरविणाऱ्या सरकारने आतापर्यंत २३,८०० कोटी रुपये उभारले आहेत.