बाजारात दिवसेंदिवस नवनवीन मोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करीत असल्या तरीही भारतात मात्र सॅमसंगच्या मोबाईलनाच ग्राहकांची विशेष पसंती असल्याचे चित्र आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत २.७ कोटी स्मार्टफोन समुद्रमार्गाने भारतात पाठविण्यात आले. त्यातील २६ टक्के फोन हे सॅमसंग कंपनीचे होते तर शिओमी कंपनीचे १२ टक्के आणि त्यानंतर विवोच्या फोनचा समावेश होता.

या सर्वेक्षणात नमूद केल्यानुसार शिओमी कंपनीच्या रेडमी नोट ४ या मॉडेलचा सर्वात जास्त म्हणजे १० लाखांहून अधिक खप झाला. कंपनीने भारतात या मॉडेलच्या किंमती ९९९९ ते १२९९९ या दरम्यान वेगवेगळ्या ठेवल्या होत्या. दुसऱ्या तिमाहीत लिनोव्हो या स्मार्टफोनचा खप देशात पाचव्या क्रमांकावर असल्याचे चित्र होते. सॅमसंग, शिओमी, विवो आणि ओप्पो यांनी आपले स्मार्टफोन बाजारात आणल्यानंतर त्यांची चांगली विक्री झाली. याबरोबरच मोटो जी५ आणि मोटो जी ५ प्लस या जी सिरीजच्या स्मार्टफोनने भारतीय बाजारात चांगली प्रसिद्धी मिळवली.
या सर्वेक्षणात सांगितल्यानुसार शिओमीपेक्षा मोटोच्या फोनची उपलब्धता जास्त चांगली आहे. निर्मितीच्या क्षेत्रात आणखी चांगली सुविधा देण्यासाठी शिओमी दुसरी निर्मिती सुविधा शोधत आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार विवो कंपनीही शिओमीच्या केवळ काही अंतराने मागे असून येत्या तिमाहीत ही कंपनीही शिओमीच्या खपाला चांगलीच टक्कर देईल. स्मार्टफोनची ऑनलाईन खरेदी, खरेदीवर लागू होणारा जीएसटी अशा अनेक गोष्टी भारतीय स्मार्टफोन बाजाराबाबतीत लक्षात घेणे गरजेचे आहे.