करोना प्रतिबंधक लशीच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सुरुवातीच्या चाचण्यांचे सकारात्मक निकाल आणि युरोपीय महासंघाच्या नेत्यांमध्ये ७५० अब्ज युरोच्या अर्थप्रोत्साहक योजनेबाबत झालेली सहमतीचे जगभरच्या भांडवली बाजारात उत्साही तरंग उमटताना दिसले. परिणामी स्थानिक बाजारातही सेन्सेक्सने पाच शतकी झेप घेत, ३८ हजारानजीकचे चार महिन्यांपूर्वी मागे सोडलेली पातळी मंगळवारी पुन्हा गाठली.

पहाटे खुले झालेल्या आशियाई बाजारातील सकारात्मकतेचा धागा पकडत, सेन्सेक्सने मंगळवारच्या व्यवहाराची सुरुवात ३०० अंशांच्या मुसंडीसह केली. बाजारात खरेदीचा जोम चढत जाऊन, या निर्देशांकाने दिवसाची अखेर सोमवारच्या तुलनेत ५११.३४ अंशांची भर घालत ३७,९३०.३३ या पातळीवर केली. बरोबरीने निफ्टी निर्देशांकानेही १४०.०५ अंशांच्या कमाई करीत ११,१६२.२५ या पातळीवर दिवसाच्या व्यवहारांना निरोप दिला. निर्देशांकांनी चालू वर्षांत ५ मार्चनंतर नोंदविलेले हे उच्चांकी स्तर आहेत.

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्यातील दमदार सुधारणा आणि काही भारतीय कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा सरस नोंदविलेल्या तिमाही आर्थिक कामगिरीनेही बाजारातील खरेदी उत्साहाला आणखी हातभार लावला. रुपयाचे मूल्य १७ पैशांनी मजबूत होऊन ते प्रति डॉलर ७४.७४ अशा दोन सप्ताहांपूर्वीच्या उच्चांकपदी पोहोचले. थकबाकी वसुलीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळू न शकल्याने  दूरसंचार क्षेत्रातील समभागांना गुंतवणूकदारांच्या प्रतिकूल भावनांचा सामना करावा लागला. या क्षेत्राचा अपवाद केल्यास बीएसई एनर्जी, तेल व वायू, बँकेक्स, स्थावर मालमत्ता, ऊर्जा, वित्तीय सेवा आणि वाहन या उद्योग क्षेत्राचे निर्देशांक मंगळवारच्या व्यवहारात बहरताना दिसले. बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये सव्वा टक्क्य़ांहून मोठी वाढ झालेल्या दिवसात, बीएसई मिडकॅप निर्देशांकात मात्र ०.२२ टक्क्य़ांची घसरण, तर स्मॉल कॅप निर्देशांकात ०.२४ टक्क्य़ांची किरकोळ वाढ दिसून आली.

गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा; बाजार चंचलतेबाबत ‘सेबी’ही दक्ष!

बाजाराचा उत्साही कल पुढेही कायम राहण्याचे संकेत असले, तरी निरंतर सुरू असलेल्या तीव्र स्वरूपाची तेजी पाहता गुंतवणूकदारांनी सावधगिरीने पावले टाकणे आवश्यक आहे, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नमूद केले. सध्या बाजार मूल्यांकनाने अतिखरेदी पातळी गाठल्याचे त्यांनी सांगितले. बाजार नियंत्रक ‘सेबी’नेही बाजारातील अस्थिरतेला प्रतिबंध म्हणून सरलेल्या २० मार्चला लागू केलेले उपाय २७ ऑगस्टपर्यंत कायम असल्याचा पुनरूच्चार मंगळवारी केला. या उपायांच्या काटेकोर अंमलबजावणीच्या बरोबरीनेच सर्व दक्षता पाळली जात असल्याचे सेबीने स्पष्ट केले.